Next
ताटात नांदती प्रांत सारे
उल्का कडले
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this storyलग्नाच्या तयारीतलं एक मुख्य काम असतं केटरर निवडण्याचं. मेन्यू ठरवताना आपण आपल्या आवडीच्या चवीचा विचार नक्कीच करतो. जे आपल्याला आवडतं ते इतरांनाही खाऊ घालावं हा प्रामाणिक हेतू त्यात असतो. त्याचबरोबर पाहुण्यांना नक्की काय खायला आवडेल, येणारे पाहुणे कोण आहेत हाही विचार करून नवीन पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश केला जातो.

बऱ्याचदा हॉलबरोबर केटरर हा ‘पॅकेज’मध्ये येतो; म्हणजेच त्यांची ‘मोनोपॉली’ असते. केटररला माहीत असतं, की समोरच्याला नक्की कोणत्या चवीचं जेवण अपेक्षित आहे. त्याप्रमाणे बदल करण्याची त्याची तयारी असते. आजकाल बहुतेक केटरर महिनाभर आधी एखाददुसऱ्या लग्नसमारंभात येऊन तिथल्या पदार्थांची चव बघायला बोलावतात. प्रत्येक केटररची स्पेशालिटी असलेले काही विशेष पदार्थ या भेटीत पक्के होतात. ठाण्याच्या गोखले उपाहारगृहाचे स्वरूप गोखले यासंदर्भात सांगतात, “आमचे ग्राहक बहुतांश मराठीच असतात. गुजराती, पंजाबी ग्राहक मराठी केटररकडे सहसा येत नाहीत. मराठी लोकांना वेगवेगळ्या चवींचं खायला आवडतं. त्यामुळे एखादा वेगळा पदार्थ खास आवडला असेल तर ते त्यांच्या मेन्यूमध्ये तो आवर्जून समाविष्ट करतात. त्यासाठी लागणारे आचारीही सहज मिळतात. त्याचप्रमाणे पारंपरिक मराठी पदार्थही असावेत असाही आग्रह असतो.”

पूर्वीच्या काळी कोशिंबीर, भाजी, वरण-भात, मसाले-भात, पुरी, जिलेबी किंवा श्रीखंड यांनी सजणारं ताट आता वेगवेगळ्या प्रांतीय, देशीय आणि धर्मीय पदार्थांनी, पक्वान्नांनी सजू लागलंय. ‘ग्लोबलायझेशन’मुळे अनेक पदार्थ घरोघरी वरचेवर केले आणि खाल्ले जाऊ लागले आहेत; शिवाय आवडूही लागले आहेत. नावीन्याची हौस असल्यामुळे असेल पण लग्नसमारंभात पारंपरिकता जपत नावीन्याची कास धरलेली दिसून येते. शिवाय हल्ली लग्न हे जात, भाषा, धर्म, प्रांत, देश या कुठल्याही बंधनात अडकलेलं दिसत नाही. कुटुंबातील सगळेच या बदलाचा खुल्या मनानं स्वीकार करताना दिसतात. आंतरजातीयच नव्हे तर आंतरप्रांतीय, आंतरदेशीय, आंतरधर्मीय  विवाह सर्रास होताहेत. मग दोन्हीकडच्या जेवणाच्या पद्धती, पदार्थ स्वाभाविकपणे मेन्यूमध्ये हजेरी लावतात.

मेन्यूमधील बदल
हल्ली लग्नाला गेल्यावर पाहुण्यांचं  स्वागत ज्यूस अथवा मॉकटेल या ‘वेलकम ड्रिंक’नं होतं. त्याबरोबर व्हेज आणि/किंवा नॉनव्हेज स्टार्टर्स असतात. सॅलड्समध्येही भरपूर विविधता दिसते. पास्ता, रशियन सॅलाड, बुंदी आणि इतरही सजलेल्या सॅलड्सनी आता पूर्वीच्या एकांड्या शिलेदार- कोशिंबिरीची जागा घेतली आहे. तर जेवणात चटपटीत खाद्यपदार्थांपासून पारंपरिक खाद्यपदार्थांपर्यंत खाण्याची अगदी रेलचेल असते. डीझर्ट म्हणून नेहमीच्या ओळखीच्या गोड पक्वानांबरोबरच इटालियन तिरामिशु, केक, क्रीम केक, चॉकलेट्स, आइसक्रीम्स असतात. त्यातही पान, गुलाबजाम, पुरणपोळी, मोदक, चंदन अशा नव्या स्वादांची आइसक्रीम्स हल्ली दिसतात. कुरकुरीत चायनीज ‘दरसान’ आइसक्रीमबरोबर खाण्यासाठी असतं. शिवाय कुल्फी फालुदा, सीताफळ-अंगुर बासुंदी अशी फ्युजन्सही दिसून येतात. जेवण झाल्यावर रंगीबेरंगी मुखवासासोबत विडेही ठेवलेले असतात. तृप्ती देणाऱ्या या जेवणात एक प्रकारचा मिलाफ दिसून येतो. अळू-वडी, अळूची भाजी, कोथिंबीर-वडी,मोदक, पुरण-पोळी हा मराठी स्वाद असला तरी इतरही अनेक स्वाद तितक्याच ठळकपणे जाणवत असतात. त्यात अवधी, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, काश्मिरी, बंगाली, दाक्षिणात्य पदार्थ जसे असतात तसेच चायनीज, मेक्सिकन, थाई हेही असतात. त्यातही पाणीपुरी, डोसा, पास्ता, नूडल्स हमखास असतातच.

लग्नाचा मेन्यू ठरवतानाच ‘फरसाण आयटम’ हा प्रकारही आता अगदी मस्ट यादीतच आला आहे. म्हणजे प्रत्यक्ष फरसाण नव्हे, पण डाव्या बाजूला असणारे तोंडीलावण्याचे चमचमीत पदार्थ.

पूर्वी जिथे बटाटा भजी असतील, त्याऐवजी आता छोट्या आकाराचे बटाटेवडे, वेगळ्या बाउलमध्ये दहिवडे, कटलेट, छोटे समोसे, सँडविच ढोकळा अशा प्रकारांचीही चलती आहे. पूर्वी मसालेभात असायचा, आता पांढऱ्या भाताबरोबरच पुलाव, जिरा राइस, हे प्रकारही येतात. रुमाली रोटी उडवणारा एक तरी आचारी तिथे दिसतोच. पूर्वी सार, कढी पानातच असायचं. अपेटायझर सूप तर कधीच नसायचं. मात्र थ्री-कोर्स जेवणाची पद्धत रूढ झाल्यानं आता स्वतंत्रपणे सूपचे काऊन्टरही लावले जातात. झिऑन (Zion) केटरर्सचे बर्नार्ड बरेटो, जे मराठी लग्नासाठी कॉन्ट्रॅक्ट घेतात, यांनी सांगितलं,  “हल्ली ‘लाइव्ह काउंटर’ची मागणी मोठ्या प्रमाणात असते. तवा भाजी, तंदुरी रोटी, पापड, वेगवेगळे कबाब, पास्ता, पिझ्झा, पाव भाजी, पाणीपुरी, डोसा यासाठी वेगवेगळे ‘लाइव्ह काउंटर’ असतात. त्यासाठी लागणारं सामान, गॅस, भांडी हे सगळं केटररचं असलं तरीही प्रत्येक काउंटरसाठी एक्स्पर्ट (कुशल आचारी) बाहेरून बोलावला जातो. अशा काउंटर्सचं बिलिंग वेगळं होत असतं. असे ‘स्नॅक्स काउंटर्स’ जास्त असतील किंवा ‘अमर्यादित स्टार्टर’ असतील तर मुख्य जेवणाकडे काहीसं दुर्लक्ष होतं; म्हणून ‘मेन कोर्स’मध्ये कमी पदार्थ ठेवले जातात. एकंदरीतच मराठी लग्नातील स्वागतसमारंभात ‘व्हेज’ जेवणावर जास्त भर असतो. मात्र काही वेळा मित्रमंडळी आणि ऑफिसमधील सहकारी यांच्यासाठी ‘नॉनव्हेज’ जेवणाचं वेगळं रिसेप्शनही ठेवतात. आजकाल काही मराठी वर-वधू ‘वेडिंग केक’ कापण्यासाठीही उत्सुक असतात. मराठी स्वागतसमारंभात संपूर्ण मराठी जेवण आताशा नसतंच. पाश्चिमात्य आणि भारतातील इतर प्रांत यांच्या खाद्यसंस्कृतीचा खूप पगडा हल्लीच्या मेन्यूवर दिसून येतोय.”

 इतके सगळे पदार्थ आताच्या महागाईच्या दिवसांत खर्चीक तर नक्कीच असतात. मेन्यूप्रमाणे प्रत्येक ताटामागे सहाशे ते बाराशे रुपये इतका खर्च आजकाल येतो. काउंटरचा खर्च हा जास्तीचा असतो. तरीही असे काउंटर फायद्याचे ठरत असावेत. आवड आणि आर्थिक... या दोन्ही दृष्टीनं!  ‘लाइव्ह काउंटर’ म्हणजे काय? आपल्यासमोर आपल्या आवडत्या चवीचा पदार्थ गरमागरम करून मिळतो. ‘तवा भाजी’साठी मोठ्या तव्यावर आधीच तेलावर परतून घेतलेल्या भाज्या - बटाटा, वांगी, भेंडी, सिमला मिरची, कारली, फ्लॉवर, मशरूम, तोंडली - कडेनं गोलाकार रचलेल्या असतात. आपल्याला हवी ती भाजी सांगायची, की लगेच तव्यावरच्या उरलेल्या जागेत त्या भाज्या मिक्स करून त्यावर तिखट, मीठ, मसाला घालून, परतून तुमच्या डिशमध्ये ती अवतरते. ‘लाइव्ह काउंटर’ प्रमाणेच ‘सरसों दा साग’, ‘अमृतसरी छोले’, ‘उंधियू’, ‘गट्टे की सब्जी’, ‘दम आलू’ असे इतर प्रांतीय पारंपरिक पदार्थही असतात. इतकं सगळं एकाच वेळी, एकाच ठिकाणी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसोबत खाण्याची मजा काही औरच! हल्लीचा बदललेला मेन्यू जणू एक ‘पारंपरिक खाद्यमहोत्सव’च असतो.

बुफे पद्धतीत अन्न वाया जाऊ नये ही अपेक्षा असते, पण खरंच असं होतं का? यावर विचार करताना जाणवतं की नुसता बुफे मेन्यू आणि ‘लाइव्ह काउंटर’ यात एक मोठा फरक दिसून येतो. बुफेमध्ये सुरुवातीला अंदाज न येऊन सगळं एकत्र ताटात वाढून नंतर काही जेवण ताटात टाकूनही दिलं जातं. मात्र ‘लाइव्ह काउंटर’ असल्यामुळे मागणीप्रमाणे प्रमाणात केलं आणि वाढलं जातं. शिवाय एका स्टॉलवरून दुसऱ्या स्टॉलवर जाताना ‘हे मी खाऊ शकेन का?’ याचा अंदाज घेऊनच पुढच्या पदार्थाची मागणी केली जाते. मी एका लग्नात सगळेच ‘लाइव्ह काउंटर’ पाहिले होते आणि त्यामुळे अन्नाची कमीत कमी नासाडी झालेली पाहिली होती. अशा मोठ्या समारंभात हा महत्त्वाचा मुद्दा मेन्यू ठरवताना डावलून चालणार नाही.

थोडक्यात, वाढायची पद्धत बदललीय, मेन्यूही बदललाय; पण बदलली नाहीय ती आपली आतिथ्यशील संस्कृती!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link