Next
वाचकांची पत्रे
-
Saturday, May 25 | 12:00 PM
15 0 0
Share this story

परिपूर्ण, तरीही काही अपेक्षा आहेत!
‘झी मराठी दिशा’चा मी नियमित वाचक आहे. आशय, मांडणी या सर्व अनुषंगाने हे आठवडापत्र खूपच छान वाटते. जंगलातले दोस्त, मिष्किली, करिअरच्या खाचाखोचा, टेक्नो टॉक, विस्मृतीतील पदार्थ, कुतूहलकट्टा यांसारखी विविध सदरे वाचनीय आहेत. हे आठवडापत्र मला आवडत असल्याने माझ्या काही अपेक्षाही आहेत. या आठवडापत्रात हॉलिवूड व बॉलिवूड चित्रपटांविषयी अपवाद वगळता फारसे काही दिसून येत नाही. तसेच, सध्या चर्चेत असलेल्या वेब सीरिजविषयीही काही प्रमाणात मजकूर असावा असे वाटते. कधी कधी काही लेखांतील मजकूर फारच धीरगंभीर वाटतो. त्यामुळे तो थोडासा खुसखुशीत, मनोरंजनात्मक, करमणूकप्रधान केल्यास आणखी चांगले होईल. गतकाळातील किंवा इतिहासातील घटना-घडामोडींवरच मोठ्या प्रमाणावर लेख आहेत असे जाणवते. त्यामुळे वर्तमानकाळ आणि भविष्यकाळविषयक काही विशेष लेख प्रसिद्ध केल्यास अधिक चांगले होईल, असेही वाटते. मांडणीच्या अनुषंगाने एखाद्या लेखाचा शिल्लक राहिलेला मजकूर दुसऱ्या पानावर देणे योग्य वाटत नाही. अगदीच थेट सांगायचे, तर प्रत्येक लेखाची शब्दमर्यादा कमी असावी. स्पर्धापरीक्षेच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने काही मान्यवर तज्ज्ञांचे अगदी मूलभूत स्वरूपात लेखन सुरू झाले तर तरुणांना या आठवडापत्राशी जोडून घेणे अधिक सुलभ जाईल. एक सदर वगळता अन्य काही आध्यात्मिक लेखन दिसत नाहीत. पुढील काळात डोळस अध्यात्म शिकवणारे लेखन सुरू केल्यास ते मनःशांती करणारे ठरेल. लहान मुलांसाठी असणारी खास बालकिशोर सदरातील दोन्ही पाने अतिशय छान आहेत. पर्यटनविषयक व विदेशातील काही प्रेक्षणीय स्थळे, त्यांचा इतिहास अशा स्वरूपाचे एखादे नवीन सदर वाचायला नक्कीच आवडेल. असे सदर सध्या दिल्ली महानगराविषयी प्रसिद्ध होत असून तेही वाचनीय आहे.
- संजय पाठक, सोलापूर   

होय, आता प्रश्न सोडवूया
शनिवार, ११ मेच्या अंकातील ‘आता प्रश्न सोडवुया’ हा संपादकीय लेख महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाचा असून सर्वांचे डोळे उघडणारा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनवले आहे. या वर्षी उन्हाळा महाभयंकर असून सगळीकडील पाणीसाठा केव्हाच संपला आहे. माणसांना खाण्यासाठी अन्नधान्य मिळते, परंतु जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. यात एक चांगली बाब म्हणजे राज्यसरकार संवेदनशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: कार्यक्षम आहेत. मात्र नोकरशाही भ्रष्ट असल्यामुळे सरकार कोणाचेही असो, भ्रष्टाचार थांबत नाही किंवा कमीही होत नाही, उलट वाढतोच आहे. एका आमदारमहोदयांनी स्वत:च्या वैद्यकीय खर्चाच्या ८३ लाख रुपयांच्या बिलासाठी सरकारी तिजोरीतील ४३ लाख रुपये उचलले. आमदारांच्या वैद्यकीय बिलांना कोणतीही मर्यादा नाही. सध्या महाराष्ट्र कर्जाखाली असून तो दुष्काळाने होरपळत आहे. अशा वेळी आमदारांच्या वैद्यकीय खर्चासाठी पुरवला जाणारा पैसा कुठून उपलब्ध केला जातो, हे सरकारने जाहीर करावे.             
- आर.के. मुधोळकर, नांदेड                      

कोकणातील प्लास्टिककचरा रोखा
सध्या कोकणात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. तारकर्ली, देवबाग, चिवला, कोळंब, सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवणी जेवण व खाद्यपदार्थ या सगळ्यांची पर्यटकांना भुरळ न पडली तरच नवल! परंतु काही पर्यटक प्लास्टिकच्या बाटल्या आणि वेफरची रिकामी पाकिटे इतस्तत: फेकत असल्याने त्यांचा खच पडलेला दिसतो. कोकणाच्या निसर्गसौंदर्याला यामुळे डाग लागत आहे. शासनाने ‘प्लास्टिकच्या बाटल्या व पाकिटांचा कचरा रस्त्यावर फेकू नये’ असा सूचनाफलक लावणे गरजेचे आहे. अन्यथा कोकणात कित्येक टन प्लास्टिकचा कचरा जमा होईल आणि कोकणच्या निसर्गसौंदर्याला त्याचा फटका बसेल.
- मयूर प्रकाश ढोलम, जोगेश्वरी, मुंबई
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link