Next
‘नव्या जुन्या पिढीची योग्य सांगड’
प्रतिनिधी
Friday, August 09 | 03:45 PM
15 0 0
Share this story


page24-1‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेबद्दल काय सांगाल?
‘झी मराठी’ने  ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेच्या निमित्ताने एक छान मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. हल्लीच्या काळात टेलिव्हिजन हे एक प्रभावी माध्यम असून मालिकांचा  प्रेक्षकांवर नक्कीच प्रभाव असतो. मालिकेची कथा प्रेक्षकांना आपलीशी वाटते, मालिकेतील पात्रं प्रेक्षकांना त्यांच्या घरातील वाटतात, त्या व्यक्तिरेखांचे प्रॉब्लेम्स प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. या मालिकेतून  तरुण वयात वैधव्य आलेल्या महिलेची, आसावरीची कथा सांगितली आहे. आसावरी कोणत्याही परिस्थितीला हसतमुखानं सामोरं जाऊन कुटुंबाची काळजी घेत आहे. तिच्या आजूबाजूला चार माणसं असली तरी ती एकटी आहे. अशावेळी तिची सून तिच्या आयुष्यात आनंद कसा घेऊन येते ही या मालिकेची कथा आहे. या मालिकेतील सासूसुनेचं नातंदेखील एकदम वेगळं आहे.  

या मालिकेतील तुमच्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगा.
मी या मालिकेत आसावरीची भूमिका साकारत आहे. अकाली नवरा वारल्यानं घराची, वृद्ध सासऱ्यांची आणि लहान मुलाची जबाबदारी आसावरीवर आली आहे. मुलाला तिनं कष्टानं मोठं केलं आहे. तर सासऱ्यांची आई बनून मनोभावे सेवा करते आहे. हे सगळं करत असतानाच ती स्वतःला विसरली आहे. तिनं स्वतःला तिच्या कुटुंबीयांच्या सेवेत झोकून दिलं आहे. आयुष्यात आलेल्या संकटांना हसतमुखानं तोंड दिलं आहे. ती तिच्या कुटुंबाची खूप आपुलकीनं काळजी घेते आहे. अतिशय कष्टाळू, सोशिक अशी ही आसावरी आहे.

मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांकडून कशा प्रतिक्रिया मिळाल्या?
खूपच छान प्रतिक्रिया मला  प्रेक्षकांकडून मिळत आहेत. प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद मिळत आहेत, तो पाहून आनंद झाला आहे. त्याचबरोबर एक कलाकार म्हणून माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे. मी स्वतःला शारीरिक आणि मानसिकरीत्या फिट ठेवलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे.  माझे पती अशोक सराफ यांचंही हेच म्हणणं आहे. आमच्याकडे खूप जास्त अनुभव आहे आणि ज्या नवीन पिढीसोबत आम्ही काम करतो त्यांच्याकडूनदेखील खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे नवीन व जुन्या पिढीची सांगड घालणारी मालिका आणि या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता पाहून मला खूप आनंद होतो आहे.

प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल?
आसावरी ही प्रत्येकाच्या घरात असते. आसावरीचं कधीच कोणी कौतुक करत नाही. प्रत्येकाची आई रोज आसावरीसारखी राबत असते. परंतु तिला कोणी ‘थँक यू’ म्हणत नाही किंवा तिचं कोणी कौतुक करत नाही. त्यामुळे घरात राबणाऱ्या त्या बाईचं कौतुक करा, तिचा सन्मान करत तिचे आभार माना. तिला या छोट्या गोष्टीनं देखील खूप आनंद होईल.
प्रतिनिधी   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link