Next
इंद्रधनुष्य आणि विनाशकथा
ललिता बर्वे
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

‘स मव्हेअर ओव्हर द रेनबो... द ड्रीम्स दॅट यू ड्रीम, रिअली कम ट्रू…’
जुडी गार्लण्डचं ‘विझार्ड ऑफ ओझ’ या चित्रपटातलं हे गाणं. साल १९३९. गाणं सुंदर आणि त्यामागची कल्पना तर अतिशय सुंदर. इंद्रधनुष्य हे दृश्य इतकं नितांत रमणीय, की पाहणाऱ्यानं हरवून जावं. मग आपल्या पुराकथा तरी त्याच्याभोवती अद्भुत कथा गुंफल्याशिवाय कशा राहणार! इंद्रधनुष्य झळकण्यापूर्वी पाऊस पडलेला असतो, त्याचा आनंद असतो. अखेर पाऊस थांबून ऊन पडतं, त्याचाही आनंद असतो! इंद्रधनुष्याच्या कथांमध्ये हे दोन्ही घटक दिसतात.
बायबलमधल्या ज्या प्रलयातून नोहा वाचला, त्याच्या अखेरीला इंद्रधनुष्य उगवलं. त्याचे सात रंगांचे पट्टे म्हणजे देवानं नोहाशी केलेला सात-कलमी करार, की आता परत कधीही असा सर्वविनाशक पूर येणार नाही आणि माणूस पृथ्वीपासून असा दुरावणार नाही, इत्यादी. या कराराला सात नोहाइद लॉज असंच म्हटलं जातं. पापभिरूपणे जगून मोक्ष मिळवण्याचा तो राजमार्ग! सुमेरियन कथेमध्ये इष्टार या देवतेनं आपल्या गळ्यातून हार काढून उंचावला, तेच हे इंद्रधनुष्य. यामधून आपल्या पुरामध्ये नाहीशा झालेल्या मुलांची आठवण ती जागती ठेवते. ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींनीही असाच पूर अनुभवला होता. त्यांच्या लेखी देवानं पाऊस पाडणाऱ्या ढगांना इंद्रधनुष्यानं बांधून ठेवलं आहे. किती यथार्थ निरीक्षण आहे ना हे! तसंच निरीक्षण दिसतं आयर्लंडच्या गोष्टीत. लेप्रकॉन हा एक बुटका जादूगार. तो इंद्रधनुष्याच्या शेवटी असलेल्या हंड्यात आपलं सोनं लपवून ठेवतो. यातली जादू अशी आहे, की जसं क्षितिज हा एक दृष्टिभ्रम, तसा इंद्रधनुष्य हाही एक दृष्टिभ्रम. बघणाऱ्यानं त्याच्या जितकं जवळ जावं, तितकं ते पुढे पळतं. म्हणजे लेप्रकॉनचं सोनं कधीच कुणाला सापडणार नाही!
आपण पाहिलेल्या बऱ्याचशा कथांमध्ये जगाचा विनाश प्रलयानं घडून येतो, पण हे काही पूर्णपणे खरं नाही. जसा ज्या लोकांचा अनुभव, तशा त्यांच्या विनाशकथा. अवेस्ता-झोरास्ट्रियन-पारशी लोकांच्या धर्मग्रंथातली कथा पाहिली तर असं दिसतं, की त्यांच्याकडे सैतान होता कडक हिवाळा. ओहरमाझदा या देवानं जामला सांगितलं, की तू माझ्याकडून धर्माचा स्वीकार कर आणि तो सर्व माणसांपर्यंत पोचव. जामनं असं काही करायला नकार दिला. मात्र त्यानं सर्व माणसांना रोगराई आणि मृत्यूपासून वाचवण्याचं आणि त्यांना समृद्ध बनवण्याचं काम मात्र केलं. परंतु याचा परिणाम असा झाला, की माणसं, प्राणी, पक्षी, सर्वांचीच संख्या अतोनात वाढली. मग देवानं जामला काही जादू शिकवली होती, त्याच्या मदतीनं जाम पृथ्वी मोठी करत राहिला, तेही तीन वेळा. मग मात्र देवानं जामला सांगितलं, की आता जीवघेणा हिवाळा येतो आहे. जंगल, दऱ्या, डोंगर सर्व काही बर्फानं भरून जाणार आहेत. जेव्हा बर्फ वितळेल, तेव्हा सर्व दाणा-वैरण त्याच्याबरोबर वाहून जाईल. मग तुला एखाद्या मेंढीचं नखही दिसणार नाही. तेव्हा तू आताच एखादा भूमिगत आसरा बांध. त्यामध्ये तू प्रत्येक जातीच्या प्राण्याची जोडी घेऊन जा. शारीरिक किंवा मानसिक वैगुण्य असणारं कोणी नको. आपल्याला सर्वोत्तम तेवढंच हवं. झोरास्ट्रियन परंपरेप्रमाणे ओहरमाझदा जे-जे म्हणून तयार करतो, त्याला प्रतिरोध करणारं काहीतरी दुष्ट आत्मा तयार करतो. लोकसंख्या कमी व्हावी, म्हणून दुष्ट आत्म्याचा हा प्राणांतिक हल्ला होता.
अशाच विनाशकथा कोरिया, थायलंड, ब्रह्मदेश, हवाई, एस्किमो, दक्षिण अमेरिका अशा जगभर आहेत, पण राग्नारॊक ही नॉर्स मायथॉलॉजीमधली गोष्ट फारच विशेष आहे. नॉर्स मायथॉलॉजी म्हणजे जर्मनीचा उत्तर हिस्सा आणि स्कँडिनेव्हिया, आइसलंड, इत्यादी भागांत प्रचलित मायथॉलॉजी. हे भाग उत्तर ध्रुवाला जवळचे. कडक हिवाळा आणि बर्फ हे इथले भौगोलिक विशेष. ‘पोएटिक एडा’ या नावाचा एक काव्यसंग्रह आइसलंडमध्ये तेराव्या शतकात शब्दबद्ध झाला होता. या संग्रहात असलेल्या ‘वालुस्पा’ या कवितेचा राग्नारॊकच्या गोष्टीवर प्रभाव आहे. आपल्याला ही कथा फारशी परिचयाची नाही, पण पाश्चात्त्य साहित्य, कला, संस्कृती, इत्यादींवर या गोष्टीचा फार खोल प्रभाव आहे. नेहमीप्रमाणे सुष्ट-दुष्टलढाई , विनाश आणि पुनर्निर्माण अशी ही कथा एवढी थरारक आहे, की तिचे तपशील वाचताना तुम्हीही थक्क व्हाल.
‘वालुस्पा’मधले अनुभव तत्कालीन माणसाला आले असले पाहिजेत. पण, राग्नारोकमध्ये अजून न घडलेल्या प्रसंगांच्या मालिकेचं वर्णन आहे. थोडक्यात म्हणजे ही एक भविष्यवाणी आहे. राग्नारोक या शब्दाच्या नेमक्या अर्थाबद्दल थोडा वाद आहे. परंतु त्याचा साधारण अर्थ देवांचा संधिप्रकाश, किंवा देवांचं अखेरचं प्राक्तन असा काहीसा होतो. राग्नारॊकमध्ये काय म्हणून नाही? त्यात भयंकर युद्ध आहे, भीषण नैसर्गिक आपत्ती आहे, सर्वनाश आहे आणि अखेर जगाची सुखद नवी सुरुवातही आहे.
राग्नारोकची सुरुवात होते कडक हिवाळ्यानं. सलग तीन वर्षं फक्त हिवाळा आहे. या काळात सूर्य निरर्थक बनतो आहे. शरम आणि तिरस्कार हे दोन लांडगे सूर्य आणि चंद्राला गिळतात. तारका नाहीशा होतात. पृथ्वी पूर्ण काळोखात दिसेनाशी होते. गगनाला भिडणाऱ्या ज्वाळा येतात. समुद्रातून वाफा येतात. आकाशाचे दोन तुकडे होतात. त्यातून परजलेल्या तलवारी सूर्याहूनही अधिक उंच जातात. पृथ्वी जबरदस्त हादरते. झाडं उन्मळून पडतात. पर्वत कोसळतात. माणसं आपली घरं-दारं सोडून पळ काढतात. नातेवाईक-मित्र एकमेकांच्या जिवावर उठतात. हिवाळा, मग भूकंप, मग ज्वालामुखी, त्सुनामी, असा निसर्गाचा नंगानाच चालू राहतो.
आता प्रतीकात्मक युद्धाला तोंड फुटतं. नॉर्स मायथॉलॉजीमध्ये दैवी जिवांना मुळीच तोटा नाही. या देव आणि राक्षसांमध्ये लढाई सुरू होते. नॉर्स मायथॉलॉजीप्रमाणे युद्धात वीरगती मिळालेले शूरवीर वालहाला नावाच्या स्वर्गात जातात. तर सामान्य मृत्यू आलेले लोक हेल नावाच्या नरकात जातात. हे वालहाला आणि हेल आता रिकामे होतात, कारण सर्व मृतात्मेही चांगल्या किंवा वाईट बाजूनं लढायला जातात. प्रचंड संहार होतो. माणसं, राक्षस, देव, सारेच मृत्युमुखी पडतात. एवढंच काय पण मृतात्मेही परत एकदा मरतात.
एवढ्या संहारातून वाचतात थोडे दैवी जीव तसेच लीफ आणि लिफ्थ्रॅसिस नावाचे स्त्री-पुरुष. यगद्रासिल नावाच्या आयुष्य-झाडामध्ये ते लपून राहिलेले असतात. पहाटेच्या दवावर ते जगलेले असतात. मग परत पृथ्वी पाण्यातून वर येते. आता सूर्य पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी असतो. एसिर नावाचे देव कुरणामध्ये त्यांची रुनिक नावाची लिपी शोधतात. - मनूला माशानं वेद मिळवून आणून दिले होते, त्याची इथे आठवण येते! पूर्वी देव खेळत असलेला एक सोनेरी खेळही त्यांना सापडतो. आता या नव्या जगात धान्य न पेरताच उगवतं. लिफ आणि लिफ्थ्रॅसिस नव्यानं माणसं जन्माला घालतात.
राग्नारोकची ही कथा आइसलंडच्या आणखीही काही साहित्यात येते. एवढी छोटीशी झलक पहिली, तरी त्यातली वर्णनं किती प्रभावी आहेत, हे लक्षात आलं असेल. एवढंच काय पण इंग्लंडमध्ये अशीही बातमी झळकली होती, की व्हायकिंग कॅलेंडरप्रमाणे (नॉर्स संस्कृतीतल्या) २२ फेब्रुवारी २०१४ या दिवशी राग्नारोक होणार आहे. अर्थातच मग भयंकर मोठी खळबळ उडाली! मग कळलं, की इंग्लडमधल्या यॉर्क इथल्या योरविक व्हायकिंग सेंटरनं काही कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्याची प्रसिद्धी करण्यासाठी त्यांनी अशी जाहिरात केली होती. अर्थात असल्या सवंग वाह्यातपणाबद्दल सेंटरवर चांगलीच टीका झाली!
या कथेतला हिंसाचार अगदी लक्ष्यवेधी आहे. त्याचं कारण असं असावं, की अतिथंड हवामानाच्या बर्फाळ प्रदेशात शेती फार होऊ शकत नाही. शिकार हाच पोट भरण्याचा मुख्य मार्ग. तेव्हा शिकारीबरोबर अशी हिंसा असणं अपरिहार्यच असतं. एकूणच व्हायकिंग काहीसा कठोर, त्यात शिकारी. शिवाय दुसऱ्याला मारतो तो शूर योद्धा आणि त्याला वालहाला नामक स्वर्गात जागा मिळते, ही समजूत. निसर्ग माणसाच्या सवयींना, स्वभावाला आणि पर्यायानं संस्कृतीला कसं वळण देतो, याचं हे आणखी एक उदाहरण.
जगभरातल्या प्रातिनिधिक विनाशकथांचा आपण आढावा घेतला. त्या सर्वांमध्ये एक आश्चर्यकारक समान धागा आहे. जगाची उत्पत्ती झाली तेव्हा त्यामध्ये खचितच आनंद होता. बायबल, मावरी, ग्रीक, पर्शियन, झिंगू, अशा कितीतरी कथांमध्ये उत्पत्ती होताना हिंसा तरी होती, किंवा चांगल्याचा बरोबरीनं वाईटही जन्माला आल्याचा विषण्ण भाव होता, पण विनाशकथांचा शेवट मात्र असा दुःखांत होत नाही, हे कसं? कारण विनाश होतो तो मुळी नवीन निर्मिती व्हावी म्हणूनच! एवढा विनाश झाल्यावर आधीच्या निर्मितीची किंमत कळलेली असते आणि मग अगदी दैवी शक्तीही माणसाच्या बाजूनं उभी राहते. म्हणून तर देव नोहाशी करार करतो, की परत असा पाऊस पाडणार नाही. देवांनाही माणसाचे हाल पाहून रडू येतं. कारण माणसं नसतील, तर देवांना देव कोण म्हणणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व विनाशाच्या शेवटी ही कथा रचणारा पुराकथाकार जिवंत राहिलाच की! म्हणून तर विनाशकथा शोकांतिका नसतात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link