Next
सदा सर्वदा... अपेक्षांची पूर्तता नाही
नंदकुमार पाटील
Friday, November 30 | 06:04 PM
15 0 0
Share this storyमराठी रंगभूमीवर असे चार-पाच निर्माते आहेत जे मुळात अभिनेते आहेत. ठरवले तर नाटक, चित्रपटक्षेत्रात सहज स्थिर होऊ शकतील अशी गुणवत्ता त्यांच्या अंगी आहे. हे कलाकार सर्वच क्षेत्रांत दिसत असले तरी त्यांचे नाट्यवेड सच्चा कलावंत असल्याचा दाखला देणारे आहे. जनार्दन लवंगारे हे त्यापैकी एक. गेली चार दशके नाटक लिहिणे, दिग्दर्शित करणे आणि त्याची निर्मिती करणे हा त्यांचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. प्रचलित विषय घ्यायचे, चालू स्थितीचे नाटकाला शीर्षक द्यायचे आणि शंभर-दीडशे प्रयोगांची झेप घ्यायची हा त्यांचा प्रवास अनेक वर्षे सुरू आहे. एखाददुसरा नावाजलेला कलाकार घ्यायचा आणि नवकलाकारांना प्राधान्य द्यायचे हे त्यांचे ठरलेले गणित. नव्याने व्यावसायिक रंगमंचावर आलेले ‘सदा सर्वदा’ हे नाटक पुनर्जिवीत आहे. काही वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग त्यांनी केले होते. त्यांच्या कुठल्या नाटकाला जेवढी लोकप्रियता मिळाली नव्हती, तेवढी त्याच्या या नाटकाला मिळाली होती. अल्पकालावधीत या नाटकाचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धो धो चालणारे हे नाटक त्यांनी सवयीप्रमाणे बंदही केले होते. तेच नाटक त्यांच्याच ‘चंद्रकला’ या नाट्यसंस्थेच्या वतीने पुन्हा व्यावसायिक रंगमंचावर आणले आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शनही त्यांचेच आहे.

प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे म्हणजे बऱ्याचशा विनोदी लेखकांना पौराणिक काळातील पात्रे ही नेहमी महत्त्वाची वाटलेली आहेत. वस्त्रहरण आणि अलिकडच्या काळात ‘यदा कदाचित’, ‘करून गेलो गाव’ अशी नाटके प्रेक्षकांना आवडतात असे दिसते. ‘सदा सर्वदा’चा विषयही तोच आहे. बलरामदादा सुभद्राचा विवाह करू इच्छितो. अर्जुन, दुर्योधन हे त्यासाठी तयार असतात. बलराम आणि सुभद्राचा वराकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सुभद्रा ही योद्धा, देखणा म्हणून अर्जुनाकडे पाहत असते, तर बलराम दुर्योधन हा चतुर, महत्त्वाकांक्षी असल्याचे पटवून देत असतो. त्यामुळे सुभद्रा कोणाबरोबर विवाहबद्ध होणार याची दरबारातल्या लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली असते.

श्रीकृष्ण नामी युक्ती करून हा प्रश्न सोडवतो. सुदामाचे याबाबतीत सहकार्य लाभते. अशी काहीशी ही कथा आहे जी जनार्दन लवंगारे यांनी  आपल्या दिग्दर्शनात हाताळलेली आहे. कथा ही पूर्वापार चालत आलेली आहे, त्यात मनोरंजनात्मक असे काय घडते असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जनार्दन स्वत: लेखक असल्यामुळे प्रेक्षकांना माहीत असलेले, चर्चेला उतरलेले, वादविवादातीत अशा अनेक प्रचलित विषयांना संवादात आणून मुक्त अाविष्काराचे दर्शन घडवलेले आहे. ‘मी टू’ प्रकरण, आजचे राजकारण, पंतप्रधानांचे परदेशी दौरे अशी काहीशी उदाहरणे देता येतील. स्वत: लेखक, दिग्दर्शक जनार्दन लवंगारे यांनी यात सुदामाची व्यक्तिरेखा साकार केलेली आहे. विनोदी भूमिका म्हटली की शब्दांची मुभा, अंगविक्षेप असे काहीसे ठासवले जाते, पण बारीकसारीक हालचालीतून मार्मिक संवाद या बळावरही प्रेक्षक मिळवता येतो हे जनार्दन यांनी आपल्या कृतीतून पटवून दिलेले आहे. याही भूमिकेच्या बाबतीत तसेच काहीसे पाहायला मिळते. प्रदीप पटवर्धन (बलराम), सुचित जाधव(अर्जुन), उमेश ठाकूर(श्रीकृष्ण), संजय कसबेकर(दुर्योधन) विनोदाची समज असलेल्या कलाकारांनी भूमिका चोख केलेल्या आहेत. नूतन जयंत (सुभद्रा), शिवानी राजेश (सत्यभामा), तेजश्री मेहेर(रुख्मिणी) यांच्याही या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. परंतु भूमिकेत अजून मोकळेपणा यायला पाहिजे , त्याचा अभाव इथे जाणवतो. ज्यांनी पूर्वीचे ‘सदासर्वदा’ पाहिले आहे त्यांच्यासाठी ती कलाकृती ऊर्जेने भरलेली, मुक्त अविष्काराने फुललेली नाट्यकृती  होती.

सहभागी कलाकारांचे वय लक्षात घेता तो उत्साह आताच्या नाटकात पाहायला मिळत नाही. नाटकातला विषय हा पौराणिक काळातील आहे ते वेशभूषेतून, नेपथ्यातून पाहायला मिळते परंतु त्याला आवश्यक असणाऱ्या भाषेचा विसर बऱ्याच कलाकारांना पडलेला आहे. ही विसंगती दूर करायला हवी. उत्स्फूर्त संवादांचा अभाव आणि एकमेकांना चाचपणे या गोष्टी लक्षात घेता ‘सदासर्वदा’ हे नाटक प्रेक्षकांच्या अपेक्षेची पूर्तता करत नाही. मोहवून टाकणाऱ्या गाजलेल्या गाण्यांंवर बाळबोधपणे नृत्य सादर केलेले आहे. पार्श्वसंगीताची बाजू दादा परसनाईक यांनी सांभाळलेली आहे तर नेपथ्य प्रवीण गवळी यांचे आहे. अलिकडची नाटके नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना यांच्याबाबतीत जागरूक आहेत. इथे त्याचीही कमतरता लक्षात येते..
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link