Next
बॉलिवूडमधील ट्रेंडसेटर लग्न
मृण्मयी नातू
Friday, November 30 | 05:00 PM
15 0 0
Share this storyहिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्याचे लग्न नुकतेच राजेशाही थाटात झाले, तर दुसऱ्या लोकप्रिय जोडीचे लग्न कसे होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यात सोशल मीडिया आणि जवळपास सर्वच प्रसारमाध्यमे आघाडीवर आहेत. या कलाकार मंडळींच्या आयुष्यातील क्षणाक्षणाच्या बातम्या ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहवत असतातच शिवाय ही मंडळीदेखील सोशल मीडियावरून अपडेट देत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीमधील कलाकार मंडळींची लग्ने अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरली आहेत. अर्थात हे सगळं अलिकडच्या काळात प्रमाण जास्तच वाढले आहे.
काही वर्षांपूर्वी विविध चर्चांपासून लांब राहण्यासाठी कलाकार मंडळी लपूनछपून लग्न करायचे आणि कालांतराने त्याची जाहीर वाच्यता करायचे. याचे ठळक उदाहरण म्हणून जया-अमिताभ बच्चन, डिम्पल-राजेश खन्ना, माधुरी-श्रीराम नेने यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. आज सोशल मीडियामुळे कलाकारांच्या लग्नसोहळ्यांना ग्लॅमर लाभले आहे. आजचे कलाकार परदेशात जाऊन ‘डेस्टिनेशन वेडिंग’ करण्यावर भर देताना दिसत आहेत. याचे उदाहरण म्हणजे अनुष्का-विराट कोहली, दीपिका-रणवीरसिंग, राणी मुखर्जी-आदित्य चोप्रा, नील नितीन मुकेश-रुक्मिणी सहाय, सोहा अली खान-कुनाल खेमू, अर्पिता खान-आयुष शर्मा, सोनम कपूर-आनंद अहुजा, शाहिद कपूर-मीरा राजपूत, बिपाशा बसू-करणसिंग ग्रोव्हर, ऐश्वर्या-अभिषेक बच्चन ही काही मनोरंजनविश्वातील गाजलेली लग्न म्हणता येतील.
एकूणच सध्या बी-टाऊनमध्ये लग्नाचे सुसाट वारे वाहत आहेत. रणवीर-दीपिका असो वा प्रियांका-निक त्यांच्या लग्नातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींचा सोशल मीडियावर गाजावाजा होत आहे. यानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील झालेल्या लग्नांतील काही ठळक ट्रेंड्स पाहुया!

नावातच सगळे काही!
आजच्या डिजिटल जमान्यात सगळे काही नावातच दडलेले आहे. लग्नावेळी नवरा-नवरीच्या नावातून जोडीचे एक वेगळे नाव ठेवले जाते. याचा हॅशटॅग बनतो. अशा हटके नावांचा हा ट्रेंड सैफीना (सैफ अली खान+करीना कपूर) यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या लग्नावेळी सुरू झाला होता. ही परंपरा पुढे विरुष्का (विराट+अनुष्का) आणि आता दीपवीर (दीपिका+रणवीर) यांचे फॅनक्लब नेत आहेत. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हेदेखील विवाहबद्ध होत असल्याने त्यांचे जगभरातील चाहते याला ‘निकयांका’ म्हणून संबोधत आहेत. सैफीना, निकयांका, दीपवीर ही सगळी जोडनावे सोशल मीडियावर गाजत आली आहेत. आता सगळ्यांना रालिया (रणबीर कपूर+आलिया भट) कधी बोहल्यावर चढणार असल्याचे जाहीर करणार आहेत याची उत्सुकता आहे.

विधी एकदा नव्हे दोनदा!
दीपवीरच्या निमित्ताने जगाने त्यांचा कोंकणी आणि सिंधी अशा दोन्ही पद्धतीचे लुक्स डोक्यावर घेतले. मुळात अशा दोन पद्धतीने लग्न करणे ही बॉलिवूडची खासियत आहे. आंतरजातीय विवाह म्हटल्यावर दोन्हीकडच्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी ही मंडळी बऱ्याचदा दोनदा लग्न करतात. अगदी आता प्रियांका आणि निक हेदेखील हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने एकमेकांना स्वीकारणार आहेत. याआधी विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या लग्नातही पंजाबी आणि तामिळ पद्धतीचा मिलाफ बघायला मिळाला. 

तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री असिनने राहुल शर्मा या बिझनेसमनशी हिंदू आणि ख्रिश्चन अशा रीतसर दोन्ही पद्धतीने लग्न केले. क्रिकेटस्टार युवराज सिंग आणि हेझल कीच यांचे शीख आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने केलेले लग्न सोशल मीडियाने डोक्यावर घेतले होते. रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूझा यांनी मराठमोळ्या आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने धुमधडाक्यात लग्न केले होते. अनेक वर्षांपूर्वी सोहेल खान आणि सीमा सचदेव यांनी तर पंजाबी, निकाह आणि आर्य समाज अशा तीन पद्धतीने लग्न करत एक वेगळाच पायंडा पाडला.

लग्नांसाठी हिट आणि हॉट : इटली
रणवीर आणि दीपिका यांनी इटलीच्या लेक कोमोच्या रम्य ठिकाणी मोजक्या लोकांसमोर लग्न केले. तसेच काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी व अजय पिरामल यांचे चिरंजीव आनंद यांच्यात साखरपुडाही लेक कोमोलाच पार पडला. तसेच अनुष्का आणि विराट यांचेही शुभमंगल सावधान टस्कनीच्या बोरगो फिनोशेईतोला झाले आहे. काही वर्षांपूर्वी राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनीही इटलीला जाऊन लग्न केले होते. तसेच सुरवीन चावला, नेहा भसीन आदी सेलेब्रिटींनीही लग्नासाठी इटलीला डेस्टिनेशन वेडिंग म्हणून निवड केली होती. मीडियापासून लांब आणि सुरक्षेच्यादृष्टीने उत्तम पर्याय असल्याने इटलीला प्राधान्य दिले जात आहे.

असेही समाजकल्याण!
लग्नाला जायचे म्हणजे गिफ्ट न्यावे लागते अशी जगमान्य रीत आहे, मात्र यातून समाजहित कसे करता येईल यावर स्टार मंडळींचा भर आहे. लग्न ‘विद अ सोशल कॉज’ची नवीन लाट इंडस्ट्रीत आलेली दिसत आहे. प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी याची सुरुवात केली, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रणवीर-दीपिका यांनीही गिफ्ट्स आणू नका असे पत्रिकेत नमूद केले. त्याऐवजी हे पैसे मानसिक स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या दीपिकाच्या ‘द लिव्ह लव्ह लाफ’ या संस्थेला दान करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. तर जॉर्ज क्लूनी-अमाल अमालुद्दीन, अँजेलिना जॉली-ब्रॅड पिट या हॉलिवूड स्टार्ससारखे प्रीती झिंटानेही तिच्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव केला. लहान मुलांचे शिक्षण बघणाऱ्या संस्थेला मदत करण्यासाठी तिने हे पाऊल उचलले होते. असेच काहीसे विरुष्का यांनीही केले आहे. त्यांनी लग्नातील फोटो एका अमेरिकन मासिकाला विकले असून त्यातून मिळालेला निधी दान केला. अशी एक ग्लोबल कोलॅबोरेशन प्रियांका चोप्रानेही केली आहे. प्रियांकाने तिच्या लग्नानिमित्त अमेझॉन या कंपनीला तिच्या नवीन संसारासाठी लागणाऱ्या आवडत्या भेटवस्तूंची यादी बनवून दिली आहे. त्याबदल्यात अमेझॉनने युनिसेफला एक लाख डॉलर्स देण्याचे वचन दिले आहे.

परदेशी जोडीदार

सध्या प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉपस्टार निक यांच्या लग्नाची सर्वांना जबरदस्त उत्सुकता आहे. मुळात हे काही पहिले ग्लोबल जोडपे नव्हे. याआधीही बॉलिवूडमधल्या अशा अनेक तारका आहेत ज्या परदेसी बाबूंसोबत लग्नाच्या बेडीत अडकल्या आहेत. सोशल मीडियावरील पोस्टमुळे बर्फी गर्ल एलियाना डिक्रुझनेही परदेशी नवरा निवडल्याचे समोर आले, तर दोन वर्षांपूर्वी प्रीती झिंटाने फायनान्शिअल अनॅलिस्ट असलेल्या जीन गूडइनफ याच्याशी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले. श्रिया सरनने अलिकडेच आंद्रे कोसचिव या रशियन बॉयफ्रेंडसोबत दोनाचे चार हात केले. भारतीय पद्धतीने त्यांनी उदयपूरला हे लग्न केले. सेलिना जेटलीनेही मूळ दुबईच्या ऑस्ट्रेलियात स्थायीक झालेल्या पीटर हॅग यांसोबत संसार सुरू केला आहे. लिसा रेनेही कॅलिफोर्नियाच्या जेसन देहनी या मॅनेजमेंट कन्सल्टन्टला जीवनसाथी म्हणून निवडले आहे. आपल्या राधिका आपटेचाही नवरा म्हणजेच बेनेडिक्ट टेलर हा मूळचा ब्रिटिश संगीतकार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link