Next
निवडणुकीचा दिवस
सुरेश खरे
Friday, May 10 | 05:00 PM
15 0 0
Share this story


प्रिय नाना,

सोमवार, २९ एप्रिल, लोकसभेच्या निवडणुकीचा दिवस. राष्ट्राचं म्हणजेच सामान्य जनतेचं भवितव्य ठरवणारा. मतदान हे मी पवित्र कार्य समजतो. आतापर्यंत एकदाही मी मतदान चुकवलं नाही. सकाळी लवकर उठून, स्नान करून, शुचिर्भूत होऊन मी मतदानकेंद्रावर जाण्यासाठी तयार झालो. काकू म्हणाल्या, “मीही येते.” नेहमी ती सकाळी सर्व आटपल्यावर मतदान करते. काकू तयार होऊन बाहेर आल्या. मी पाहतच राहिलो. त्यांनी ठेवणीतली किमती साडी नेसली होती. साधारणपणे सकाळी काकूंचा अवतार पाहण्यासारखा असतो. (म्हणजे नसतो). आज ती नेहमीपेक्षा बरी दिसत होती.

“एवढी कशाला नटली आहेस? आपल्याला काही लग्ना-मुंजीला जायचं नाहीये.” मी म्हटलं.

“मला माहीत आहे, पण तिकडे वर्तमानपत्रवाले आपल्यासारख्या मतदारांचे…”

“म्हणजे म्हाताऱ्यांचे का?” मी तिला अडवीत विचारलं.

“म्हातारे नाही… ज्येष्ठ म्हणा. (काकूना ‘म्हातारं’ म्हटलेलं आवडत नाही) फोटो काढतात, वर्तमानपत्रात छापण्यासाठी.  काढलेच आपले फोटो तर आपण आपलं नीटनेटकं असलेलं बरं.” काकूंनी स्पष्टीकरण दिलं.

आम्ही मतदानकेंद्रावर पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. मी सलमान, अभिताभ किंवा सचिन नसल्यामुळे किंवा काकू ऐश्वर्या नसल्यामुळे आमच्यासाठी पायघड्या घालणं सोडा, कुणी ढुंकूनही पाहिलं नाही. रांगेत आमच्यापुढे चार-पाच आमच्याच वयाचे मतदार होते. थोड्याच वेळात आमच्या रांगेत एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक आले. ते मुळात मराठी साहित्यिक. त्यात कुठे सभा-समारंभांना घाऊक हजेरी न लावणारे. प्रसिद्धीपराङ्मुख. मराठी साहित्यिकांना प्रसिद्धी नको असते, असं नाही पण, परिस्थिती त्यांना प्रसिद्धीपराङ्मुख बनवते. आम्ही त्यांना ओळखलं. मी आणि इतरांनीही त्यांना हसून नमस्कार केला. थोड्या वेळानं एक पोलिस आला आणि त्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र मागितलं. “त्यांच्याकडे काय तुम्ही ओळखपत्र मागता? फार मोठा माणूस आहे तो. एकजण कुरकुरला. तरीही तो पोलिस तसाच शांतपणे उभा. साहित्यिकानी आपलं ओळखपत्र दाखवलं. पोलिसानं ते पाहून परत केलं. जाताजाता तो म्हणाला, “तुम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केलात. मी काही त्यांना ओळखत नाही. म्हटलं मोठा माणूस असावा. त्यांचं नाव समजण्यासाठी त्यांना विचारण्याऐवजी मी ओळखपत्र मागितलं.” मतदान करून आम्ही निघालो. काकूंचा फोटो काढायला कुणी पुढे आलं नाही म्हणून त्या हिरमुसल्या.

मतदान करून घरी आल्यावर मी दूरदर्शनवर, वृत्तवाहिन्यांच्या बातम्या पाहत होतो. दिवसभर दाखवत काय होते तर कोणत्या सेलिब्रिटीजनी मतदान केलं त्यांच्या चित्रफिती. अरे ही काय बातमी झाली? त्यांनी मतदान केलं म्हणजे पराक्रम गाजवला की आमच्यावर उपकार केले, की ज्याची बातमी व्हावी? इतकंच नाही तर त्यांनी कोणत्या महापालिकेच्या शाळेत जाऊन मतदान केलं याची माहिती! काय कर्तव्य आहे आम्हाला त्याच्याशी? आणि त्याचा उपयोग काय? आणि मग त्यांचे जनतेला उपदेशाचे डोस. आमचं राष्ट्रीय कर्तव्य काय ते हे आम्हाला सांगणार. सगळा चीड आणणारा प्रकार होता. आणि त्यांचं आगमन झालं की सारी यंत्रणा लाचारासारखी हांजीहांजी करत त्यांच्यासाठी पायघड्या घालायला धावत होती. आमचे राजसाहेब, उद्धवसाहेब, पवारसाहेब (बाकी कसे का असेनात) त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तासन् तास रांगेत उभे राहून आपली पाळी आल्यावर मतदान केलं. त्यांनी हे देखाव्यासाठी केलं, असं म्हणणं अन्यायकारक ठरेल. देखाव्यासाठी कुणी तासन् तास स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबीयांना रांगेत उभं करणार नाही.

पण दिवसभर नटनट्यांच्या चित्रफिती दाखवल्यामुळे ज्यांचा कित्येक वर्षांत एकही चित्रपट पडद्यावर आला नाही अशा अनेक नट-नट्यांचं छोट्या पडद्यावर का होईना दर्शन झालं. उम्मीच्या (म्हणजे आपल्या ऊर्मिला मातोंडकरच्या हो) राजकारणातील प्रवेशामुळे, गेली कित्येक वर्षं काम नसलेल्या बॉलिवूडमधल्या नट-नट्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला, की निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हातात नारळ देऊन नट-नट्यांना तिकीट देतात. हे सर्वच पक्षांचं धोरण आहे. त्यासाठी नट-नट्यांना काही अनुभव किंवा पार्श्वभूमी असायची गरज नाही. तुमच्या पणजोबांचं समाजकार्यही जमेस धरलं जातं. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत अशा अनेक नटनट्या निवडणुकीला उभं राहण्याची शक्यता आहे. त्यांच्यातील बहुतेक जण (जणी) बारावी पास किंवा नापास असण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षात त्यांची संख्या जास्त असेल, तर त्यांच्यापैकी कुणाला शिक्षणखातं द्यायचं हा फार मोठा पेच सत्ताधारी पक्षासमोर राहील. मुंबईतली मालिकांमधली कलावंत मंडळी फारशी उत्सुक नाहीत. कारण मुंबईत तिकीटवाटप करताना शक्यतो मराठी माणसाला उमेदवारी न देता परराज्यातल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची पूर्वापार चालत असलेली पद्धत त्यांना माहीत आहे.

मला या सगळ्या प्रकारात वृत्तवाहिन्यांची कीव आली. दिवसभर दाखवायचं काय? वेळ कसा भरून काढायचा? काहीतरी तर दाखवलंच पाहिजे. मग ‘काहीतरीच’ जर दाखवायचंय तर ‘जन्ते’ला निदान नट-नट्या दाखवू. शेवटी काय वेळ भरल्याशी कारण. निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत आचरटासारखं बोलून, एकमेकांना शक्य तितक्या खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देऊन, आरोप-प्रत्यारोप करून राजकारण्यांनी या वाहिन्यांच्या भुकेला भरपूर खाद्य पुरवलं. आता पुढे काय? आता चर्चा कशावर करायची? जर कुणी पक्षाला गोत्यात आणणारी भरमसाट विधानं केलीच नाहीत तर पक्षांच्या प्रवक्त्यांनी केविलवाणं समर्थन कुणाचं करायचं? वाहिन्यांवरच्या चर्चेमुळे ‘राजकीय विश्लेषक’ म्हणून नावारूपाला आलेल्यांनी आता विश्लेषण कशाचं करायचं? पुढचे तीन आठवडे फक्त निकालांच्या अंदाजांविषयी बोलत राहायचं म्हणजे अतीच नाही का? पण मला याची फारशी काळजी वाटत नाही. वृत्तवाहिन्या वेगवेगळे विषय शोधून काढण्यात आणि नाहीच मिळाले तर तयार करण्यात पटाईत आहेत. राजकारण्यांनी विषय नाही दिले तर, ‘राजकारणी गप्प का?’ या विषयावर चर्चा घडवून आणतील. 

बाकी लिहिण्यासारखं विशेष काही नाही. आता २३ मेची वाट पाहायची.

बाकी सर्व क्षेम.

तुमचा

तात्या
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link