
लग्न ही दोन्ही कुटुंबातल्या सर्वांसाठी मोठी आणि आनंदाची घटना असते. प्रत्येकाच्या मनात हुरहूरही असते, उत्साहही असतो. या सोहळ्यासाठी आईवडिलांनी पैशांची तरतूद करून ठेवलेली असते. मुलीचे आईवडील तर तिच्या जन्मापासूनच या तयारीला लागलेले असतात. पूर्वी हा कुटुंबातल्या प्रत्येकाने जबाबदारीने साजरा करण्याचा सोहळा होता. आता लग्नाचे स्वरूप खूप बदलले आहे. खासकरून शहरी मध्यमवर्गात या सोहळ्याचे रूप खूप बदलले. आता लग्न म्हणजे धमाल! लग्न म्हणजे खरेदी! लग्न म्हणजे जेवणावळी! लग्न म्हणजे डेकोरेशन! लग्न हा आज एक इव्हेंट झाला आहे. अगदी काटकसरी मानल्या जाणाऱ्या मध्यमवर्गातही घरात म्हटले की काटकसर बाजूला पडते. ‘काही कमी पडायला नको.’ ‘आयुष्यात लग्न एकदाच होते. तेव्हाच काय ती हौस भागवून घ्यायची.’ ...असे म्हणत लग्नसोहळ्यात एकूण प्रचंड खर्च होतो आणि प्रचंड धावपळ होते. बहुतेक वेळा हा खर्च वधूपक्षानेच करायचा असतो. काहीवेळा दोन्ही पक्ष अर्धा-अर्धा खर्च करतात. मग दोघेही आपापले घोडे पुढे रेटतात. वधूकडचे म्हणतात, ‘आपल्याला अर्धाच खर्च करायचा आहे मग हेपण करू.’ वरपक्ष म्हणतो, ‘अर्धा खर्च आम्ही करतोय ना? मग हेही करायला काय हरकत आहे?” असे म्हणत अनेक गोष्टी वाढवल्या जातात. परिणामी एकूण खर्च खूपच वाढतो. व्यावसायिक आणि उच्चपदस्थ लोकांसाठी घरातले लग्न हा आपली पत दाखविण्याचा आणि व्यावसायिक संबंध जतन करण्याचाही सोहळा असतो. त्यांच्यासाठी भव्य समारंभ ही गोष्ट त्यांना आवश्यक वाटते.
असा खर्च करण्याचा सामाजिक परिणाम व आर्थिक परिणाम हे तत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवले आणि फक्त आपल्या वैयक्तिक व्यवहाराचा विचार करायचा म्हटले तरी गणित फारसे साधेसरळ नाही. एका लग्नात १०-१५ लाख रुपये सहज खर्च केले जातात. मध्यमवर्गीयांसाठी ही रक्कम नक्कीच मोठी आहे. अनेक पालक असे आहेत की ते आयुष्यभर स्वत:ची हौसमौज बाजूला ठेवून मुलांसाठी म्हणून पैसा जमा करतात. ही सगळी पुंजी एका दिवसात खर्च होऊन जाते. एका दिवसात आपल्या खिशातून व्यापाऱ्यांच्या खिशात जाते. आपल्या मुलांना एका दिवसाच्या हौसेखेरीज त्यातले काही मिळत नाही. अनेक वेळा असे दिसते की मुलीच्या आई-वडिलांना प्रौढ वयात कर्ज काढावे लागते किंवा त्यांच्याकडे म्हातारपणाची तरतूद म्हणून पैसे उरत नाहीत.
तरीही लोक एवढा खर्च कशासाठी करतात? तर सामाजिक प्रतिष्ठेसाठी! तशी रीत आहे म्हणून! कोणी आपल्याला नावे ठेवू नयेत म्हणून! लोकांना विचारले तर त्याची वेगवेगळी करणे सांगतात-
* लग्नसमारंभातच डामडौल करता येतो. - ही तर दिखाव्याची हौस!
* मुलांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी त्यांची सगळी हौस पुरवली पाहिजे. –हे तर लाड!
* सगळं छान छान दिसलं की व्याही खूश होतील आणि आपल्या मुलीला चांगले वागवतील.- ही अगतिक आशा!
* आमच्या मुलीच्या वेळी आम्ही केलेच की! – ही वरपक्षाची भूमिका व अपेक्षा !
* समजातली आपली पत आणि ऐपत या निमित्ताने दाखवून देता येते. - हा तोरा!
या कारणांत आता भर घातली आहे टीव्हीवरील मालिकांनी आणि इतर कार्यक्रमांनी. लग्नसोहळा एखाद्या इव्हेंटसारखा भव्यदिव्य असला पाहिजे असे लोकांना वाटायला लागले आहे. साखरपुडा हाही हल्ली लग्नासारखाच मोठा समारंभ असतो. नंतर मेंदी, हळद, संगीत असे इव्हेंट केले जातात. ‘संगीत’साठी तर खास निवेदक, वादकताफा, नृत्यदिग्दर्शक सगळे कसे साग्रसंगीत असते. आता नव्याने या पंगतीत एक पाहुणा आला आहे– प्रीवेडिंग शूटिंग. आणि ते लग्नाच्या दिवशी हॉलमध्ये मोठा स्क्रीन लावून प्रदर्शित करतात.
प्रत्यक्ष लग्न म्हणजे तर विश्वरूपदर्शन जणू! ‘लग्न हा पारंपरिक संस्कार आहे,’ म्हणत सगळा गेटअप पारंपरिक हवा, असा आग्रह धरला जातो. म्हणून महागडी पारंपरिक साडी (बहुधा नऊवारी पैठणी) किंवा भरजरी शेरवानी घेतात. पुन्हा कधीही हे कपडे अंगाला लागत नाहीत. हा गेटअप परफेक्ट व्हायला पाहिजे, म्हणून हजारो रुपये देऊन ब्युटीशियनला बोलवले जाते. लग्नविधींमध्ये देण्याघेण्याच्या आणि विधींसाठी वापरायच्या वस्तूंनाही महागडे आवरण केले जाते. ह्या ‘पारंपरिकता जपणाऱ्या’ आणि ‘एखादा करायला छान वाटतं’ गटातल्या गोष्टी केल्या जातात. वधू-वर आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी स्टेजवर येतात,ते एकदम आधुनिक फिल्मी गेटअपमधे. कारण तोही इतर वेळी करू शकत नाही. परंपरा जपायच्या म्हणून पूर्वीचे सगळे विधी केले जातात. पूर्वी चार दिवस चालणारे लग्न अर्ध्या दिवसात उरकायचे म्हणून धावपळीत सगळे विधी केले जातात. काही विधींच्या भोज्याला शिवून ते पार पाडले जातात. एका दिवसात संस्कार, संस्कृतिजतन, फॅशन, हौस, डामडौल सगळेकाही कोंबले जाते. “विवाहविधी हा संस्कार आहे, आपल्या विधींना अर्थ आहे,’’ असे लोक हिरिरीने बोलतात आणि अशा सोहळ्यात नेमके विधींच्या मागचे अर्थ मात्र बाजूलाच पडतात. तिकडे कुणाचेच लक्ष नसते.
लग्नाचे जेवण हा तर या डामडौलाचा गाभा. त्या डायनिंग हॉलमधे जणू पूर्ण हॉटेल अवतरलेले असते. एकाच जेवणात चाट, पंजाबी, दाक्षिणात्य, चायनीज, पारंपरिक जेवण असे सर्व पदार्थ असतात. वर पंचवीस प्रकारचे मुखवास. इतक्या सगळ्याची खरच गरज असते का? त्यापेक्षा मोजके आणि चांगल्या चवीचे पदार्थ ठेवले तरी लोक छान आनंदाने जेवू शकतात.
आता ज्याचा त्याचा त्याने कसा खर्च करायचा हा त्याचा प्रश्न आहे हे खरे असले तरी यामुळे काही अवाजवी पायंडे पडतात. इतरांची लग्ने बघून मुले तशीच स्वप्ने बघतात. मग पालक मायेपोटी खर्च झेपवतात.
अनेकदा असेही दिसते की मुलांना पैशांची गरज आहे. पालकांना ती कळत असते तरीही लोकांच्या भिडेपोटी हाती असलेला पैसा समारंभवर खर्च केला जातो. एक दिवसाचा डामडौल महत्त्वाचा की पैशांचा विनियोग गरजेला होणे महत्त्वाचे, याचा विचार नक्कीच करायला हवा.
खरेतर लग्न ही आपली वैयक्तिक बाब. कौटुंबिक सोहळा. तो कुठल्याही प्रकारचे प्रदर्शन न मांडता आनंदसोहळ्याच्या भावनेने करावा. नाहीतरी जवळची जिव्हाळ्याची माणसे सोडली तर बाकी मंडळी केवळ उपचार म्हणून आलेली असतात. आपल्याकडच्या लग्नात त्यांना फारसे स्वारस्य नसते. दिवसभराच्या गर्दीत कोण आले कोण नाही हे यजमानांना कळतही नाही. लग्न ही अनेक नव्या नात्यांची सुरुवात असते. ती दोन्ही कुटुंबातल्या जिव्हाळ्याच्या माणसांनी एकत्र येऊन करावी यासाठी हा समारंभ आपण करतो. तो तसाच जिव्हाळ्याने साजरा करावा, दिखाव्याने नाही.