Next
भारतातल्या आदिमानवाच्या शोधात
निरंजन घाटे
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story


डॉ. सुषमा देव या जरी त्यांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असल्या तरी ही प्रसिद्धी त्यांच्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे. तसंही संशोधनासाठी त्यांनी निवडलेल्या क्षेत्राची आपल्याला फारशी, कशाला, अजिबातच कल्पना नसते. त्या पुरातत्त्वशास्त्रात संशोधन करतात आणि त्यांच्या संशोधनाचा हेतू भारतात आदिमानव केव्हा, कसा आणि कुठून आला, याचे भक्कम पुरावे शोधणं हा आहे. आपल्या देशाला महान परंपरा आहे वगैरे म्हणणाऱ्यांना गेल्या दोन-चारशे वर्षांचा इतिहासही फारसा माहीत नसतो, अशा परिस्थितीत भारतीय प्रागैतिहासिक काळ आणि पाषाणांची हत्यारं करून त्यांच्या साहाय्यानं शिकार करून पोट भरणारा माणूस, हा आपला पूर्वज हे सत्य तर त्यांना झेपणारं नसतं. त्यामुळे भारतातील आदिमानवांच्या आणि ऐतिहासिक कालखंडाच्या अभ्यासकांकडे आपलं दुर्लक्षच होतं. केवळ मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन नावांपाशी भारतातील मानवी इतिहास केंद्रित नाही, हे सिद्ध करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. सुषमा देव यांचा समावेश होतो. त्यांचं शिक्षण पुण्यातच झालं. हुजुरपागा, स.प. महाविद्यालय असा त्यांचा शैक्षणिक प्रवास पुढे डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेतून पीएच.डी. संपादन करून अजूनही चालूच आहे. त्यांनी पीएच.डी.साठी डेक्कन कॉलेजमध्ये (आता अभिमत विद्यापीठ) डॉ. आर.एस. पप्पू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घटप्रभाखोऱ्यातील पुरापाषाणयुगीन मानवी वसाहती’ या विषयावर संशोधन केलं. त्याच काळात त्यांनी संगणकासंबंधित महाराष्ट्र तंत्रशिक्षण परिषदेची पदविका मिळवली. याचा फायदा त्यांना डेक्कन कॉलेजमध्ये संगणकीय पुरातत्त्व या अगदी नव्या पुरत्त्त्वशाखेचा पाया घालताना झाला. याच विषयात त्या प्राध्यापक म्हणून काम करू लागल्या.
डॉ. पप्पूंखेरीज त्यांना डॉ. शरद राजगुरू या आांतरराष्ट्रीय ख्यातीच्या भूपुरातत्त्वज्ञाचंही पुढील संशोधनात मार्गदर्शन लाभलं. त्यांनी ज्या महत्त्वाच्या उत्खननांत भाग घेतला त्यातली बरीचशी पाषाणयुगाशी संबंधित असली आणि त्यासाठी त्यांना कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुर्गम प्रदेशात काम करावं लागलं असलं तरीही त्यांचं एक महत्त्वाचं संशोधन कोकणकिनाऱ्यावरचं आहे. कोकणातील केळशी-वेळास इथल्या समुद्रकिनारी त्यांना लाटांमुळे तयार झालेल्या वाळूच्या टेकड्यांत- शास्त्रीय भाषेत वालुका गिरीवर, मानवी वसाहती होत्या याचे पुरावे मिळाले. सागराच्या इतक्याजवळ मानवी वस्ती होती याचं भारतातलं हे पहिलं आणि महत्त्वाचं उदाहरण आहे. ही वस्ती सातवाहनकाळात होती. त्यानंतरही बराच काळ या वालुकागिरींवर मानवी वस्ती होती, असं हे पुरावे सांगतात.

डॉ. देव यांनी पीएच.डी.नंतर भूपुरातत्त्व आणि प्राचीन पर्यावरण यासंबंधी संशोधन सुरू ठेवलं. संशोधनात नेहमीच स्थानिकांची मदत घ्यावी लागते. तरीही हे ज्या अर्थी इथे खणाखणी, उकराउकरी करताहेत त्याअर्थी हे सोनं शोधायला तरी आले असावेत किंवा गुप्तधन शोधायला आले असावेत, असा गावकऱ्यांचा समज होतोच. काही काळानं हे संशोधक माती उकरताहेत, नदीकाठच्या गाळातील दगडांच्या कपच्या शोधताहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात येतं तेव्हा गावकरी स्वत:हून त्यांच्या शेतात किंवा माळरानावर सापडलेली पाषाणहत्यारं आणून द्यायला सुरुवात करतात. डॉ. देव यांना असा अनुभव त्यांनी भारतात जिथे जिथे उत्खनन केलं त्या त्या ठिकाणी आला. एवढंच नव्हे, तर सुमारे वीस वर्षांनंतर त्यांनी कर्नाटकात पुन्हा नव्यानं संशोधन सुरू केलं; तेव्हा त्या सुरुवातीच्या काळात त्यांना ज्या लोकांनी मदत केली होती, ते स्वत:हून पुढे आले असा अनुभव आणि अगत्य त्यांनी जागोजागी अनुभवलं. त्यांच्या संशोधनातून त्यांनी भारतात मानव किती पुरातन काळापासून वावरतोय याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या संशोधनावर काही वेळा टीका झालेलीही त्यांनी सहन केली. महाराष्ट्रातल्या संशोधनात येणारी एक प्रमुख अडचण म्हणजे महाराष्ट्रात जी पाषाणाची हत्यारं सापडतात, ती बहुधा बेसॉल्टची असतात. बेसॉल्ट या खडकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात क्वार्ट्झ म्हणजे सिलिकाचं स्फटिकरूप किंवा खनिजांचं तापदीप्तीतंत्राच्या साहाय्यानं वय निश्चित करता येईल अशी खनिजं बेसॉल्ट या खडकात अंगभूत असत नाहीत. ज्यावेळी अशाप्रकारचं खनिज तापवलं जातं त्यावेळी ते प्रस्फुरित बनतं, त्यावरून त्या खनिजाचं निरपेक्ष वय (अॅब्सोल्युट एज) निश्चित करता येतं. या तंत्राची एवढी माहिती पुरेशी नसली तरी हा लेख त्याविषयी नाही. मुद्दा काय, की त्यामुळे महाराष्ट्रात सापडणाऱ्या पाषाणयुगीन हत्यारांचं वय निश्चित करणं अवघड जातं. विद्यावाचस्पती झाल्यानंतर १९९५ मध्ये त्या डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेत व्याख्यात्या म्हणून काम करू लागल्या. त्यांना संगणक प्रशिक्षणाचा फायदा मिळाला म्हणून त्यांनी इथे पुरातत्त्वशास्त्र आणि संगणक यांचा मेळ घालून काम करायला सुरुवात केली. कुठल्याही शास्त्रीय संशोधनात संदर्भांना खूप महत्त्व असतं. त्यासाठी त्यांनी पुरातत्त्वीय संदर्भ सहज पण अचूकपणे मिळवून देणारी संगणकप्रणाली निर्माण केली. त्याचप्रमाणे उत्खननात आढळणाऱ्या प्राण्यांच्या अवशेषांचा अभ्सासासाठीही त्यांनी एक पुराप्राणी शास्त्रीय संगणकीप्रणाली तयार केली. त्याचबरोबर पुरातत्त्वीय संशोधनाद्वारे त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थ्यांनी एम.फिल. आणि पीएच.डी. केल्या आहेत. यात काही परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. भीमेच्या खोऱ्यातील नद्या आणि उपनद्यांच्या प्रवाहांमुळे ज्या ठिकाणी अवसाद साठले आहेत अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आढळणाऱ्या प्रागैतिहासिक मानवी वस्त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे त्यांच्या संशोधनाद्वारे पुढे आलेले आहेत. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक म्हणजे मोरगावचा गणपती, पण डॉ. देव यांच्या दृष्टीनं या मोरगावला वेगळंच महत्त्व आहे. मोरगावात त्यांना प्रागैतिहासिक काळातील मानवी अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेतच शिवाय इथल्या अवसादात जांभ्या दगडाचे तुकडे डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या उत्खननात आढळले. जांभा दगड हा शुष्क वातावरणात तयार होत नाही, त्यावरून या भागातल्या पुरापर्यावरणात कसा बदल झाला असावा, हा तर्क करता येतो. आज इथल्या जवळपासच्या कुठल्याही डोंगरावर जांबा दगड आढळत नाही, असं असताना हे गोटे आले कुठून, हा प्रश्न डॉ. देव यांना महत्त्वाचा वाटतो.

डॉ. देव यांनी पोर्तुगालमध्येही तीन महिन्यांच्या वास्तव्यात भारतीय प्रागैतिहास या विषयावर शिक्षण दिलं. इथे त्या इरॅस्मस मूड्स या संशोधकांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मानकरी म्हणून गेल्या होत्या. त्या काळातच त्यांनी विविध पुरातत्त्वीय वस्तुसंग्रहालयांना भेटी दिल्या, तसंच इटलीतील व्हाल्कामोनिका इथल्या आदिमानवी भित्तीचित्रांचा अभ्यास केला. याशिवाय परदेशातील विविध पुरातत्त्वीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांचं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील संशोधनही प्रसिद्ध आहे. कुकडी नदीच्या पात्रात सापडलेल्या ज्वालामुखीय राखेच्या थराच्या अभ्यासात त्यांचा समावेश होता. सुमारे सात लाख वर्षांपूर्वी इथे येऊन पडलेल्या राखेच्या थरात मानवी अवजारं आणि मानवी अस्तित्वाचे पुरावे आढळल्यामुळे हे संशोधन गाजलं. ही राख इंडोनेशियामधील टोबा ज्वालामुखीच्या उद्रेकातून उडून इतक्या दूरवर येऊन पडली, यावरून त्या उद्रेकाची तीव्रता लक्षात येते. त्यांचं मध्य प्रदेशातील तिकोडा येथील संशोधन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या सहकार्यानं सुरू असून तिथे त्यांना मानवी वसाहतीचे खूप पुरावे सापडले आहेत. त्यात सुमारे ५० हजारांहून अधिक अश्मयुगीन हत्यारांचा समावेश आहे. मानवी अस्तित्वाचे एवढे पुरावे भारतात अन्यत्र मिळालेले नाहीत. सध्या डॉ. देव डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठात पुरातत्त्व विभागाच्या विभागप्रमुख असून भारतीय इतिहास परिषदेच्या वार्षिक परिषदेच्या अध्यक्षपद त्या भूषवणार आहेत. ही परिषद या वर्षी (२०१८) पुण्यात भरत असून या सभेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळणं ही अभिमानाची गोष्ट आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link