Next
मुंबईची शोकांतिका
शरद कद्रेकर
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this story“आमची फलंदाजी ढेपाळली, भागीदाऱ्या रचण्यात आम्ही अपयशी ठरलो. प्रतिस्पर्धांना दोनदा गारद करण्यास (२० बळी टिपण्यात) आमच्या गोलंदाजांना जमले नाही. परिणामी निर्णायक विजयांनी आम्हाला हुलकावणी दिली.” हे उद्गार आहेत मुंबईचा कर्णधार धवल कुलकर्णीचे.

छत्तीसगडसारख्या दुबळ्या संघाला मुंबईने वानखेडेवर नमवले, तेदेखील तिसऱ्या दिवशी केवळ १४ चेंडूतच. यादरम्यान विक्रांत औटीची विकेट गमावल्यामुळे मुंबईचा बोनस गुण हुकला अन् ७ ऐवजी ६ गुणांवरच त्यांना समाधान मानावे लागले. यंदाचा मोसम (२०१८-१९) मुंबईसाठी खराबच ठरला. ४१ वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या सिंहाची आयाळ गळू लागल्याचे स्पष्टपणे जाणवते. छत्तीसगडावरील विजयामुळे मुंबईची विजयाची पाटी कोरी राहिली नाही, पण रणजीच्या साखळी स्पर्धेतच गारद होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. आठ सामन्यांतून १७ गुण, यावरूनच मुंबईच्या ढिसाळ कामगिरीची कल्पना येते. ९ संघांच्या ‘अ’ गटात मुंबईला मिळाला सहावा क्रमांक, त्यामुळे अव्वल गटातून खालच्या गटातील गच्छंती टळली, हीच त्यातल्या त्यात दिलासादायक बाब.

सलामीची जोडी स्थिरावलीच नाही, मधली फळी गडगडत राहिली आणि गोलंदाजांना (जलद तसेच फिरकी) विकेट काढता आल्या नाहीत. परिणामी अपेक्षित निकालांनी मुंबईला हुलकावणी दिली. फलंदाजीतील कमकुवतपणामुळे मुंबईचा संघ प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पिछाडीलाच पडत राहिला, असे धवल म्हणाला. इतरही कारणे मुंबईच्या पीछेहाटीला पोषक ठरली. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, भारतीय संघाबरेाबर ऑस्ट्रेलियात असल्यामुळे त्यांची गैरहजेरी अपेक्षितच होती. पृथ्वी शॉदेखील परदेशात तसेच दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याची उणीव भासली. श्रेयस अय्यर भारतीय ‘अ’ संघात असल्यामुळे तोदेखील बहुतांश सामने खेळू शकला नाही. मुंबईकडे दुसरी फळीच नव्हती. बदली खेळाडू अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. अनुभवाची कमतरता हेच त्याचे कारण असावे.

कर्णधार धवल म्हणाला, “आम्हाला चार अनुभवी फलदाजांची गरज होती. आमचे चार प्रमुख शिलेदार उपलब्ध नव्हते. फलंदाजींची मजबूत फळी हेच मुंबई क्रिक्रेटचे वैशिष्ट्य. सहसा दोन फलंदाज खेळपट्टीवर ठाण मांडतात, परंतु दुर्दैवाने यंदा तसे झाले नाही. अजिंक्य, श्रेयस, सूर्या यापैकी कुणीतरी एक तारणहार असायचा. यंदा मात्र तसे घडले नाही. श्रेयस आला तो अखेरच्या काही सामन्यांसाठी! फलंदाजी ढिसुळ होती, भागीदाऱ्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. सिद्धेश लाड, शिवम दुबेच्या अष्टपैलू खेळाने थोडीफार छाप पडली, परंतु फलंदाजी कोलमडली, अशी खंत धवलने व्यक्त केली.

फलंदाराजांकडून मोठ्या भागीदाऱ्या रचल्या गेल्या नाहीत. मधल्या फळीने भागीदाऱ्या केल्या असल्या तर चित्र पालटले असते. प्रतिस्पर्ध्यांना दोनदा गारद करण्यात आम्ही अपयशी ठरलो. निर्णायक विजयासाठी प्रतिस्पर्ध्याचे २० मोहरे टिपणे आवश्यक असते, तेच आम्हाला जमले नाही. यंदाच्या मोसमातील चुकांपासून धडा घेत पुढच्या मोसमात कठोर परिश्रम करावे लागतील, अशी कबुली धवलने दिली आहे. दर्जेदार फिरकी गोलंदाजांचा अभाव मुंबईला प्रकर्षाने जाणवतो आहे. सध्याच्या गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. अनुभवाची कमतरता निश्चितच जाणवते. काही कालावधीनंतर हे गोलंदाज परिपक्व होतील, अशी अपेक्षा आहे.
विजय हजारे करंडक पटकावून मुंबईने यंदाच्या मोसमाची सुरुवात तर सुरेख केली होती. जवळपास एका दशकानंतर मुंबईला एकदिवसीय स्पर्धेत (विजय हजारे करंडकस्पर्धा) यश मिळाले, परंतु मोसमाची ही सुरुवात फसवीच ठरली. मर्यादित षटकांच्या स्पर्धेत रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ मुंबईकडून खेळले, परंतु रणजी करंडकासारख्या मानाच्या, प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय अजिंक्यपदाच्या स्पर्धेत मात्र त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.

यंदाच्या रणजी मोसमात मुंबईने युवा नवोदित खेळाडूंना मोठी संधी दिली, परंतु त्याचा फायदा उठवण्यात हे कमी पडले. जनरेशन नेक्स्ट खेळाडूंना आकर्षित करते टी-२० झटपट क्रिकेट. आयपीएल हेच त्यांचे ध्येय. रणजीसारख्या ४-५ दिवसांच्या सामन्यांसाठी खेळपट्टीवर पाय रोवून संयमी खेळ करण्याची गरज असताना फटकेबाजीच्या नादात क्रिकेट फेकणाऱ्या युवा खेळाडूंना संयमाची गरज आहे आणि याचे सुरेख प्रात्यक्षिक अनुभवी, बुजूर्ग खेळाडू वसीम जाफरने घडवले. मुंबईविरुद्ध नागपुरात १७८ धावांची खेळी करणाऱ्या वसीमकडून मुंबईचे नवोदित खेळाडू काही शिकले असतील, अशी अपेक्षा करू या! ४१वेळा रणजी जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला, हीच मुंबई क्रिकेटशौकिनांची शोकांतिका आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link