Next
खोडकर माकड
अतुल साठे
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

एखाद्याची टिंगल करण्यासाठी त्याला लोक माकड म्हणतात. ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला’ आणि ‘माकडाच्या हाती कोलीत’यांसारख्या म्हणींतून माकड आपल्याला भेटते. पूर्वी रस्त्यावर खेळ करणाऱ्या मदारीकडे माकडे दिसायची, ज्याला आता कायद्याने बंदी आहे. माकडचेष्टा हा शब्दप्रयोग कदाचित माकडाच्या खोडकर स्वभावामुळे आला असेल. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झाडाच्या फांदीला लटकून खाली असलेल्या वाघाच्या दोन बछड्यांच्या शेपट्या ओढणारे माकड पाहिले होते. तसेच एका चित्रफितीत झाडावर फणस खाणाऱ्या शेकरूला डिवचणारे माकड पाहण्यात आले. वास्तवात माकड हा एक समाजप्रिय, बुद्धिमान व परीस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी आहे.
जगभर माकडांच्या २० हून जास्त प्रजाती आहेत. भारतात ८ प्रजाती आढळतात – दख्खनी, उत्तरी, आसामी, अरुणाचली, पांढऱ्या गालाचे, आखूडपूच्छ, वराहपुच्छ व सिंहपूच्छ माकड. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात मुख्यत्वे दख्खनी, तर विदर्भ व खानदेशात जास्त करून उत्तरी माकड आढळते. सह्याद्रीच्या उत्तरेकडील काही भागांत दोन्ही प्रजाती आहेत. अनेकांसाठी माथेरान व माकड हे एक समीकरण झालेले असते. महाराष्ट्राव्यतिरिक्त दख्खनी माकड दक्षिणेकडील राज्यांत, तर उत्तरी माकड संपूर्ण उत्तर व मध्य भारतात सापडते. माकडाला बंदर (हिंदी), मॅकाक (इंग्रजी), कपि (संस्कृत/कन्नड), मर्कट (संस्कृत/बंगाली), वेल्ला मांथी (मल्याळम), कोरुंगू (तमिळ), पुंज (काश्मिरी) व मियाऊक (बर्मीज) ही अन्य नावे आहेत.

दख्खनी व उत्तरी
एस. एच. प्रॅटरच्या अभ्यासानुसार दख्खनी माकडाची उंची बसलेल्या स्थितीत २ फुटांहून थोडी कमी भरते, तर उत्तरी माकड साधारण २ फूट उंच असते. दख्खनी माकड नराचे वजन ६-९ किलो असते, तर उत्तरी माकडाचे एखाद किलोने जास्त असते. मध्यम आकाराच्या दख्खनी प्रजातीची शेपटी इतरांच्या तुलनेत लांब असते ज्याचा तोल सांभाळताना फायदा होतो. स्वाभाविकपणे ही प्रजाती जास्त वेळ झाडांवर घालवते, तर उत्तरी माकड जमिनीवर जास्त असते व अधूनमधून खडक-कपारींतसुद्धा वावरते. दख्खनी माकडाचे वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरील मोठे केस जे कपाळाजवळ भांग पाडल्यासारखे दिसतात. उत्तरी माकड जास्त थोराड असते व डोक्यावरील केस मागे वळलेले असतात. दख्खनी माकडाच्या अंगावरील केसांच्या रंग व रुपात ऋतूनुसार थोडा फरक पडतो. थंडीत वरच्या बाजूचे केस तपकिरी हिरवट व चमकदार, आणि पोटाकडील केस पांढरट दिसतात. उन्हाळ्यात केसांची चमक जाऊन ते फिके पिवळटराखाडी व खरखरीत बनतात. उत्तरी माकडाचा पार्श्वभाग लालसर रंगाचा असतो व अंगावरील केस थंडीत दाट होतात.
मिश्रआहारी माकडाच्या मेन्यूमध्ये फळे, पाने, किडे, अळ्या व कोळी यांचा समावेश असतो. माकड समाजप्रिय असते. एका वेळी २०-३० माकडांची टोळी जमिनीवर किंवा झाडावर अन्न शोधत फिरताना दिसून येते. टोळीतील प्रत्येक सदस्याचे, विशेषतः नरांचे, स्थान ठरलेले असते. एका टोळीचे फिरण्याचे क्षेत्र साधारण ५ चौरस किमी असू शकते. अन्नाच्या शोधात काही वेळा लंगुरच्या टोळीसोबत उत्तरी माकडाची टोळी परस्परसहकार्य करते.
डोंगर व सपाटीवरील जंगले, तसेच ग्रामीण भागात या दोन्ही प्रजातींचा वावर असतो. दख्खनीपेक्षा उत्तरी माकड जास्त मोकळा प्रदेश पसंत करते. अनेकदा शहरांतसुद्धा माकडे येतात, आणि रेल्वे व बसस्थानके, किल्ले व देवळांचा परिसर आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या भागात अन्नाच्या शोधात फिरताना दिसतात. लंगुरपेक्षा माकड जास्त आक्रमक असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. याचा मला प्रत्यय आलाय. उत्तर मुंबईत आमच्या घरी एकदा बाल्कनीतून आत येऊन एक माकड सोफ्यावर बसले. मी हात उंचावून हाकलले तर ते माझ्यावर गुरगुरू लागले. मग हातात काठी घेतल्यावर लगेच उडी मारून पसार झाले. पुढे दोन दिवसांनी बाल्कनीतील झाडांना पाणी घालताना अनवधानाने जवळ गेल्यावर याच माकडाने माझ्या आईच्या हाताला बोचकारले (बहुतेक भीती वाटल्याने).

संवर्धन
अनेक वर्षे वैज्ञानिक प्रयोग व अन्य कारणांसाठी माकडे पकडली गेली आहेत. शिवाय मानवाशी इतर कारणांनीसुद्धा संघर्ष उद्भवतोच. अनेकदा लोक माकड व अन्य वन्य प्राण्यांना खायला घालतात, जे चुकीचे आहे. वन्य प्राणी आपले स्वतःचे अन्न शोधायला समर्थ असतात. असे आयते अन्न देण्याची सवय लावली, तर पुढे जाऊन माकडे अधिक आक्रमक होऊन खायला न देणाऱ्या लोकांच्याही हातातील पदार्थ ओढून घेतात. मला असा अनुभव बोरीवलीच्या कान्हेरी गुंफांच्या जवळ दोनदा आलाय. याउलट पर्यटक फारसे येत नसलेल्या दूर रानातील माकडांना अशा सवयी लागलेल्या नसतात व ती हल्ला करत नाहीत. तसेच, अशी दुर्गम भागातील माकडे लाजरी असतात व माणसाच्या वावराची सवय झालेली माकडे निडर बनतात.
माकडे मोठ्या प्रमाणावर फळे खातात. खाली पडलेल्या फळांतून व विष्टेतून दूरदूरच्या ठिकाणी पडलेल्या बियांमुळे उत्तम प्रकारे बीजप्रसार होतो. यातून हळूहळू जंगलाचा विस्तार व्हायला मदत होते. पण, सतत तोड केल्याने जंगले कमी झाली, तर माकडे बागायती व शेतीमध्ये अन्न शोधत सर्रास येतात. यातून शेतकऱ्याचे खूप नुकसान होते. जंगले व अन्य अधिवास शाबूत ठेवले आणि उगाच जास्त जवळीक नाही केली, तर सुरक्षितपणे मर्कटलीला पाहायची मजा तर येईलच, पण निसर्गाचा समतोलसुद्धा राखला जाईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link