Next
‘वाणी कारभारणीची’, मोबाइल प्रबोधनाची!
संगीता मालशे
Friday, June 07 | 03:00 PM
15 0 0
Share this story


सुनीताताई नेहमीप्रमाणे घरची कामे आवरून ग्रामपंचायतीच्या कामासाठी लगबगीने निघाल्या. आज त्यांना बजेटसंबंधी नेमकी माहिती घ्यायची होती. पहिल्यांदा निवडून आल्यामुळे तसे त्यांना ग्रामपंचायतीचे फारसे समजत होते, अशातला भाग तर नव्हता. परंतु महिला राजसत्ता आंदोलनाच्या ताईंची सोबत असल्यामुळे त्यांना फारशी भीती वाटत नसे. आजही असेच झाले.

त्या आत्मविश्वासाने ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या. ग्रामसेवकाला बजेटच्या नोंदी दाखवायला सांगितल्या आणि त्यातील नेमके मुद्दे त्यांनी लिहून घेतले. बजेटमधले भीतिदायक वाटणारे आकडे त्यांनी लीलया वाचले आणि मोजलेसुद्धा. त्याविषयीचे महत्त्वाचे मुद्दे ग्रामसेवक व अन्य सदस्यांना विचारून गावाच्या बजेटमध्ये झालेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला आणि निकालात न निघालेले निर्णय घेण्यासाठी त्यांनी पुन्हा बैठक बोलावली. ग्रामपंचायतीचे सर्वच सदस्य आणि विशेषत: ग्रामसेवक अवाक् झाले. आज सरपंचताईंना झाले तरी काय? आज ग्रामसेवकाला हाजी-हाजी करून माहिती विचारण्याऐवजी एकदम स्वत:च कशा बोलत्या झाल्या, हे काही त्यांना उमगेना.

मोठ्या आत्मविश्वासाने ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या सुनीताताईंना मात्र, महिला राजसत्ता आंदोलनाचे खूप खूप आभार मानायची इच्छा झाली. ही करामत होती, महिला राजसत्ता आंदोलनाने सुरू केलेल्या ‘वाणी कारभारणीची’ या मोबाइल कार्यक्रमाची. दर आठवड्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमातून महिला सदस्य आणि सरपंच यांना पंचायतराजविषयी आणि त्यांच्या दैनंदिन कामकाजाविषयीच्या महत्त्वपूर्ण विषयांवर मोलाची माहिती अगदी कमी वेळात पोहोचवायची किमया साध्य झाली होती.

महिला राजसत्ता आंदोलनाने अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ‘वाणी कारभारणीची’ हा मोबाइल आधारित उपक्रम सुरू केला. झटपट व मोफत मार्गदर्शन आणि सहकार्य तुमच्या दारी, या हेतूने सुरू झालेला हा कार्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला लोकप्रतिनिधींसाठी खूप मोलाचा ठरला.

खरे तर, स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या संघटिका या कारभारणींच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहायच्या, मात्र शेकडो ग्रामंपचायतींचा आवाका एकावेळी पेलणे, म्हटले तर तसे सोपे काम नव्हते.. मग एकाच वेळी या कारभारणींकडे वेळेवर कसे पोहोचायचे, याचे उत्तर शोधणे सुरू होते.

याआधी गावा-खेड्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक, आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ‘कम्युनिटी रेडिओ’ या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. पण, कारभारणींच्या कामातील मार्गदर्शक वा मित्र म्हणून मोबाइल फोनने काम करणे, हे थोडे हटके असे काम होते.

‘अगं, फोन करायला नाही जमले तर, मेसेज कर ना! व्हॉट्स अॅप मेसेज पाठव आणि रेंज नसेल तर, साधा मेसेज पाठव. मग ठरवूया भेटायचे कधी ते’! असे संवाद सहसा आपल्याला ऐकू येत असतात. आता मोबाइल हे आधुनिक संवादाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. पूर्वी ट्रिंग-ट्रिंग हा फोनचा आवाज स्टेटस सिम्बॉल म्हणून ओळखला जायचा, त्या दूरध्वनीचा जमाना आता मागे पडला. सध्या तो औपचारिक कामांसाठी कंपनी तसेच विविध कार्यालयांमधून वापरला जात असला तरी त्याचा घरगुती वापर खूप प्रमाणात कमी झाला आहे. मग लोक संवाद कसा करतात? तर आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे आपला सांगाती होऊन फिरणाऱ्या मोबाइल फोनचा आधार घेऊन.

दर आठवड्याला साधारणतः १ ते ३ मिनिटांची ऑडिओ क्लिप तयार करून नोंदणी केलेल्या कारभारणींच्या मोबाइलवर पाठवली जायची. कारभारणी आपल्या कामात नेहमीच व्यग्र. कुटुंबात गृहिणी म्हणून, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वा शेतीचे काम करणाऱ्या शेतकरी महिला म्हणून आणि ग्रामपंचायतीत सरपंच वा सदस्य म्हणून. तेव्हा आपली कामे उरकताना मोबाइलचा आवाज मोठा करून ती माहिती ऐका, असे पर्याय समोर होते. बरे, यासाठी अगदी स्मार्टफोन असण्याचीही गरज नव्हती. साधा हॅन्डसेटही या कामासाठी मोठा आधार ठरला. गरज होती, ती फक्त या कार्यक्रमासाठी नावनोंदणी करण्याची.

औरंगाबाद जिल्ह्यातील सईदाताई या सरपंच असलेल्या कारभारणीची तक्रार मात्र वेगळीच होती. ज्या वेळेला हा मेसेज येतो, त्या वेळेला नेमके कामाच्या व्यग्रतेमुळे तो मेसेज नीट ऐकताच येत नसे. त्या खूप निराश झाल्या. मी या सेवेचा काही लाभ घेऊ शकत नाही, या व अशा अनेक शंकांनाही या कार्यक्रमाने पर्याय शोधले. हा व्हॉईस मेसेज साठवून ठेवण्याची म्हणजे सेव्ह करण्याची तरतूद या कार्यक्रमात केली गेली.

मेसेजमधील माहिती ऐकून त्या मुद्द्यांसंबंधी अडीअडचणींवर मात कशी करायची, याचे ठोकताळे त्यांनी बांधायचे आणि आलेल्या अडचणींना विश्वासाने सामोरे जाऊन तो प्रश्न सोडवायचा, अशी सोपी रीत या कार्यक्रमाने तयार केली. अगदीच गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यावर मात्र स्थानिक कार्यकर्त्या प्रत्यक्ष मदतीला जात.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत आंदोलनाने सुमारे १०१९४ महिला कारभारणींच्या नेतृत्वविकासाला चालना दिली. त्याचबरोबर या महिलांना पंचायतीविषयी मार्गदर्शनही देण्यात आले. यात राखीव बजेट, ग्राम पंचायतीच्या विविध योजना, कायदे, यांची अगदी सोप्या व मर्यादित शब्दात माहिती पोहोचवली जायची.

हा संवाद जरी एकतर्फी असला तरी, त्याविषयीचा अनुभव मांडण्याची जागा या कार्यक्रमात होतीच. प्रत्येक मेसेजनंतर एक सोप्पा कृतिकार्यक्रमही महिला लोकप्रतिनिधींना दिला जायचा. अतिशय उपयुक्त व मोफत मिळणाऱ्या माहितीचा आपल्या गावातील इतर महिलांनाही उपयोग कसा होईल, याचा विचारही त्यांनी केला. विविध कार्यक्रमातून एकत्र आल्यावर किंवा कॉल करून प्रामुख्याने या मेसेजवर जास्त चर्चा व्हायची.

आता गावाखेड्यांमध्ये, एकवेळ पिण्याला पाणी नसेल, रस्ते कच्चे असतील, पण या माध्यमक्रांतीने गरिबातील गरीब व्यक्तीकडे मोबाइल फोन हे साधन दिले आहे. या माध्यमक्रांतीमुळे गावाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी झालेल्या महिला लोकप्रतिनिधींच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडून आला, यात शंका नाही. तंत्रज्ञानाची साथ घेत, मौखिक परंपरेचा वारू पुढे नेणाऱ्या या माध्यमाला आमचा सलाम!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link