Next
ओझं...पालकांच्या मनावरचं
मिथिला दळवी
Thursday, August 15 | 06:30 PM
15 0 0
Share this story

आकाशच्या वडिलांचा मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय होता. शहरापासून लांबच्या एम.आय.डी.सी.मध्ये त्यांची फॅक्टरी होती. राहण्याचं ठिकाणही व्यवसायाच्या जवळ. मोठं ऐसपैस घर. आकाशची शाळाही तिथेच. आकाशची सगळी चुलतभावंडं मात्र शहरात राहायची. ती सगळी मुलं त्या भागातल्या एका ख्यातनाम शाळेत जायची. आकाश त्याच्या एम.आय.डी.सी. जवळच्या शाळेत रमला होता. त्याला अभ्यासही चांगला जमायचा. मात्र अशा लांब ठिकाणी राहून तुम्ही आकाशच्या उज्ज्वल भवितव्याशी खेळताहात, असं बऱ्याचशा नातेवाईकांचं म्हणणं होतं. पीअर प्रेशर वाढू लागलं तसं हळूहळू आकाशच्या आईबाबांना त्यातून फारच अपराधी वाटू लागलं. तिसरीत गेल्यावर मग आकाशला त्यांनी एम.आय.डी.सी.जवळच्या शाळेतून काढून शहरातील या ख्यातनाम शाळेत प्रवेश घेतला.
आई आणि आकाश शाळेच्या जवळपास भाड्यानं घर घेऊन राहू लागले. बाबा आठवड्यातून एकदा यायचे. सगळी धावाधाव व्हायची. आकाशला कंटाळा यायचा. बाबा आले आहेत असं वाटावं तोपर्यंत त्यांची निघायची वेळ होते असे. खूपदा मग बाबा या घरी जास्त राहायला मिळावं म्हणून रोजचा मोठाला प्रवास करायचे. त्यांची खूप तारांबळ व्हायची. त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला. 
आकाशला दहावीत मणभर मार्क्स मिळाले तेव्हा आईबाबांनी आकाशसाठी घेतलेल्या अपरिमित कष्टांचं सगळ्यांनी कौतुक केलं. पण बारावीत त्याची मार्कांची जरा तारांबळच उडाली. मार्क्स कमी मिळाल्यामुळे बारावीनंतरची अॅडमिशन आकाशला दुसऱ्या शहरात घ्यावी लागली. तिथं आकाश गेला आणि आई-बाबा दहा वर्षांनंतर पुन्हा फॅक्टरीजवळच्या घरी एकत्र राहू लागले.
हे आई-बाबा एकदा माझ्याशी बोलत होते.
“आकाशचं भलं व्हावं म्हणून आम्ही सगळं केलं. दोन घरं सांभाळली. त्यात खर्च आणि तारांबळ खूप झाली.”
“आकाशच्या शहरातल्या मूळ घराजवळच्या शाळेतल्या त्याच्या मित्रमैत्रिणींशी संपर्क आहे का त्याचा?” मी विचारलं.
“आहे ना, सुट्टीत आला की खेळायचा ना तो त्यांच्याशी!”
“ते मित्र आता काय करतात?”
आकाशच्या आई-बाबांनी कोण काय करतो आहे याची पटापट यादी सांगितली. अनेक जणांनी दहावीत ढीगभर मार्क्स मिळवले होते आणि काही जणांना बारावीनंतर नामांकित इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश मिळाला होता.
काय झालं नेमकं इथे! आकाशला शहराच्या मुख्य भागातल्या नामांकित शाळेत तिसरीत परत प्रवेश मिळावा म्हणून आईबाबांनी खूप व्यापताप सहन केले होते. खरंच गरज होती का त्याची? एम.आय.डी.सी.जवळच्या साध्या शाळेत शिकला असता तर आकाशचं काही मोठं नुकसान झालं असतं का? शहरातल्या शाळेत शिकला म्हणून खूप काही विशेष मिळालं का आकाशला?
हे झाले ‘जर तर’चे प्रश्न. यांची ठोस अशी उत्तरं नाही देता येणार. पण गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते आहे. असे ‘जर तर’चे प्रश्न आले, की उत्तरांमध्ये येणारी अनिश्चितता पालकांना नकोशी झाली आहे. आताच्या पालकांना ठाम, ठोस उत्तरं हवी आहेत. यामुळेच मग ‘हमखास यशाची’ खात्री देणारे सर्वच व्यवसाय सध्या तेजीत आहेत (ते यश मिळो, वा न मिळो). आणि त्यामुळेच की काय, पालकांवरचं पीअर प्रेशर आपली जागा राखून आहे. मुळात आपल्या मुलांचं भलं व्हावं असं वाटणं, ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. पालक म्हणून आपलं प्रगतिपुस्तक चोख असावं, असं त्याना वाटणंही स्वाभाविक आहे. पण जोडीनं मुलांचं प्रगतिपुस्तकही पालक स्वतःच लिहू लागले आहेत की काय? ‘माझ्या बाजूनं मुलांना संधी किंवा सुविधा दिल्या नाहीत’ असं व्हायला नको, म्हणून पालक स्वतःवर खूप भार घेताना दिसताहेत. ‘पालकवेध’मधून आपण वेळोवेळी हे बोलतो आहोतच. 
आयुष्यात मुलांना संधी आणि सुविधा मिळू देण्याच्या नादात मुलांची काही मूलभूत कौशल्यं (स्किल्स) विकसित होण्याकडं आपलं दुर्लक्ष तर होत नाहीए ना? आपला रस्ता आपण शोधणं, कमी सुविधा असताना काम करता येणं, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देता येणं, विपरीत परिस्थितीचे ताणतणाव सहन करता येणं - ही अतिशय मूलभूत स्वरूपाची जीवनकौशल्यं आहेत आणि पुढील आयुष्यामध्ये यशस्वी होण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. मुलांना येणाऱ्या अडचणी, त्यांना जाणवणारा ताण, त्यातून मार्ग काढायचे त्यांचे प्रयत्न - या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यक्ती म्हणूनच्या जडण-घडणीचा महत्त्वाचा भाग आहेत. आपल्या मुलांना आपण त्यापासून वंचित तर करत नाही ना, याबाबत पालक म्हणून जागरूक असणं म्हणूनच महत्त्वाचं.
यापुढे मग पीअर प्रेशरचं ओझं क्षुल्लक नाही का वाटत?
संधी आणि सुविधा लीलया मिळणाऱ्या मुलांच्या बाबत जाणवू लागलेल्या काही वेगळ्या प्रश्नांबद्दल बोलूया पुढच्या लेखात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link