Next
मज सुचले ग मंजुळ गाणे
अनिल गोविलकर
Friday, April 12 | 03:00 PM
15 0 0
Share this story


मराठी चित्रपटगीतांमध्ये अशी अनेक गाणी सापडतात, जी प्रथमदर्शनी चित्रपटातील गाणी वाटतच नाहीत. अत्यंत मोजका वाद्यमेळ, गायकी अंगाने बांधलेली चाल अशी काही खास वैशिष्ट्ये शक्यतो भावगीत संगीतात मिळतात. चित्रपटसंगीताचे आर्थिक गणित हे खासगी गीतांच्या संगीतापेक्षा नेहमीच मोठे असते. परिणामी, वेगवेगळी वाद्ये, अनेक वादककलाकार इत्यादी चैनी चित्रपट संगीताला परवडू शकतात. परंतु ही विधाने अत्यंत ढोबळ, प्रसंगी भोंगळदेखील वाटावीत, अशा स्वररचना मराठी चित्रपटात आढळतात. १९६३ साली आलेल्या ‘पाहू किती रे वाट’ या चित्रपटात असेच एक सुंदर गाणे आहे. ‘मज सुचले ग मंजुळ गाणे’ हे गाणे अशा प्रकारचे आहे. सतार, व्हायोलिन याच वाद्यांच्या साहाय्याने सजलेला वाद्यमेळ आणि साथीला फक्त तबला.
संगीतकार दत्ता डावजेकर हे नाव तसे मराठी ललित संगीतातील एक प्रतिष्ठित नाव, गाण्याची रचना बांधताना शक्यतो थोडीतरी ‘आडवळणी’ बांधायची जेणेकरून गळ्याची ‘तयारी’ दिसावी. तसे या संगीतकाराने फार मोजकेच चित्रपट केले. परंतु रचना आणि दर्जा या दृष्टीने बघितल्यास, कामाची निश्चितच दाद द्यावी लागेल. मराठी चित्रपटाला सातत्याने दर्जेदार शब्दरचना पुरवली असेल तर ती फक्त ग. दि. माडगूळकरांनीच. किंबहुना, चित्रपटगीत कसे लिहावे, याचा आदर्श नमुना माडगूळकर यांनी निर्माण केला. शक्यतो मराठी संस्कृतीला धरून आणि तरीही सहज, सोपे शब्द वापरून, गेयताबद्ध शब्दरचना निर्माण केल्या. माडगूळकर यांची कुठलीही कविता नेहमीच शाब्दिक लयीत असते. प्रत्येक अक्षरामागे काही ना काहीतरी प्रयोजन असते अर्थात जिथे ‘घाऊक’ मागणी असते अशा चित्रपटसंगीतात, प्रत्येक कविता ही त्याच दर्जाची असेल असे नक्कीच म्हणता येणार नाही. मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर हेच विधान कुठल्याही कवीबाबत लागू होते. सातत्य आणि दर्जा यात नेहमीच थोडीफार तफावत ही निर्माण होतेच होते. असे असूनदेखील माडगूळकर यांच्या कवितेत विलक्षण आश्चर्य वाटावे इतके सातत्य आढळते. चित्रपटासारख्या कलाविष्कारात जिथे सामान्यातला सामान्य माणूसदेखील गुंतलेला असतो, तिथे अर्थपूर्ण शब्दरचना करून, मानाचे स्थान मिळवणे कधीच सोपे नसते आणि ते माडगूळकरांनी सहजपणे सिद्ध करून दाखवले.
गाण्याच्या सुरुवातीच्या सतारीच्या सुरांतून आणि आशाबाईंच्या आलापीतून ‘अभोगी’ रागाची ओळख मिळते. आशाबाईंचा हा अल्पच इतका ‘घनदाट’ आहे की तिथेच रसिकांचे लक्ष वेधले जाते. ‘कोमल गंधार, मध्यम आणि धैवत’अशा स्वरसंगतीने वेढलेला असा आलाप आहे. सघन मुखडा बांधायला याची मोठी मदत होते. ‘मज सुचले ग’  गाताना ‘ग’ या अक्षरावर किंचित आंदोलन आहे आणि तोच स्वर लगोलग सतारीवर घेतलेला आहे. गळ्यातील त्याच ‘वजनाच्या’ अंगाने.  लगेच ‘सुचले मंजुळ गाणे’ इथे पहिली ओळ संपते पण संपताना, पुन्हा याच शब्दांचे स्वरांकित रूप बघायला मिळते. पूर्वीच्या मराठी चित्रपटात शक्यतो चित्रपटातील नायिका ही बव्हंशी सोज्वळ, शालीन आणि सालंकृत स्वरूपाची असायची, तद्वत, संगीतरचनादेखील याच भावनांना अनुसरून असायच्या. संगीतकाराला शब्दांची वाजवी जाणीव असेल तर हाताशी असलेल्या शब्दांतून अनेक छटा दाखवता येतात. इथे दुसरी ओळ गाताना, ‘हिंडता डोंगरापाठी, सापडले कोरीव लेणे’ त्याचे ठरावीक भाग केले आहेत – ‘हिंडता डोंगरापाठी, सापडले’ हे गाताना ‘सापडले’ या शब्दाचे उच्चारण ऐकण्यासारखे आहे. लय तशी ठेवली आहे, स्वराकार तोच ठेवला आहे, पण ‘सापडले’ शब्दातील ध्वन्यार्थ अचूकपणे संगीतकार आणि गायिकेने घेतलेला आहे. ललित संगीत समृद्ध असते, ते अशाच छोटेखानी सौंदर्यातून. अर्थात ध्रुवपदाच्या दोन्ही ओळींतील शब्दरचना बघितली तर दुसरी ओळ दीर्घ आहे. बहुधा गाताना शब्दांची मोडतोड न करता गायन करायचे आणि त्यासाठी तशीच स्वररचना तयार करायची, असादेखील विचार असू शकतो.   

मज सुचले ग, सुचले मंजुळ गाणे,
हिंडता डोंगरापाठी, सापडले कोरीव लेणे

पहिला अंतरा थोड्या वरच्या सुरांत सुरू होतो-कवितेतील शब्द वाचल्यावर लगेच चाल का बदलली, याचा उलगडा होऊ शकतो. ‘विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे’ यामधील उन्हाच्या झळा आणि पायाखालील सापडणारे काटे - या शब्दांची नेमकी जाणीव सुरांतून दिली आहे. माडगूळकर किती अचूक शब्दरचना करतात - पहिल्याच ओळीत ‘डोंगर’ ‘लेणे’ आले असल्याने, पहिल्या अंतऱ्यात ‘भयावह’ वाटणारी ‘गुहा’ आता ‘स्वप्नासम’ वाटते. यात आधीच्या ओळींचा संदर्भ घेऊन, तोच संदर्भ अधोरेखित करून आशय अधिक बांधीव केला.

विसरल्या उन्हातील वाटा, विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता, स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले, काव्याहून लोभसवाणे

चालीचा गाभा लक्षात घेतला तर दुसऱ्या अंतऱ्याच्या स्वररचनेत फार काही बदल नाही. रचनेच्याच अंगाने काही हरकती वेगळ्या घेतल्या आहेत, त्यादेखील कवितेच्या अनुरोधानेच घेतल्या आहेत. कवितेतील शब्दांची जपणूक कशी करायची, यासाठी देखील हे गाणे एक सुरेख उदाहरण ठरावे. चालीत तोच तोपणा येऊ नये पण चाल उगीचच अवघड होऊ नये - संगीतकार म्हणून डावजेकर इथे फार स्पृहणीय कामगिरी करतात. शब्दरचना सोज्वळ आहे तेव्हा चालीचे ‘कुळशील’सुद्धा त्याच धर्तीवर असणे जरुरीचे आहे, हा विचार प्रधान आहे.

बोलाविन घुमती वाद्ये तालात नाचते प्रीती
शब्दाविण होती गीते बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला, हे कुण्या प्रभूचे देणे

संगीतकार म्हणून दत्ता डावजेकरांचे मूल्यमापन करायचे झाल्यास, एकूणच समग्र कारकिर्दीचा व्यापक विचार  केल्यास, संगीतगरजेपोटी शब्दांची ओढाताण करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी फार कमी वेळा घेतले. ताल शक्यतो पारंपरिक स्वरूपातच वापरले आणि शक्यतो भारतीय वाद्यांवरच भर ठेवला. अर्थात अपवादस्वरूप काही गाणी आढळतात. गीताच्या आरंभी किंवा अंती लकेर त्यांची लकब लक्ष वेधून घेते.

आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे सर्वांग तयात मी न्हाले,
सौंदर्य जीवना आले, जन्माचे झाले सोने

या आणि अशाच विधानांना पूरक असे हे प्रस्तुत गाणे आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link