Next
आम्ही गोंधळी!
अमोघ पोंक्षे
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this story


‘वन्स अ इयर’ ही गोष्ट आहे अरिहंत चोरडिया आणि रावी महाजन या दोघांच्या मैत्रीतून सुरू झालेल्या प्रवासाची! २०१३ ते २०१८ या सहा वर्षांदरम्यानची  टाइमलाइन घेऊन या दोघांची होणारी पहिली भेट, मग त्यानंतर होणारं प्रेम, त्यानंतर होणारं ब्रेकअप आणि त्यानंतर दोघांचे पुन्हा जुळणारे सूर अशी वळणं घेत ही गोष्ट पुढे सरकते. आता या सहा वर्षांत त्यांचे फक्त प्रेमाचेच सूर वर-खाली लागतात असं नाही तर वैयक्तिक आयुष्यासोबत त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यातही सर्व काही आलबेल नसतं.
आपल्याला आयुष्यात पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, का करायचं आहे, याबाबत रावीच्या व्यक्तिरेखेपेक्षाही अरिहंतची व्यक्तिरेखा जास्त गोंधळलेली दाखवलेली आहे. संपूर्ण सीरिजच्या सहा भागांमध्ये फक्त दोघांचाच वावर अधिक असल्यानं याची तुलना दृश्यात्मक पातळीवर अनेक लोक मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटाशी करतील, पण या सीरिजची गोष्ट आणि त्याला मिळालेली ट्रीटमेंटच मुळात पूर्ण वेगळी आहे हे लक्षात घ्यायला हवं.
२०१३ ते २०१८ दरम्यानच्या या सहा वर्षांतील प्रत्येकी एक महत्त्वाचा दिवस घेऊन, त्या दिवशी अरिहंत आणि रावीच्या आयुष्यात घडणारे महत्त्वपूर्ण प्रसंग या सीरिजमध्ये चित्रित करून, गोष्टीतलं एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शकाच्या जोडगोळीनं केला आहे. संपूर्ण सीरिजमध्ये गोंधळलेल्या स्वरूपात वावरणारी मुख्य पात्रं सारखी पाहूनही ती आपल्याला खटकत नाहीत कारण वास्तविकतेत आपण अशी अनेक पात्रं आपल्या आजूबाजूला पाहत असतो. इंजिनीयर होऊ घातलेल्या अरिहंतला वडिलांचा व्यवसाय करायचा नसतो, नोकरी करायची नसते. मनात येतं म्हणून मध्येच तो एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षांसाठी तयारी करून त्यात मार खाऊन बघतो आणि सीरिजच्या शेवटी वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावण्याचं ठरवतो. अरिहंतच्या गोष्टीद्वारे एमपीएससी आणि यूपीएससी या स्पर्धापरीक्षांच्या तयारीच्या नावाखाली शहरात वाढणारे विद्यार्थ्यांचे लोंढे या प्रश्नाकडे लेखक अनौपचारिकरीत्या आपलं लक्ष वेधून घेतो.
अरिहंतच्या तुलनेत सीरिजच्या सुरुवातीला मॅच्युअर्ड वाटणारी रावी तिच्या आणि अरिहंतच्या ब्रेकअप दरम्यान अरिहंतनं तिच्या केलेल्या अवहेलनेला ज्या पद्धतीनं उत्तर देते ते मनोमन प्रेक्षक म्हणून आपल्याला पटतं. शेवटचा भाग अपवाद म्हणून सोडला तर इतर सर्व भागांमध्ये रावीचं वागणं हे वास्तविकतेला धरून वाटतं. अरिहंत आणि रावीचं पात्र साकारणारे कलाकार निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले हे ही दोघंही उत्तम कलाकार असले तरी दोघंही पडद्यावर आल्यानंतर मृण्मयीचा अभिनय जास्त भाव खाऊन जातो. अरिहंत आणि रावीच्या ब्रेकअप दरम्यान रावीला निशांत नावाचा एक मित्र भेटतो. निशांत या पात्राला वाव जरी कमी असला तरी त्याच्या तोंडचं एक वाक्य कोट करून ठेवावंसं वाटतं. नातेसंबंधांवर सुरू असलेल्या एका संभाषणादरम्यान अरिहंत आपली बाजू मांडत असताना तो त्याला उत्तर म्हणून म्हणतो की, To love someone you have to keep faith on love itself! या सीरिजमध्ये उपदेशात्मक वाक्यांमधून संवाद साधली जाणारी अनेक वाक्ये आहेत. त्यातून कुठेतरी प्रेक्षक म्हणून आपणही त्या वाक्यांचा खोलवर विचार करू लागतो.
या सीरिजबाबत सर्वात जास्त कोणाला मार्क द्यायचे असतील तर ते आहेत लेखक गौरव पत्की, दिग्दर्शक मंदार कुरुंदकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांना! संकलक आशय गटाडे याची योग्य ठिकाणी चाललेली कात्री या सीरिजला अतिशय छोट्या टाइम फ्रेममध्ये बसवते, ज्यामुळे गोष्टीत लांबण लावलीय किंवा एखादा भाग कंटाळवाणा होतोय असं आपल्याला वाटत नाही. टायटल क्रेडिट दरम्यानचं छोटे गाणं आणि त्याचं संगीतही उत्तम जमून आलं आहे.
त्यामुळे आयुष्यात कसं वागू नये? आणि कसे वागावं? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं प्रेक्षक म्हणून आपल्याला अरिहंत आणि रावीच्या या गोष्टीतून नक्की मिळू शकतात. आपलंही वैयक्तिक आयुष्य वेगवेगळ्या बदलांतून जातं असतं, त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही गोंधळी हा टॅग स्वतःवर न लावून घेता पुढे चालत राहताना ‘वन्स अ इयर’सारखी वेब सीरिज एकदा नक्कीच पाहण्यासारखी आहे.
वन्स अ इयर
कलाकार : निपुण धर्माधिकारी, मृण्मयी गोडबोले, विश्वेश देशपांडे, क्षितिज आपटे, शर्वरी लोहोकरे
लेखन : गौरव पत्की
दिग्दर्शन : मंदार कुरुंदकर
संगीत : हृषीकेश
निर्मिती : भा.डि.पा. आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन
प्लॅटफॉर्म : एम.एक्स. प्लेयर
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link