Next
विकेट‘प्रीत’ बुमराह
भूषण करंदीकर
Friday, January 04 | 03:00 PM
15 0 0
Share this story

भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्नमधील कसोटी विजयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन वर्षांपासून तो संघाचा आधारस्तंभ बनला आहे, यात काहीच वाद नाही. सातत्याने जलदगतीने गोलंदाजी करणे फार अवघड असते आणि नेमके तेच कसब या गुणी गोलंदाजाने अवगत केले आहे. जसप्रीत बुमराह हा खरे तर आयपीएलस्पर्धेमुळे चर्चेत आलेला एक क्रिकेटपटू आहे. तो सातत्याने राष्ट्रीय पातळीवर खेळताना चांगली कामगिरी करत होता, तरीही खऱ्या अर्थाने चर्चेत आला तो आयपीएलमुळे. आयपीएलच्या त्याच्या पहिल्या सीझनमध्ये त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर टीका झाली होती. तेव्हा हा गोलंदाज आंतरराष्ट्रीय  क्रिकेटमध्ये इतक्या आत्मविश्वासाने येईल आणि भारतीय संघाचा आधारस्तंभ बनेल, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र सर्वांचे अंदाज खोटे ठरवत त्याने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
भारताच्या एकदिवसीय संघात त्याने २०१६मध्ये पदार्पण केले. तरीही आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवण्यासाठी त्याला २०१८पर्यंत वाट पाहावी लागली. त्यातही त्याने त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी तो भारतीय कसोटी क्रिकेटसंघाचा अविभाज्य भाग बनला आहे. २०१३मध्ये जसप्रीत पहिला आयपीएल सीझन खेळला तो मुंबई इंडियन्सकडून. मूळचा गुजरातचा असणाऱ्या बुमराहने, आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते त्याच्या गोलंदाजीच्या हटक्या शैलीने. तो सातत्याने ताशी १४०-१४५ कि.मी. वेगाने मारा करू शकतो,  तसेच त्याचे यॉर्कर भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवतात. त्याचे बॉउन्सर्स अनेक फलंदाजांच्या उरात धडकी भरवतात. त्यामुळे अल्पावधीतच तो जास्त लोकप्रिय झाला.
मात्र जसा तो लोकप्रिय झाला तसा तो काही जणांच्या टीकेचा धनीही ठरला. विशेषतः त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून त्याला खूप जहरी टीका सहन करावी लागली. भारताचे माजी कर्णधार क्रिकेटपटू कपिल देव यांनाही बुमराहची शैली खटकली होती. मात्र त्यात गुणवत्ता कमी आहे, असे त्यांचे म्हणणे नव्हते, तर त्याच्या या शैलीमुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर मर्यादा येऊ शकतील, अशी भीती त्यांना वाटत होती. शिवाय त्याला दुखापती सतावतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. मात्र मेलबर्नमधल्या कामगिरीनंतर कपिल यांनी प्रांजळपणे आपले मत चुकीचे असल्याचे म्हटले आहे, शिवाय त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी भरभरून शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
एवढ्या कमी रनअपमध्ये सातत्याने १४०-१४५ कि.मी. तास वेगाने गोलंदाजी करणे खूप अवघड असल्याचेही कपिल यांनी कौतुकाने म्हटले आहे. बुमराहची क्रिकेट कारकीर्द आणखी बरीच वर्षे आहे, तो सातत्याने त्याच्या कामगिरीत सुधारणा करत आहे आणि संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावत आहे. खरे तर भारतीय क्रिकेटसंघात जलदगती गोलंदाजांची उणीव कायम भासत आली. कोणीतरी एकच जलदगती गोलंदाज भारतीयसंघाचा कायम आधारस्तंभ बनत आला. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. सध्या संघात तीन-तीन जलदगती गोलंदाज आहेत आणि तेही ताकदीचे. या संघात बुमराह स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून टिकवून ठेवतोय, हीच कौतुकाची बाब आहे.
बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे आता बुमराहला चाहत्यांच्या वाढलेल्या अपेक्षांचे ओझे सहन करण्याचीही तयारी करावी लागणार आहे. त्याच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link