Next
शेवट
मधुरा वेलणकर
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

माझे पणजोबा हे डिस्ट्रीक्ट जज होते. त्यांनी म्हणे मृत्यूपत्र केलं नव्हतं, असं मी लहानपणी ऐकलं होतं. आणि मग भरपूर अशी मिळकत असूनही ती सगळी ट्रस्टला गेली. ‘त्यांना ते कधी मरणार नाही’ असं वाटलं होतं की कोणाला त्यांचे काही मिळू नये अशीच इच्छा होती? कायद्याची पूर्ण माहिती असलेला माणूस असून का केलं असेल त्यांनी असं? असो!
गेल्या दोन वर्षांपासून साधारणत: तीन वेळा माझे सासरे ‘गेले’ अशी चुकीची बातमी पसरली आणि मागच्या महिन्यात माझे वडील ‘वारले’ अशीही खोटी बातमी पसरली. अर्थातच त्यांचं ‘आयुष्य वाढलं’ असंच आम्ही म्हटलं आणि त्या बातम्या विसरून गेलो, पण परवा बोलता बोलता बाबा म्हणाले की ‘ही’ वेळ आता कधीही येऊ शकते. तेव्हा वाटलं खरं तर ही वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते. आजकाल वयाचंही काही सांगता येत नाही. मग आपोआप माझ्या मरणाचाही विचार मनात येऊन गेला.
मला कसं मरायला आवडेल? सगळ्यांना आवडेल तसंच- कमी त्रास, झोपेत किंवा काम करताना. मला खूप जगायचं आहे आणि शेवटपर्यंत ठणठणीत राहायचं आहे. आयुष्यात विविध गोष्टींची अनुभूती घ्यायची आहे. धमाल करायची आहे. खूप फिरायचं आहे. खरंतर मनात सगळ्यांच्या हेच असेल, परंतु अचानक काही झालंच तर?
लहानपणापासून अनेक मृत्यू जवळून पाहिले. त्यामुळे माणूस जाणं, मग त्यानंतरचे सगळे दिवस, त्या प्रथा पाहिल्या आहेत. तेव्हाच काही गोष्टी मनाशी पक्क्या व्हायला लागल्या. मरण किंवा जवळचा माणूस गमावणं हे माझ्या आयुष्यातलं आत्यंतिक भय! पण त्याला सामोरं जावंच लागतं कधी ना कधी! मरणाला घाबरायचं नाही, त्याची वाट पाहायची नाही, अचानक पुढ्यात आलं तर त्याला आलिंगन द्यावं असं म्हणतात. मात्र हे बोलणं आणि प्रत्यक्ष ते आपल्यापुढे उभं ठाकणं यात तफावत असणारच, पण त्याकडे घाबरून न पाहण्याचा निश्चय मी सध्या करत आहे.
म्हणून भरपूर आयुष्य शिल्लक असूनही हे माझं काल्पनिक मृत्युपत्र! कुठल्याही कारणानं माझा मृत्यू झाला तरीही, प्रथम शाबूत असलेल्या माझ्या अवयवांचं दान करावं. ऐकायला विचित्र वाटलं तरी मला वाटतं प्रत्येक सुजाण माणसानं ते करावं, केलंच पाहिजे. स्मशानात आणि बाराव्या-तेराव्या दिवशीही भटजींना बोलवून कुठलेही विधी करू नये. त्याच्यामागे काहीतरी शास्त्र असेल, ते मी नाकारत नाही, परंतु मला ते करायचं नाही. रडू नये असं मी म्हणणार नाही, येत असल्यास काहीही दाबून न ठेवता मनमोकळं रडावं. मी गेल्याची वर्तमानपत्रातील कात्रणं जपून ठेवावीत. मी आता माझ्याबद्दल आलेल्या बातम्यांची ठेवते तशी! माझं थोडं सामान दान करावं आणि थोडं जपून नीटनेटकं ठेवून द्यावं. ह्यावर मला जवळून ओळखणारे वैतागतील, कारण आत्त्ताच मी वस्तू जागेवर ठेवण्याबाबतीत त्रास देते आणि गेल्यावरही? पण थोडा त्रास हवा ना? नाहीतर मग काय मजा!
मी गेल्याचा दिवस माझी आठवण म्हणून साजरा करावा. सगळ्या माझ्या जवळच्या, माझ्यावर जीव असणाऱ्यांनी एकत्र यावं, माझ्या आवडीचं खावं, प्यावं, माझ्या आवडीची गाणी म्हणावी. आठवणी जागवाव्या. वर्षातून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला जावं. माझ्या चित्रपटांचा एखादा महोत्सव व्हावा. नवीन गुणी कलावंतांसाठी आणि पडद्यामागील कलाकारांसाठी कौतुकाची एक संध्याकाळ आयोजित करावी. माझ्या नावानं लहान मुलांच्या बाबतीतली एखादी सामाजिक जबाबदारी पार पाडावी. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना पुस्तकं देणं, त्यांची शिबीरं घेणं, त्यांना आत्मविश्वास यावा यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना सुदृढ होण्यासाठी प्रोत्साहन देणं, असे उपक्रम राबवावे.
मला ना, एक शाळा उभी करायची आहे, जिथे मुलांना कुठल्याही तराजूमध्ये तोललं जाणार नाही. शिक्षण, संस्कार, शिस्त या सगळ्याचं मिश्रण असेल, परंतु वेळेचं बंधन नसेल. स्पर्धेची भीती नसेल. कोणताही भेदभाव नसेल. फक्त आनंद नांदेल, निरागसता फुलेल अशी झाडं-पानं-फुलं-डोंगर-पाणी, प्राणी-पक्षी यांच्या सहवासात वसलेली शाळा- ‘मधुराई’. ती मी उभी केलेली असेन. त्याची यथोचित काळजी घेतली जावी. थोडक्यात मी गेले ह्यावर दुःख करण्यापेक्षा माझं जगणं साजरं व्हावं- असं काहीतरी!
आता मी हा विषय का निवडला, मला असं का लिहावंसं वाटलं, मृत्यूचा नकारात्मक विचार का मांडावासा वाटला- असे प्रश्न मनात आले असतील अनेकांच्या. मात्र मी ह्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीनं पाहते. ह्या निमित्तानं मृत्युपत्राचं महत्त्व मलाही उमगलं. फक्त मालमत्तेची वाटणी हा उद्देश नसून आपल्या इच्छा व्यक्त करणं, आपल्या जवळच्यांशी हितगुज करणं, चांगले विचार मांडणं हेही करायला हरकत नाही. आपल्या नंतरही चांगल्या विचारांना मरण नसावं, उत्तम कार्य घडत राहावं. त्याची धुरा फक्त काय ती आपल्या हातात नसली तरी आपल्या वाट्याचा प्रयत्न आपण करत राहायचा.
शाहरूख खानच्या चित्रपटातलं वाक्य आहे ना, “अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।” ह्या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी चांगला विचार करते, चांगल्यावर मनापासून विश्वास ठेवते, उत्तम गोष्टींची आशा करते आणि त्या दिशेनं माझ्या विचारांचा प्रवास सुरू होतो आणि त्याला अनुसरून माझे प्रयत्नही. ही सकारात्मक ऊर्जा मला बळ देते, समाधानाची ग्वाही देते.
जन्म आणि मरणोत्तर दुसऱ्या जगातील जन्म हे दोन्ही न चुकणारे! दोन्ही भरभरून उपभोगू या; त्याचा आनंद लुटू या! जीव असला तरी जागरूकता असणं अधिक मोलाचं, हे ध्यानात ठेवा. धमाल करा, व्यक्त होत राहा!
‘मधुरव’चा हा शेवटचा लेख, पण आपल्या गप्पा चालू ठेवू! हा होता माझा आवाज तुमच्यासाठी! भेटत राहू वेगवेगळ्या माध्यमातून. मनःपूर्वक, कृतज्ञतापूर्वक नमस्कार!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link