Next
‘हाऊडी मोदी’चे यश
प्रतिनिधी
Friday, September 27 | 01:30 PM
15 0 0
Share this story

गेल्या आठवड्यात अमेरिकेत ह्युस्टन येथील ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानावा लागेल. काश्मीरविषयक ३७० कलम रद्द करण्याच्या भारताच्या कृतीला या कार्यक्रमाद्वारे अमेरिकेचेच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यात मोदींनी यश मिळवले आहे. ‘मोदी काश्मीरप्रश्न नीटपणे हाताळतील’ हे ट्रम्प यांचे उद्गार भारताच्या काश्मीरविषयक धोरणाला पाठिंबा देणारे आहेत. त्यानंतर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला, पण त्याला अन्य कोणत्याच राष्ट्राकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी काश्मीरबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा मिळवण्यात आपल्याला अपयश आले हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मान्य करावे लागले. ह्युस्टन येथील कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वत:हून या कार्यक्रमाला हजर राहिले व त्यांनी मोदींच्या नेतृत्वाची प्रसंशा केली. एवढेच नाही, तर मोदींच्या हातात हात घालून त्यांनी तेथे उपस्थित जनसमुदायाला अभिवादनही केले. आशिया खंडातील सध्याच्या राजकारणात अमेरिकेसारखी महासत्ता भारताच्या बरोबर असण्याला विशेष महत्त्व आहे. चीनच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेला आवर घालणे भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना आवश्यक वाटते. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र येत आहेतच, शिवाय अमेरिकेने चीनवर व्यापारी निर्बंध घातल्यामुळे दोन्ही देशांतील व्यापारात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अमेरिकेला भारतात करसवलती हव्या आहेत, तर चीनला अमेरिकेशी थांबलेल्या व्यापारामुळे जी तूट निर्माण झाली आहे ती भारताबरोबर व्यापार वाढवून भरून काढायची आहे. त्यामुळे भारतासाठी ही सुसंधी आहे. भारताने आता ताबडतोब हालचाली करून ही संधी साधली पाहिजे. केंद्रातील भाजप सरकारने राममंदिर, हिंदुत्व वगैरे भावनिक प्रश्न बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा शिरकाव कसा होईल याकडे लक्ष दिले तर देशातील सध्याचे मंदीचे वातावरण निवळण्यास मदत होईल. पंतप्रधान मोदी यांची आंतरराष्ट्रीय राजकारण व व्यापार यातील आजवरची कामगिरी चांगली राहिली आहे, परंतु त्याचे फायदे मिळवायचे असतील तर देशातील व्यापार, उद्योग व आर्थिक उलाढाल यात वाढ होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चमकदार कामगिरी करत असताना देशात मात्र बेरोजगारी, मंदी, बँकांची व उद्योगांची दिवाळखोरी, भाषेवरून, धर्मावरून भांडणे सुरू व्हावीत हे योग्य नाही. काश्मीरमधील परिस्थिती सरकारने आतापर्यंत योग्यपणे हाताळली आहे. दहशतवाद्यांना तेथील परिस्थितीचा गैरफायदा घेता आलेला नाही. ३७० कलम रद्द झाल्याचे निमित्त करून रस्त्यावर येऊन दगडफेक करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे ते स्वातंत्र्य हिरावून घेतल्याने फार काही बिघडलेले नाही. परंतु सामान्य जनतेला अशा निर्बंधांचा त्रास होतच असतो, तेव्हा योग्य वेळ पाहून सरकारने हे निर्बंध हळूहळू शिथिल करणे आवश्यक आहे. दगडफेक, बॉम्बस्फोट करणाऱ्यांना मानवीहक्कांशी काहीच देणेघेणे नसते, त्यामुळे काही काळ त्यांचे मानवीहक्क काढून घेतल्याने काही बिघडत नाही. त्यामुळे काश्मीरमधील रक्तपातही थांबला आहे. पण हे फार काळ चालणार नाही. तेव्हा काश्मीरमधील स्थिती लवकर पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न व्हायला हवेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link