Next
दुष्काळाविरोधात एकवटले अनंत हात
पुरुषोत्तम गुळवे
Friday, May 17 | 03:00 PM
15 0 0
Share this story

संपूर्ण राज्यात दरवर्षी अत्यल्प व अवेळी पडणाऱ्या पावसाने गंभीर वळण घेतले आहे. केंद्र व राज्य सरकार स्वतंत्रपणे व संघटित प्रयत्नांनी या समस्येवर उपाय शोधत आहे. राज्यातील ग्रामीण भागात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अपार कष्ट करावे लागत आहेत. ही समस्या भीषण बनली आहे. थेंब थेंब पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकावे लागत आहे.
सरकारप्रमाणेच सामाजिक संघटनाही दुष्काळ संपवण्यासाठी जाणीवपूर्वक लढा देत आहेत. यातील अभिनेते आमिर खान यांची पाणी फाउंडेशन व शांतिलाल मुथा यांची ‘बीजेएस’ म्हणजे भारतीय जैन संघटना यांनी आपल्या नियोजित उपाययोजनेद्वारे आणि अथक परिश्रमाने ग्रामीण भागात आशेचे किरण निर्माण केले आहेत.
दरवर्षी रखरखत्या उन्हात गावातील आबालवृद्ध उमेदीने बीजेएस व पाणी फाउंडेशनच्या लोकचळवळीत हिरिरीने भाग घेऊन आपल्या गावांना पाणीदार बनवत आहेत. दुष्काळाविरोधातील लोकचळवळ समर्थपणे उभी करण्यात पाणी फाउंडेशनला यश मिळाले आहे. त्याचे दृश्य परिणाम गावागावांत दिसू लागले आहेत. या लोकचळवळीने राज्यात दुष्काळमुक्तीचे आशादायी चित्र निर्माण केले आहे.
विदर्भ व मराठवाड्यात सतत निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात निर्माण होणारे आर्थिक अस्थैर्य हा जटिल प्रश्न बनला आहे. यावर सरकार व सामाजिक संघटना प्रभावी उपाय करू लागले आहेत. सततच्या दुष्काळाशी लढण्यासाठी आमिर खानने २०१६ मध्ये पाणी फाउंडेशन स्थापन केले. राज्यातील ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या तीव्र जलसंकटाशी सामना करता यावा व ग्रामीण जनसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे हा उदात्त हेतू घेऊन ही संस्था लोकसहभागातून लढा देत आहे.
दुष्काळाला पळवून लावण्यासाठी या मोहिमेत ग्रामीण जनतेचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले. आज राज्यात शास्त्रशुद्ध पाणलोट व्यवस्थापनात संघटनेने लोकचळवळीद्वारे दुष्काळमुक्तीची आश्वासक पाऊलवाट निर्माण केली आहे व भरभक्कम यश मिळवले आहे. ‘सत्यमेव जयते’बरोबरच ‘वॉटर कप’ ही दुष्काळमुक्तीस्पर्धा गावागावांत उभारली, ग्रामीण भागात उमेदीचे स्पर्धक घडवले. सुरुवातीला, २०१६ साली तीन जिल्ह्यांतील तीन तालुक्यांमधील तीन गावांत ही स्पर्धा सुरू झाली. २०१८पर्यंत दरवर्षी ४५ दिवस, दोन लाख २५ हजार गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून ३१,८९८ कोटी लिटर पाणी साठवणारे जलसाठे निर्माण केले. पाणी फाउंडेशनने परिश्रमपूर्वक एकत्रित केलेल्या जलक्रांतीच्या लोकचळवळीत आपसांतील हेवेदावे विसरून गावकऱ्यांनी श्रमदानाचे काम निष्ठापूर्वक केले. या सर्व पाणीदार गावांनी गावातील भीषण पाणीटंचाईच्या परिस्थितीत बदल घडवून आणला. या जलचळवळीने ग्रामीणक्षेत्रातील दुष्काळी निराशा दूर करून समाजाची एकजूट निर्माण केली. अथक परिश्रमाने गावाचे जलसंकट दूर केले. आज राज्यातील सर्व पाणीदार गावांत सुख नांदत आहे.
आजमितीला महाराष्ट्रातील ४३,६६५ गावे दुष्काळी चटके सहन करत आहेत. यातील शेवटच्या गावापर्यंत ही लोकचळवळ पोचली तरच खेडी दुष्काळमुक्त होतील. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रातील ज्या गावांत २०१६ व २०१७ साली पाणी फाउंडेशनने वॉटर कपस्पर्धा आयोजित करून दुष्काळमुक्तीची उमेद जागी केली, त्या सर्व गावांत श्रमदानातून निर्माण झालेल्या जलसंधारणाच्या कामाने माथा ते पायथादरम्यान चर खोदून व दगडाचे कच्चे बांध घालून पाणी जिरवण्यात आले. परिणामी नद्या, नाले व विहिरी पहिल्याच पावसात तुडुंब भरल्या. गावांत आणि परिसरातील शिवारांत हजारो कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. शेती व गावाची पाणीसमस्या दूर झाली. शेतकरी व गावकऱ्यांनी दुष्काळमुक्तीचा आनंद साजरा केला. पाण्याच्या बक्कळ उपलब्धतेने शेतशिवार विविध पिकांनी बहरून आले. या पाणीदार गावातील ९० टक्के कोरडवाहू शेती ओलिताखाली आली. या सर्व पाणीदार गावांतील शेतकऱ्यांचा मते त्यांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के वाढ झाली. पश्चिम महाराष्ट्रातील नागझरी (ता. कोरेगाव), कानकात्रेवाडी, धावडवाडी (ता. आटपाडी), उत्तर महाराष्ट्रातील नगाव खुर्द, देवगाव देवळी (ता. अमळनेर), विदर्भातील पळसखेड (ता. जळगाव), शहापूर (रुपगड), जामोद (ता. अकोट) मराठवाड्यातील बिनपाण्याची चिंचोली (बु), चारठाणा (ता. जिंतूर) या सर्व गावांतील आमूलाग्र बदल बोलका आहे.
वॉटर कपस्पर्धेच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील ७९ तालुक्यांतील ४०२५ गावांत लोकश्रमदानातून जलसंधारणाची कामे झाली. या यांत्रिक कामांसाठी भारतीय जैन संघटनेने साडेआठ लाख तासांसाठी मोफत जेसीबी यंत्रे पुरवली. यातील उत्कृष्ट जलसंधारणाची कामे झालेल्या गावांनी तर आपल्या गावात जेरबंद झालेल्या दुष्काळाची प्रेतयात्रा काढून प्रेताचे दहन केले. दुष्काळाला गावबंदी घोषित केली. पाणी फाउंडेशनच्या कामाला समाजाचा हाच प्रतिसाद आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link