Next
बिटकॉइनमध्ये खंडणीखोरी
निखिल महाडेश्वर
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

सायबरजगतातील खंडणीखोरीत आता बिटकॉइन या आभासी चलनाचा सर्रास वापर सुरू झाला असून तुमच्या मोबाइल किंवा संगणकप्रणालीतील डेटा चोरून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू आहेत.
रॅनसमवेअर अॅटॅक म्हणजेच तुमच्या मोबाइल किंवा संगणकप्रणालीत एखादा हल्लेखोर कीडा शिरून तुमचा डेटा गिळंकृत करतो. तुमच्या मोबाइल किंवा संगणकातील फोल्डर्स लॉक झाले असून ते अनलॉक करायचे असतील, तर $३००च्या किमतीचे बिटकॉइन अमुक एका बिटकॉइन पत्त्यावर (address) पाठवा, असा संदेश तुम्हाला धाडला जातो. कित्येक प्रकरणांत बिटकॉइनचा भरणा केल्यानंतरही डेटा decrypt होईल याची खात्री नसते. अलिकडेच एका मोबाइल रॅनसमवेअर हल्ल्यामध्ये Leaker Locker नावाच्या एका रॅनसमवेअरने Wallpapers Blur आणि HD Booster & Cleaner Proच्या माध्यमातून मोबाइलप्रणालीत प्रवेश केला होता. त्यामुळे मोबाइलचा स्क्रीन लॉक होऊन जायचा व त्यावर पुढचा संदेश उमटायचा. ‘७२ तासांत अमुक लिंक वर $१००भरा  अन्यथा तुमच्या फोनमधील फोटो, व्हिडिओ, चॅट, ब्राऊझिंग हिस्टरी हे सारे तुमच्या संपर्कांना तुमच्या इमेलवरून शेअर केले जाईल.’

पोर्नचे मोहजाल
कित्येक लोक प्रॉक्सी सर्व्हर लावून एखादा डाऊनलोड केलेला व्हिडिओ १०० लोकांमध्ये शेअर करून, वेगवेगळ्या लिंकवरून पोर्न व्हिडिओ बघतात. अशा चौर्यकर्माचा त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
फेसबुक सर्फिंग करताना अशा व्यक्तींनी काही पोर्न लिंकवर क्लिक केले. फेसबुकच्या १,१०,००० वापरकर्त्यांना त्याचा फटका बसला. हॅकर्सनी पोर्न व्हिडिओच्या काही बनावट लिंक्स तयार केल्या व त्या सोशल मीडियावर व्हायरल केल्या. लोकांनी पोर्न व्हिडिओ बघायला मिळेल, या लालसेने त्यावर क्लिक केले. तेव्हा त्यांच्या मोबाइलवर असा संदेश आला, की ‘व्हिडिओ बघायचा असल्यास लिंकवरील Flash Player download करा.’ अनेकांनी तो डाऊनलोड केला. शेवटपर्यंत तो व्हिडिओ दिसला नाही, परंतु फ्लॅशप्लेअरऐवजी त्यांच्या मोबाइल किंवा संगणकामध्ये एक मालवेअर येऊन बसला. या मालवेअरने सर्व डेटा गिळंकृत केला. तुमचा खासगी डेटा बाहेर प्रसिद्ध होऊ द्यायचा नसेल, तर अमुक एक डॉलर्स किंवा बिटकॉइन द्या, असे इमेल या लोकांना मिळाले. पोलिसांकडे कुठल्या तोंडाने जाणार, या भीतीने कुणी पोलिसठाणे गाठले नाही.

चॅटिंग, चॅटिंग...
चॅटिंगमध्ये व्हॉटस्अॅप, फेसबुक मेसेंजर, हाइक, वायबर, लाइन, गुगल ड्युओ, स्काइप, वुई चॅट, स्नॅपचॅट आदी अॅपचा वापर केला जातो. त्यात “Hi I’m lonely, I am feeling alone, want a sex chat? Want to have fun? Want to go for a date?” अशा प्रकारच्या चॅटने सुरुवात होते. बऱ्याच वेळा समोरची व्यक्ती तुमच्या Display Picture ची तारीफही करते. तुमच्या व्यक्तिमत्त्वावर भाळल्याचे दाखवते आणि तुम्हीही त्या मोहक संदेशांना भुलून पुढचे गुफ्तगू सुरू करता. काही वेळातच हे नार्मल चॅट  एका सेक्स चॅटच्या दिशेला जाते. तेव्हाच ही समोरची व्यक्ती उत्तान फोटो शेअर करण्यास तुम्हाला भाग पाडते. त्यांच्याकडे पुरेसे फोटो, व्हिडिओ, चॅट मेसेज जमल्यावर ती व्यक्ती तुमचे ब्लॅकमेलिंग सुरू करते. त्यासाठी बिटकॉइनच्या रूपात खंडणी मागितली जाते. खंडणी अदा केली नाही, तर तुमचे फोटो, व्हिडिओ, चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. सायबरजगतामध्ये बिटकॉइनचा वापर आजकाल बेकायदा शस्त्रखरेदी, बनावट पासपोर्ट बनवणे, अंमली पदार्थांची खरेदी, मारेकऱ्याची सुपारी देणे, बनावट नोटा बनवून घेण्यासाठी, हॅक झालेल्या आधारकार्डाची माहिती विकत घेण्यासाठी तसेच बड्या कंपन्यांची गोपनीय माहिती विकत घेण्यासाठी केला जातो.

काय खबरदारी घ्याल?
 कुठल्याही प्रकारच्या अॅटॅचमेन्ट किंवा प्रोग्रामवर क्लिक करण्याआधी अँटिव्हायरसने त्याला स्कॅन करा. ती अॅटॅचमेन्ट नक्की कायदेशीर स्रोतांमधून आली आहे ना, याची खातरजमा करा. अन्टि-हॅकिंग, अन्टि-व्हायरस, अन्टि-रॅनसमसाठीची सशुल्क सॉफ्टवेअर किंवा अॅप्स तुमच्या लॅपटॉप, संगणकात किंवा मोबाइलमध्ये इन्स्टॉल करा. ऑफलाइन किंवा ऑनलाइन बॅकअप घ्या. मोबाइलमध्ये अनोळखी स्रोतांवरून अप्स इन्स्टॉल करू नका.
 कुठल्याही पोर्न लिंक्सवर क्लिक करू नका. पोर्न व्हिडिओ बनवायला खर्च येतो, ते फुकट तुम्हाला दाखवायला बसलेले नाहीत. सायबर खंडणीखोरीतूनच ते हा पैसा कमावतात. कुठलाही पोर्न Share it, xender  सारख्या शेअरिंग अॅपवरून घेऊ नका. तुम्हाला वाटेल तुम्ही फक्त व्हिडिओ बघताहात. परंतु त्यामागून तुमचे कॉल रेकॉर्डिंग, एसएमएस, चॅट्स, ब्राऊझिंग हिस्टरी, हा सारा तपशील हॅकरला मिळतो व या साऱ्या तपशिलाचा वापर करून तो तुमच्याकडे खंडणी मागू शकतो.
 काही सुंदर डीपी पाहून एखाद्या फेक प्रोफाइलला बळी पडाल. या मोहजालात अडकू नका व ऑनलाइन अश्लील चॅट करू नका. छायाचित्रे, व्हिडिओ व इतर वैयक्तिक माहिती तर मुळीच शेअर करू नका. अशाने तुम्ही तुमची नोकरी, कंपनी, करिअर, पैसा सगळेच गमावाल. फेक प्रोफाइल रिपोर्ट करण्याचा पर्यायही असतो. तसे आढळल्यास ते रिपोर्ट करा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link