Next
राज्यसेवा पूर्वपरीक्षा : इतिहास विषयाची तयारी
फारुक नाईकवाडे
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this story

मागील दोन लेखांमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीचा अॅप्रोच कसा असायला हवा याबाबत सर्वसाधारण माहिती दिली होती. या लेखापासून पेपर एक आणि पेपर दोन यामधील घटकांची अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने तयारी कशी करावी हे पाहुया.

प्रशासनात काम करताना अधिकारी कल्याणकारी राज्याचे Welfare State चे प्रतिनिधित्व करत असतात. नफ्यातोट्याच्या तराजूपेक्षा जनतेच्या कल्याणाचे मापदंड इथे जास्त महत्त्वाचे ठरतात. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्ट्ये आणि इतिहास यांच्या आधारे ठरवले जातात. त्यामुळेच स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये ‘इतिहास’ हा घटक निरपवादपणे समाविष्ट असतो. इतिहासाच्या समावेशाचे हे कारण लक्षात घेतले तर कालानुक्रमाची जंत्री पाठ करण्यापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग असे काही या विषयात आहे, हे लक्षात येईल. ‘इतिहास’ हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे, त्यामुळे तथ्यांपेक्षा लॉजिकल अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे. त्याच वेळी प्रोफेशनल अॅप्रोचही ठेवायला हवा.
प्राचीन इतिहास हा घटक वर्तमानाशी प्रत्यक्षपणे जोडला गेलेला नसला आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम जाणवत नसला तरीही याचा परीक्षोपयोगी आढावा घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या तयारीमध्ये पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत-

प्राचीन भारतीय इतिहास

या काळातील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिष्टे, उत्खननकर्ते, इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, इतिहासकारांची मते, साहित्य, सामाजिक पैलू यांचा आढावा घ्यावा.

प्राचीन महाराष्ट्र
सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करीत असताना घराणे/राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक स्थिती, महत्त्वाच्या घटना : प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.

मध्ययुगीन इतिहास

याही काळाचा वर्तमानावर प्रत्यक्ष परिणाम जाणावत नसला तरीही आधुनिक इतिहासाचा पाया याच काळात रचला गेला आहे आणि त्याची परंपरा सामाजिक, कला, आर्थिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात राजकीय जीवनामध्ये वर्तमानातही प्रभावी ठरत असते. त्यामुळे हा भाग माहीत असणे आवश्यक आहे. या काळाच्या तयारीमध्ये पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत.
या घटकांवर विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असल्यामुळे नोट्स काढणे आणि त्यांची उजळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

राजकीय इतिहास
  • महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे टेबल तयार करावे.
  • मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास - चालुक्य, यादव, बहामनी - (इमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) वरील मुद्द्यांच्या आधारे करावा.

मराठा कालखंड (१६३०-१८१८)
  • मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी यांच्या स्वराज्यस्थापनेपासून १८१८पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्टप्रधान मंडळ, पेशव्यांची कारकीर्द हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
 
सांस्कृतिक-सामाजिक इतिहास
  • या कालखंडातील साहित्यिक, कलाकार, परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने, विविध कलाशैली, वास्तुरचना यांचा आढावा घ्यावा.
  • वारकरी संप्रदाय, महानुभव पंथ, संत व त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा.

आधुनिक इतिहास
हा वर्तमानास आकार देणारा आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा काळ असल्याने याचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे. तयारी करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत-

स्वातंत्र्यपूर्व इतिहास
स्वातंत्र्यप्राप्तीच्या टप्प्यात महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था, त्यांची कार्ये व ब्रिटिशांचे धोरण आणि त्यास भारतीयांची प्रतिक्रिया या मुद्यांवर प्रश्नांचा भर अधिक असतो. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन : देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पैलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते - जन्मठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे. महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधनकार्यासाठी दिलेले विशेष योगदान > या विभागाचा अभ्यास करण्यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासाची पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स हे पुस्तक अभ्यासा.

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास :
  • या विभागामध्ये घटनानिर्मितीची प्रक्रिया आणि त्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका, संस्थानांचे विलीनीकरण, त्यातील सरदार पटेल यांची भूमिका, संयुक्त महाराष्ट्र चळवळ; त्यातील महत्त्वाचे नेते, परिषदा, पंडित नेहरू आणि त्यांचे अलिप्ततावादी धोरण, इंदिरा गांधी आणि त्यांचे परराष्ट्र धोरण, १९९१ च्या आर्थिक धोरणाचा भारताच्या समाजावर पडलेला प्रभाव या प्रमुख मुद्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. यासाठी बिपिन चंद्र यांचे स्वातंत्र्योत्तर भारत हे पुस्तक महत्त्वाचा स्रोत ठरते. त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास करताना ज्या घटनांना शतक, द्विशतक, पंचाहत्तरी, पन्नाशी पूर्ण झाली आहे अशा घटना, गेल्या वर्षभरात चर्चेत आलेल्या ऐतिहासिक घटना व त्यांचे परिणाम यांची यादी करून त्यांचा विशेष अभ्यास करावा.
  • स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राचा अभ्यास करताना मराठवाडा मुक्तिसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे घटक अभ्यासावे. 
  • मराठी साहित्य संमेलने, भाषावार प्रांतरचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र सभा, महाराष्ट्र एकीकरण परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषद यांची स्थापना, नेते, मागण्या, उपक्रम, राष्ट्रीय नेते, कामगार, शाहीर यांची माहिती असायला हवी. त्यानंतर नागपूर करार, स्वतंत्र विदर्भाबाबतच्या घडामोडी यांचाही आढावा आवश्यक आहे.

संदर्भ सूची :
१)    राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची इतिहास विषयाची पुस्तके
२)    NCERT ८ वी ते १२ वीची इतिहासची पुस्तके (जागतिक इतिहास वगळून)
३)    महाराष्ट्राचा इतिहास - कठारे / गाथाळ
४)     आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोव्हर आणि बेल्हेकर
५)    इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स - बिपिन चंद्र
६)    राज्यसेवा अभ्यास प्रश्नपत्रिका - राष्ट्रचेतना प्रकाशन

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link