Next
डॉक्टरांच्या मदतीला कृत्रिम बुद्धिमत्ता
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

“आरोग्यकेंद्रातले नवे डॉक्टर मागच्या डॉक्टरांपेक्षा चांगले आहेत ना?’ साहेबांनी विचारलं. त्यावर सरपंच म्हणाले, ‘मागच्या डॉक्टरांपेक्षा हे डॉक्टर चांगले आहेत. आधीचे डॉक्टर न्यूमोनिया झाला आहे म्हणायचे, पण रोगी काविळीनं मरायचा. नवे डॉक्टर काविळीचं निदान करतात आणि रोगी काविळीनंच मरतो,’” प्रथमेशने सांगितलेल्या या विनोदावर सगळेजण काहीशा विषादाने हसले.
“डॉक्टरांची निदानं चुकणं हा जगभरचाच प्रश्न आहे,” राहुलदादा म्हणाला, “ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अमेरिकेत दरवर्षी लक्षावधी रोग्यांचं निदान करताना डॉक्टर चुकतात. चुकीच्या निदानामुळे सुमारे अडीच लाख लोक दगावतातदेखील.”
“बापरे!” अमना म्हणाली, “इतक्या प्रगत देशातही निदानात एवढ्या चुका होतात?”
“हो,” राहुलदादा म्हणाला, “डॉक्टरांचे पूर्वग्रह, स्वतःच्या ज्ञानाविषयीचा अहंकार, विविध शक्यतांचा साकल्यानं विचार न करण्याची प्रवृत्ती आणि निदानासाठी दिलेला अपुरा वेळ ही यामागची प्रमुख कारणं आहेत.”
“पण यावर उपाय काय?” सानियाने विचारले.
“शास्त्रज्ञांनी बनवलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साहाय्यकामुळे ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे,” विद्याताई म्हणाली.
“पण संगणकाची निदानं कितीशी अचूक असणार?” सोहमने विचारले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संगणकांनी केलेल्या निदानांची अलिकडेच डॉक्टरांनी केलेल्या निदानांशी तुलना करण्यात आली,” स्वप्निलदादा म्हणाला, “इंग्लंडमधल्या ‘रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स’ या संस्थेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच नव्या डॉक्टरांना प्रॅक्टिस करता येते. या परीक्षेला संगणकाला बसवलं तेव्हा संगणकाने ८१ टक्के गुण मिळवले. याउलट, गेल्या पाच वर्षांतल्या नव्या डॉक्टरांचे या परीक्षेतले सरासरी गुण ७२ टक्के होते. म्हणजेच, नव्या डॉक्टरांप्रमाणे संगणकालाही प्रॅक्टिस करण्याचा परवाना नक्कीच मिळाला असता. असं असलं तरी सध्या संगणक हा स्वतंत्रपणे प्रॅक्टिस न करता डॉक्टरांचा तत्पर साहाय्यक म्हणूनच काम करणार आहे. अंतिम निदान करण्याची जबाबदारी संगणकावर नव्हे तर डॉक्टरांवरच असेल.”
“मग संगणकाचा फायदा काय?” प्रथमेशने विचारले.
“संगणकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या प्रचंड वेगामुळे तो रोग्याच्या आतापर्यंतच्या आरोग्यविषयक सर्व गोष्टींची माहिती पटापट धुंडाळू शकतो,” राहुलदादा म्हणाला, “आतापर्यंतच्या विविध चाचण्या, घेतलेल्या लसी, वेळोवेळी आणि सातत्यानं घेत असलेली औषधं, रोग्याला असलेली पथ्यं, ॲलर्जी अशा गोष्टींमधून आताच्या लक्षणांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी संगणक झटकन वेगळ्या काढू शकतो. रोग्यांचा मध्यवर्ती डाटाबेस असल्यास रोगी कोणत्याही डॉक्टरांकडे गेला तरी पूर्ण माहिती उपलब्ध राहील. तसंच, आताच्या आजारपणाच्या लक्षणांशी संबंधित संभाव्य रोगांची यादी मध्यवर्ती रोगलक्षणांच्या डाटाबेसमधून संगणक लगेच शोधून देईल. यामुळे डॉक्टरांना निदानाच्या सर्व शक्यतांचा विचार अतिशय कमी वेळात करता येईल. तसंच, त्यातली एखादी शक्यता निवडल्यावर त्या निदानाची खात्री करून घेण्यासाठी आणखी चाचण्या करायला हव्यात का, त्या आजारावर उपलब्ध असणारी औषधं, रोग्याच्या प्रकृतीच्या पूर्वानुभवावरून त्यापैकी कोणती औषधं टाळावीत अशा गोष्टीही संगणक सुचवेल.”
“पण सगळ्या डॉक्टरांकडे अशी संगणकप्रणाली असायला हवी. विविध चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा आणि सुसज्ज रुग्णालयंही असायला हवीत. हे सगळं श्रीमंत देशांतल्या लोकांना आणि आपल्याकडच्या मूठभर श्रीमंतांना उपयोगी पडेल. त्यांचा सर्वसामान्यांना काय उपयोग?” मुक्ताने विचारले.
“हे संशोधन प्रामुख्यानं प्रगत देशांमध्ये चाललं असलं तरी विकसनशील देशांमध्येही या सुविधा कशा उपलब्ध होतील, यासाठीही प्रयत्न चालू आहेत,” तनुजाताई म्हणाली, “विकसनशील देशांमध्येदेखील डॉक्टरांकडे चांगले मोबाइल फोन असतात. या मोबाइल फोनवरून योग्य ते ॲप वापरून डॉक्टरांना रोग्याच्या डेटाची नेटवरून सहजपणे देवाणघेवाण करता येईल. तसंच, सर्वांचा डेटा साठवण्याची सोय असणारी आणि सर्व वैद्यकीय ज्ञान जिथे उपलब्ध आहे अशी वेबसाइट त्या-त्या देशाचं सरकार तयार करू शकतं. यामुळे ज्या खेड्यामध्ये मोबाइल फोन वापरता येतो, त्या खेड्यामधले डॉक्टरदेखील निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरू शकतील.”
“पण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणं हेच खूप खर्चीक असेल त्याचं काय?” सानियाने विचारले.
“कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणं खर्चीक नसतं,” विद्याताई म्हणाली, “आजही गुगलवरून हव्या त्या माहितीचा शोध घेताना आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो. गुगल भाषांतरात फार मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळेच इंग्रजीपासून चिनी-जपानीपर्यंत कोणत्याही भाषेतल्या एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला पटकन मराठीत पाहता आणि ऐकताही येतो. आपण या सर्व गोष्टींचा हवा तेवढा विनामूल्य वापर करतो. त्यामुळे डॉक्टरांनाही निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय कमी खर्चात नक्कीच वापरता येईल.”
“रोगांच्या निदानासाठी कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्यांसाठी खेड्यापाड्यांमध्ये प्रयोगशाळा कुठे असतात?” शाश्वतने विचारले.
“यासाठी मोबाइल फोनला जोडता येण्याजोगी अनेक छोटी-छोटी उपकरणं वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये बनवण्यात येत आहेत,” स्वप्निलदादा म्हणाला, “अशी उपकरणं जोडून विविध रक्तघटकांचं प्रमाण, हृदयस्पंदनांचा आलेख अशा गोष्टी नोंदवून मध्यवर्ती संगणकाकडे पाठवता येतील. ही उपकरणं कमीत कमी खर्चात बनवण्याकडे विशेष लक्ष दिलं जातंय. प्रचलित उपकरणांच्या ५ ते १० टक्के किमतीत यातली काही उपकरणं उपलब्ध व्हायला लागली आहेत. तसंच मोबाइलचा कॅमेरा वापरून घेतलेल्या प्रतिमा निदानासाठी वापरण्यावरही संशोधन सुरू आहे. नव्या उपकरणांनी केलेल्या चाचण्यांची तुलना प्रचलित उपकरणांनी केलेल्या चाचण्यांशी करून अशा नव्या चाचण्यांचा वापर करूनही योग्य ते निदान करता येतं, हे संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भविष्यात खेड्यापाड्यातही रोगांचं अचूक निदान होऊन रोग्यांना योग्य ते उपचार मिळतील.”
“अरे वा! म्हणजे मानवानं जन्माला घातलेली कृत्रिम बुद्धिमत्ता आता मानवाला आरोग्यमय जीवन बहाल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार तर!” मुक्ता कौतुकाने उद्गारली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link