Next
तुम्ही म्हणजे अगदी ‘हे’ आहात!
सुरेश खरे
Friday, November 16 | 05:30 PM
15 0 0
Share this story

रात्रीचं जेवण आम्ही डायनिंग टेबलावर सर्वजण एकत्र घेतो. दिवाणखान्यात सोफ्यावर पाय पसरून, एकीकडे टीव्ही पाहत, ताटातलं अन्न चिवडत घशात कोंबणं, आमच्या जेवणाच्या व्याख्येत बसत नाही. यावेळी घरातला टीव्ही बंद असतो. मोबाइल सायलेंट मोडवर असतो. हसतखेळत, गप्पा मारत आमचं जेवण चालतं. वादावादी, कटू विषय आम्ही कटाक्षानं टाळतो. तोंडी लावायला लहान-मोठे वाद होतात, पण ते मोकळेपणानं दिलखुलास होतात. आजकाल आपला बाहेरच्यांशी संवाद जवळजवळ तुटत आला आहे. घरातल्या घरातसुद्धा परस्परातला संवाद दुर्मिळ होत चालला आहे. दिवसभरात कुणाला वेळच नसतो. अशा परिस्थितीत निदान आमच्या घरात आम्ही हे अलिखित नियम कसोशीनं पाळून परस्परसंवाद जपलेला आहे.

जेवण आटपल्यावर आमच्यातले संवाद रंगत जातात. एकीकडे सुलू आवराआवर करत असते आणि गप्पा चालू असतात. तर परवाचीच गोष्ट. जेवण आटपलं होतं. सुलूनं विषय काढला.

“दिवाळीला  माझ्यासाठी  काय  घेणार आहात?”

“काय घ्यायचं?”

“खरं म्हणजे मला असं विचारायला लागू नये, पण तुमच्या काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. त्या आणून द्याव्या लागतात.”

“तू काय म्हणतेस ते खरंच माझ्या लक्षात येत नाही.”

“तेच म्हणते मी. आपल्या लग्नाला या वर्षी पंचवीस वर्षं पूर्ण झाली.”

“काय सांगतेस काय? इतकी? कमाल आहे!”

“त्यात कमाल कसली डोंबलाची?” (सुलूला कोणतीही कमाल डोंबलाची वाटते)

“निदान या वर्षी तरी मला दिवाळीचं काहीतरी छानपैकी प्रेझेंट द्या.”

“पूर्वी मी देत होतो.”

“ते लग्नानंतर पहिली दोन-चार वर्षं.”

“अगं, तशीच पद्धत असते. लग्न जुनं झाल्यावर कुणी देत नाही.”

“बाकीचे नवरे देतात. तुम्ही म्हणजे अगदी ‘हे’ आहात.”

(सुलू माझ्याशी बोलताना ‘हे’ हे एकाक्षर माझ्या बाबतीत अनेक परस्परविरोधी अर्थानं वापरते. उदाहरणार्थ, बावळट, साधे, सज्जन, भोळे, चतुर, हुशार, कंजूष, उधळे, हट्टी, भिडस्त वगैरे वगैरे. ‘हे’ म्हणजे काय ते विचारायचं नसतं. असं विचारलं तर ती चिडते. आपण संदर्भानं आणि तिच्या ‘टोन’वरून समजून घ्यायचं असतं. आपण चुकून विचारलंच, तर तिचं उत्तर ठरलेलं असतं. ‘हे’ म्हणजे ‘हे’ समजलं? मी हे आपलं जाता जाता तुम्हाला सांगितलं.)

“मीही कधी दिलं नाही असं नाही. तुला आठवतं? एकदा मी तुला अंजिरी रंगाची साडी आणली होती.”

“तो अंजिरी रंग नव्हता चटणी कलर होता.”

“हे बघ, अंजिराच्या सालीचा रंग आणि तू जी चटणी करतेस तिचा रंग जवळजवळ सारखाच असतो.”

“मी अंजिराच्या आतल्या गराच्या रंगाविषयी बोलतेय.”

“मी अंजिराच्या बाहेरच्या सालीविषयी बोलतोय. काय आहे सुलू, मला रंगाविषयी काही कळत नाही ना म्हणून मी साडीबिडी आणायच्या भानगडीत पडत नाही.”

“तुमचं मी एक पाहून ठेवलंय. (हेही तिचं पेटंट वाक्य) सबबी सांगण्यात तुम्ही पटाईत आहात.” (हे थोडसं खरं आहे) आता विषय बदलणं भाग होतं.

“सुलू, तुला मी एक मस्त आयडिया सुचवतो. आपल्या लग्नाचा दिवाळसण किती थाटात साजरा झाला होता. तुझ्या आईला का नाही सांगत आपल्या दिवाळसणाची पंचविशी साजरी करायला? तुझी आई खरोखरच ग्रेट आहे. काय लाड केले होते त्यांनी माझे. अशी सासू मिळायला भाग्य लागतं.”

“तुम्ही काय मला हरभऱ्याच्या झाडावर चढवताय? माझी आई ग्रेट आहे याबद्दल शंकाच नाही. तिनं तुमचे मनापासून लाड केले, हेही खरं. पण तो तिचा स्वभावच आहे म्हणून. तुम्ही ग्रेट होता म्हणून नाही. मालिकांतल्या सासवा सोडल्या तर सर्वच सासवा साधारणपणे चांगल्या असतात. त्या जावयाची कौतुकं करतात ते आपल्या मुलीला जावयानं त्रास देऊ नये म्हणून. समजलं?”

“मला सांग, गेल्या पंचवीस वर्षांत मी कधी तुला त्रास दिला आहे? नाही! तुझ्या आईनं दिवाळसणाला माझं कौतुक केलं, म्हणून नाही, तर मुळात माझा स्वभाव चांगला आहे. समजलं? सुलू, आपण आपला पंचविसावा दिवाळसण आपल्या घरीच साजरा करू! कसा? तर तुझ्या आईबाबांना दिवाळीला आपल्याकडे बोलावून आपण त्यांचा दिवाळसण साजरा करू”.

“काSSय?”

“म्हणजे आपलं जसं त्यांनी कौतुक केलं तसं आपण त्यांचं कौतुक करू. लाड करू म्हटलंस तरी हरकत नाही. मुलगी आणि जावई सासू-सासऱ्याचा दिवाळसण साजरा करणार. आतापर्यंत कुणी केला नसेल. कशी आहे कल्पना?”

“तुम्ही खरं सांगताय?”

“अगदी खरं. मनापासून. तुझी शपथ. उद्याच्या उद्या आईला पत्र टाक.”

सुलूचे डोळे भरून आले.

“तुम्हीपण ग्रेट आहात.”

“यात ग्रेटबिट काही नाही.

“पण तुम्ही हुशार आहात हे नक्की!”

“हे आता हुशारीचं काय काढलंस नवीन?”

“दिवाळीला माझ्यासाठी काय आणणार, या माझ्या प्रश्नाचा कात्रजचा घाट केलात.”

“नाही, ते विसरलो नाही मी. या दिवाळीला मी तुझ्यासाठी…”

“काय आणणार आहात, सांगा ना?”.

“आणणार नाही, आणलंय म्हणजे ऑर्डर दिलीय”

“कसली?”

“तुझी फार दिवसांची इच्छा होती ना! इतके दिवस नाही जमलं. पण या वर्षी जमलं. तुला मी दिवाळीला हिऱ्यांचा कुडीजोड भेट देणार आहे.”

“काSSSय?” सुलूच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिचे डोळे आनंदानं चमकले.

“तुम्ही ना अगदी ‘हे’ आहात.” सुलू लाडात येऊन म्हणाली.

या वेळी मात्र या ‘हे’चा अर्थ नेहमीचा नव्हता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link