Next
अविस्मरणीय ‘सायको’
मिलिंद कोकजे
Friday, June 07 | 03:30 PM
15 0 0
Share this story


हिचकॉकचे नाव घेतले आणि ‘सायको’चा उल्लेख झाला नाही असे होऊच शकत नाही इतके ते दोघे अविभाज्य आहेत. हिचकॉक म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर पटकन पहिल्यांदा ‘सायको’च येतो. तो केवळ हिचकॉकचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो असे नाही तर ‘ऑल टाइम ग्रेट’ चित्रपटांतही त्याचा समावेश झाला आहे. गंमत म्हणजे हा चित्रपट कृष्णधवल आहे आणि अतिशय कमी खर्चात बनवला आहे तरीही त्याला हे यश मिळाले.
चित्रपटाची कथा अगदी छोटीशी पण गुंतागुंतीची आहे. एका रिअल इस्टेट एजंटकडे सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या मॅरीयनाला सॅम या आपल्या प्रियकराबरोबर लग्न करायचे आहे.  परंतु तो प्रचंड कर्जात बुडालेला असल्याने कर्जे फेडल्याशिवाय लग्न शक्य नाही. शिवाय त्याच्या पहिल्या बायकोला घटस्फोटासाठी पोटगी द्यावी लागणार आहे ती वेगळी. मॅरीयनाचा बॉस एका गिऱ्हाईकाने जागा घेण्याकरता दिलेले चाळीस हजार डॉलर्स तिला देऊन ते बँकेत भरायला सांगतो. डोके दुखण्याचे कारण देऊन ती पैसे भरून सरळ घरी जाण्याची परवानगी घेते. प्रत्यक्षात ती पैसे घेऊन पळते आणि मोटारने सॅमकडे जायला निघते. वाटेत पाऊस सुरू झाल्याने, संध्याकाळ झाल्याने ती रस्त्यावरच्या नॉर्मन बेट्स नावाच्या एका माणसाच्या मोटेलमध्ये उतरते. मोटेलच्या बाजूलाच थोड्या उंचावर एका टेकाडावर त्याचे घर असते. तो तिला घरी जेवायला बोलावतो. परंतु जेव्हा ती त्याच्या घरी जाते तेव्हा तिला नॉर्मनचा आपल्या आईशी रागात चाललेला संवाद एकू येतो. एका अनोळखी मुलीला घरी जेवायला बोलावले म्हणून ती रागावलेली असते. अखेर नॉर्मन बाहेर येतो आणि तिला घेऊन मोटेलच्याच डायनिंग रूममध्ये जेवण घेतो. जेवताना तो आपली आई मानसिक रुग्ण असून ती कसा छळ करते, जगण्याचे काहीही स्वातंत्र्य देत नाही हे सांगून तिची सहानभूती मिळवतो. नंतर तो परत आपल्या घरी जातो आणि मॅरीयना आपल्या खोलीत जाते. तेथे ती टबमध्ये शॉवरखाली अंघोळ करत असताना एक अज्ञात व्यक्ती (नॉर्मनची आई) आत येऊन चाकूने तिचा खून करते. तिच्या खोलीतून रक्त येताना बघून आपल्या आईने तिचा खून केल्याचे नॉर्मनच्या लक्षात येते आणि मग आईला वाचवण्याकरता नॉर्मन मॅरीयानाचा मृतदेह बाहेर आणून तिच्या सर्व सामानासकट गाडीच्या डिकीत टाकून गाडी जवळच असलेल्या तळ्यात ढकलून देतो, रक्ताचे डाग वगैरे पुसून पुरावा नष्ट करतो.
एक आठवड्याने मॅरीयानाची बहीण लीला आणि तिच्या बॉसने पैसे शोधण्याकरता पाठवलेला खासगी गुप्तहेर मिल्टन तिचा शोध घेत तेथे येतात. नॉर्मनच्या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे दोघांचाही संशय बळावतो. तो नॉर्मनच्या आईची भेट मागतो पण नॉर्मन उडवून लावतो. तरीही दुसऱ्या दिवशी तो आईला भेटायला घरी जातो तेव्हा सर्वात वरच्या पायरीवर पोचतो आणि तेथे त्याचा खून होतो. अखेर त्याच्या शोधात मॅरीयानाचा प्रियकर सॅम तिथे येतो. नॉर्मन सॅमशी बोलण्यात गुंतलेला असताना लीला हळूच त्याच्या घरात जाते. तिला खुर्चीत बसलेली आई दिसते. तितक्यात नॉर्मनही घरात येतो. लीला खुर्ची फिरवते आणि तिला आईचा ममी बनवलेला मृतदेह दिसतो. ती घाबरून किंचाळते आणि नॉर्मन तिला मारायला येतो. त्याच्या हातात सुरा असतो आणि त्याने आईचा केसांचा टोप आणि कपडे घातलेले असतात.
अखेर हे लक्षात येते की त्यानेच त्याच्या आईचा व तिच्या प्रियकराचा १० वर्षांपूर्वी खून केलेला असतो. त्यातून आलेल्या गिल्टमुळे तो आईचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून त्याची ममी करून ठेवतो. ती जिवंत आहे हे दाखवण्याकरता तो स्वतःच आईच्या रूपात वावरतो. त्यांचातला संवाद म्हणजे तोच आईच्या आवाजात बोलत असतो आणि स्वतःच्या आवाजात उत्तर देत असतो. ही आई पझेसिव्ह (मालकी हक्क गाजणारी) आणि जेलस (जळणारी) आहे त्यामुळे नॉर्मनच्या आयुष्यात कोणी स्त्री आली की आई तिला चक्क मारून टाकते.


धक्कादायक शेवट इतकेच केवळ या चित्रपटाचे वैशिष्ट्य नाही. तर त्याच्या आईच्या अस्तित्वाची, ती जिवंत असल्याची आई आणि मुलामधील संवादाने हिचकॉक सतत करून देत असलेली जाणीव (ज्यामुळे तो शेवटचा धक्का खूपच मोठा असतो), मॅरीयानाच्या खुनाचे दृश्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात सतत दिसत राहणारे, गूढ वाटणारे ते नॉर्मनचे घर (स्टुडिओत येणाऱ्या पर्यटकांकरता या घराचा सेट निर्माता कंपनीने आजही स्टुडिओत तसाच ठेवला आहे). ते घर प्रेक्षकांच्या अक्षरशः अंगावर येते.
मॅरीयानाच्या खुनाच्या दृश्यातही ज्या पद्धतीने शॉवरचा आणि बाथरूममधील प्लास्टिकच्या पडद्याचा वापर हिचकॉकने करून घेतला आहे, त्याचे वर्णन करून सांगणे अशक्य आहे. त्या दोन गोष्टींच्या कल्पक वापरामुळे ते दृश्य कमालीचे परिणामकारक झाले आहे. या संपूर्ण दृश्यात हिचकॉकने वेगवेगळ्या अॅक्शन्सचे छोटे छोटे तुकडे (शॉट्स) कमालीच्या वेगाने एकामागोमाग फिरवून त्या दृशाला एक वेगळाच परिणाम दिला आहे. प्रेक्षकांना अचानक भयानक धक्का बसण्यामध्ये एकामागोमाग वेगाने येणाऱ्या या शॉट्सच्या वापराचा सहभाग मोठा आहे. तसेच या दृश्याचा शेवट. जखमी झालेली मॅरीयाना प्लास्टिकचा पडदा पकडते आणि खाली पडते. ती खाली पडताना पडदा ज्यात अडकवलेला आहे त्या एकेका रिंगमधून तुटून बाहेर पडतो आणि ती पडद्यासकट खाली कोसळते. शेवटी कॅमेरा येतो तो तिच्या चेहऱ्यावर आणि स्थिरावतो तो कोणतेही प्राण नसलेल्या तिच्या उघड्या डोळ्यावर. तिच्या डोळ्याचा एक मोठा क्लोजअप दाखवून हे दृश्य संपते. चित्रपटांच्या इतिहासातील पडद्यावरील हे सर्वात परिणामकारक व गाजलेले खूनदृश्य मानले जाते. उत्कृष्ट दृश्यसंकलनाचे ते एक आदर्श उदाहरण मानले जाते. त्याचा अभ्यास चित्रपटशास्त्राचे अनेक विद्यार्थी आजही करतात. या दृश्याच्या परिणामकारितेत बर्नार्ड हेरमनने दिलेल्या पार्श्वसंगीताचाही मोठा वाटा आहे. गंमत म्हणजे चित्रपट कृष्णधवल असल्याने नेहमी अशा दृश्यात आढळणारा रक्ताचा लाल रंग इथे नाही. तरीही तो खून नेमका परिणाम साधतो. इतका वेळ आरामात बसून चित्रपट बघणारा प्रेक्षक एकदम धक्का बसून सावरून बसतो.


चित्रपटातला दुसरा खून आहे तो गुप्तहेर मिल्टनचा. तो घराच्या वरच्या पायरीवर होतो. तेथेही खून झालेल्या मिल्टनला पायऱ्यांवरून गडगडत खाली आणून हिचकॉकने त्यातील गंभीरता दाखवली आहे. कलाकारांमध्ये आवर्जून उल्लेख करायला हवा तो नॉर्मन उभा करणाऱ्या अँथनी पर्किन्सचा. तो मनोरुग्ण आहे, त्याचे व्यक्तिमत्त्व दुभंगलेले आहे, पण ते शेवटपर्यंत कळत नाही इतकी त्याची दोन रूपे त्याने उत्कृष्ट उभी केली आहेत. एका क्षणात तो आई होऊन मॅरीयानाचा खून करतो तर दुसऱ्या क्षणाला नॉर्मल वाटणारा नॉर्मन आता आईवरील प्रेमामुळे तिला वाचवण्याकरता प्रेताची विल्हेवाट लावली पाहिजे, पुरावे नष्ट केले पाहिजेत म्हणून काम करू लागतो.   
रॉबर्ट ब्लॉचच्या कादंबरीवर हिचकॉकने हा चित्रपट केला. ‘सायको’ची जादू आजही कायम आहे, तो अनेकांना आजही भावतो. त्याच्या अनेक कॉप्या निघाल्या, सिक्वेलही झाले, पण ‘सायको’ तो ‘सायको’च. चित्रपटाच्या रसास्वादाचा अभ्यास करणारेही ‘सायको’चा आवर्जून अभ्यास करतात. हिचकॉकने अनेक चांगले चित्रपट दिले आणि त्यांची संख्या मोठी आहे, पण ‘सायको’ हा त्याचा मास्टरपीस मानला जातो आणि जागतिक चित्रपटाच्या इतिहासात एक महत्त्वाचा चित्रपट.

सायको (१९६०)
मूळ कादंबरी – रॉबर्ट ब्लॉच,
निर्माता,दिग्दर्शक : आल्फ्रेड हिचकॉक,
पटकथा : जोसेफ स्टेफानो,
कलाकार : नॉर्मन बेट्स-अँथनी पर्किन्स, मॅरीयन-जेनेट ले; लीला-नेरा माईल्स, सॅम-जॉन गॅविन, मिल्टन- मार्टीन बालसम.
पाच ऑस्कर नामांकने

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link