Next
शिवसेनेत आदित्य-शक्ती
विशेष प्रतिनिधी
Friday, July 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story


दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर अनेक राजकीय जाणकारांची शिवसेनेचे मृत्युपत्र लिहिण्यापर्यंत मजल गेली होती. शिवसेनेचा पुढचा वारसदार राज ठाकरेच असून उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची वाढ होणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत होते. पण कुठलीही संघटना सहजासहजी संपत नाही. कारण अनेक वर्षांची मेहनत, विचारधारा (वादग्रस्त असो वा समाजकल्याणी) व समर्थकांचे पाठबळ त्यामागे असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतरही ज्यांना अराजकीय म्हटले जात होते, त्या उद्धव ठाकरे यांनी कुशल संघटकाप्रमाणे शिवसेना नुसती टिकवलीच नाही तर वाढवली आणि १५ वर्षानंतर सत्तेतही आणून दाखवली.
ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आता आदित्य ठाकरे यांच्या युवा चेहऱ्याच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच पक्षनेतृत्वाचा वाद उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात अनेक दिवस चालला आणि ठाकरे कुटुंबात कटुता निर्माण झाली. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चाणाक्षपणे आदित्य ठाकरेंना पुढे करून ताकद दिली व माझ्यानंतर कोण? हा प्रश्नच निर्माण होऊ दिला नाही.  याचाच पुढचा भाग म्हणून शिवसेनेचे मंत्री आणि नेते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदित्य यांचे प्रमोशन संधी मिळेल तेव्हा करत आहेत. शिवसेनेच्या या रणनीतीवरून आदित्य हेच आता शिवसेनेचे आगामी नेते आहेत हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील सेंट झेवियर्ससारख्या उच्चभ्रू शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन आदित्य युवा सेनेचेच अध्यक्ष म्हणून सक्रीय राजकारणात आले. अनेक आंदोलने करून सिनेट निवडणुका, विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून शहरी युवकांच्या मदतीने शिवसेनेचे जाळे मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच आपल्या मृदू स्वभावाची कात टाकत आजोबांप्रमाणे कणखर नेतृत्वाकडे वाटचाल करत असताना त्यांनी विद्यार्थीदशेतच वादग्रस्त आंदोलनेही केली. उदा. मुंबई विद्यापीठात इंग्रजी अभ्यासक्रमाला असलेले रोहिंग्टन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकात वादग्रस्त व आक्षेपार्ह लिखाण आहे. या मुद्द्यावर त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक वगळण्यास विद्यापीठाला भाग पाडले. या प्रकरणात आदित्य ठाकरे पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. विद्यापीठीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ च्या विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे भाजपविरोधातील अटीतटीच्या लढतीतही पुढे राहून शिवसेनेने सत्ता राखली.
२०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेलाच जास्त जागा मिळतील आणि पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणजे आदित्य ठाकरे होतील यादृष्टीने शिवसेनेच्या छोट्या मोठ्या नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती केली आहे. याचाच भाग म्हणून शहरी वर्गात प्रसिद्ध असलेला आदित्य ठाकरे यांचा चेहरा ग्रामीण भागात नेण्यासाठी राज्यव्यापी जनआशीर्वाद यात्रेची जळगावातून सुरुवात केली. या निमित्ताने आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतात. त्यांना शहरासोबतच ग्रामीण भागातील समस्यांची जाण असून ते त्या समस्या सोडवू शकतात हा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. उदा. नुकतेच झालेले पीक विमा कंपन्यांविरोधातील आंदोलन. जनआशीर्वाद यात्रेची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची खिळखिळी झालेली ताकद आणि ग्रामीण भागातील वेगाने घटणारा जनाधार आपल्या दिशेने वळविण्यासाठी या यात्रेच्या निमित्ताने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात २०१४ मध्ये शिवसेना-भाजप यांची युती तुटल्यानंतर भाजपला १२२ व शिवसेनेला ६२ जागा मिळाल्या. त्यानंतर आपला प्रतिस्पर्धी काँग्रेस, राष्ट्रवादी नसून आपला खरा शत्रू भाजपच आहे. भाजपचा जनाधार कमी झाल्याशिवाय आपला जनाधार वाढणार नाही म्हणून सत्तेत राहून विरोधकांची भूमिका सक्षमपणे निभावण्याचा प्रयत्न केला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी यांची विरोधी पक्ष म्हणून असलेली जागा शिवसेनेने व्यापली. सत्तेत असूनही भाजपवर टीका करण्याची एकही संधी मुखपत्र सामनाने सोडली नाही. एकला चलो हा नारा दिला. मात्र नंतर बालाकोट हवाई हल्ला व सर्जिकल स्ट्राईकनंतरआपली भूमिका ३६० अंशांनी बदलत अफझलखान म्हणून हिणवलेल्या अमित शाह यांची गळाभेट घेतली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून प्रचंड मोठा विजय मिळविला. तरीही १८ खासदार निवडून आणल्यानंतरही अवजड उद्योगाशिवाय दुसरे काही शिवसेनेच्या पदरात पडले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, अमित शाह, आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या करारात विधानसभेच्या जागावाटपाचेही सूत्र ठरवले गेले. या गुप्त कराराच्या माहितीनुसार येणाऱ्या विधानसभेत २८८ जागांपैकी शिवसेना -भाजप प्रत्येकी १४० व मित्रपक्ष ८ जागांवर लढणार आहेत.  मुख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांत अडीच अडीच वर्ष विभागून दिले जाईल व आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातली व्यक्ती पहिल्यांदाच निवडणूक लढवेल व महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभेल अशी खूणगाठ पिता-पुत्राने आपल्या मनात बांधली आहे.  याचाच भाग म्हणून निवडणुकीच्या राजकारणात आदित्य ठाकरे यांना दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व वरळीचे माजी आमदार सचिन अहिर यांच्या मनगटावरील घड्याळ काढून शिवबंधन बांधले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link