Next
आनंदयात्री
अमिता बडे
Friday, August 30 | 04:00 PM
15 0 0
Share this story


आयुष्यात काही सकारात्मक, विधायक गोष्टी करायच्या असतील तर त्या करण्यासाठी स्वत:मधील क्षमता जाणून घेऊन, खडतर मेहनत घेण्याची तयारी हवी. ती असेल तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होता. हा कानमंत्र घेत त्याने स्वत:च्या आयुष्याला आकार दिला आणि आज तो एक यशस्वी कलाकार, उत्तम निवेदक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील व्यक्ती ठरला आहे. हे सर्व गुण असलेला ‘तो’ म्हणजे अभिजित खांडकेकर!

सर्वसामान्य मराठी घरात अभिजितचा जन्म झाला. त्याचे वडील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ब्रँच मॅनेजर तर आई गृहिणी. नोकरीनिमित्ताने वडिलांच्या बदल्या व्हायच्या. त्यामुळे  अभिजितचे बालपण विविध गावांत गेले. त्यातही प्रामुख्याने बीड आणि परभणी येथे सहावीपर्यंतचा काळ गेला. पुढे नाशिकला स्थायिक झाल्यानंतर येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. बीड आणि परभणीच्या शाळांमध्ये स्नेहसंमेलन होत नसल्याने नाशिकला आल्यानंतर या गोष्टी करण्याची संधी मिळाली. आणि त्यात आवड निर्माण झाली. परंतु अभिजितच्या बोलण्यात ग्रामीण लहेजा असल्याने शाळेतील मुले त्याला चिडवायची. तेव्हा अभिजित अतिशय काटकुळा,चेहऱ्यावर पुटकुळ्या असणारा असा होता. त्यामुळे त्याच्यात न्यूनगंड तयार झाला होता…परंतु या मुलांमध्ये मिसळायचे असेल तर प्रमाणभाषा नीट बोलता आलीच पाहिजे, असा ध्यास त्याने घेतला. त्यासाठी त्याने मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी मोठ्याने वाचण्याचा आणि बोलण्याचा सराव सुरू केला. समोरचा माणूस कसा बोलतो याचे निरीक्षण सुरू केले. या सर्वांचा परिणाम म्हणून हळूहळू त्याची भाषा तर सुधारलीच शिवाय या भाषांवर त्याने प्रभुत्वही मिळवले.  तर शाळांमध्ये होणाऱ्या वक्तृत्वस्पर्धा, वादविवादस्पर्धांमध्येही तो हिरिरीने सहभागी व्हायचा.  असे असले तरी त्याच्यातल्या कलाकाराला मात्र फार संधी मिळाली नाही. त्याचे उट्टे अभिजितने कॉलेजला गेल्यावर भरून काढले.

अभिजितने नाशिकमधील बीवायके कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याबरोबरच ‘स्वप्नगंधा’ या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. या संस्थेच्या माध्यमातून नाट्यवर्तुळात अभिजितचा वावर सुरू झाला. त्यामुळे  कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला त्याच्यातील कलाकार खऱ्या अर्थाने गवसला.   ‘स्वप्नगंधा’ संस्थेत प्रवेश केल्यानंतर पहिले नाटक केले तेदेखील राज्य नाट्यस्पर्धेसाठी!  हे नाटक या स्पर्धेमध्ये पहिले आले. याबद्दल अभिजितने सांगितले, “ खरं तर मला अभिनयाची फार समजही नव्हती. दुसऱ्या दिवशी या नाटकाचं परीक्षण वृत्तपत्रांमध्ये छापून आलं… तेव्हा मला त्या नाटकाचं नाव कळलं ‘उदाहरणार्थ मी नेमाडे, उदाहरणार्थ मी रेगे, उदाहरणार्थ मी चित्रे ….यांचा लघुत्तम सामायिक विभाजक’ असं लांबलचक नाव होतं. मला दिग्दर्शकांनी जे जे सांगितलं त्यानुसार मी केलं आणि मला ते छान जमलंही. यातून अभिनयही आपल्याला जमतो हे माझ्या लक्षात आलं. खरं तर मला अभिनयाच्या क्षेत्रात खूप काही करण्याची इच्छा होती.  पु.ल. करंडक, अल्फा करंडक, सकाळ करंडक, पुण्याच्या थिएटर अकादमी स्पर्धांमध्ये सहभागी झालो होते. त्यातून अभिनेता म्हणून मी घडत होतो. परंतु नाशिकमधील नाट्यवर्तुळात असलेल्या राजकारणामुळे एका मर्यादेपलीकडे काहीच करता आलं नाही…”  अशी खंतही तो व्यक्त करतो. 

अकरावीलाच असताना अभिजितला त्याच्यातील निवेदकही गवसला होता. त्याला निमित्त ठरले एका स्थानिक केबल चॅनेलची आलेली वृत्तनिवेदकाची जाहिरात. अभिजित सांगतो,, “ तेव्हा नाशिकमध्ये दोन-तीन लोकल केबल चॅनेलवरून बातम्या प्रसारित केल्या जायच्या. नव्यानं सुरू होणाऱ्या चॅनेलसाठी वृत्तनिवेदक हवे असल्याची जाहिरात वाचली. तेव्हा जे काही वृत्तनिवेदक होते त्यांच्या तुलनेत आपलं वक्तृत्व उत्तम असल्यानं आणि भाषेवर प्रभुत्वही असल्यानं तिथं जाऊन तर येऊ असा विचार करून मी तिथं गेलो. मला पाहून त्यांनी येण्याचं प्रयोजन विचारलं.  त्यावर त्यांना मी जाहिरात दाखवली आणि वृत्तनिवेदकासाठी आल्याचं सांगितलं. हे सांगितल्यावर ते  हसले आणि म्हणाले,  जा आत जाऊन ऑडिशन दे…आणि माझी निवड झाली! त्याकाळात एका न्यूज बुलेटीनचं तासाभरात शूट करून त्याचे ७५ रुपये वृत्तनिवेदनाचे आणि व्हॉईस ओव्हर केले असेल तर ५० रुपये मला मिळायचे. महिनाभर काम करून पॉकेटमनी मिळायचा. या कामातून माझ्यात आत्मविश्वास तर आलाच शिवाय चार नवीन गोष्टीही शिकलो. बातमी देताना आवाजातील चढ-उतार कसे हवे, उच्चारण कसे हवेत, भाषेचा लहेजा कसा हवा याबरोबरच वाचताना ऊर्जा एकसारखी कशी ठेवायची याचं भान हळूहळू येत गेलं.” (याचा फायदा अभिजितला  रेडिओ जॉकी अर्थात आरजेचं काम करताना झाला.) एकीकडे हे काम सुरू होते तर दुसरीकडे कॉलेजमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये अभिजितचा सक्रिय सहभाग असायचा.  वादविवाद, वक्तृृत्वस्पर्धा यांबरोबरच कॉलेजमध्ये होणाऱ्या व्यक्तिमत्व स्पर्धांमध्ये तो सहभागी व्हायचा. त्यांच्या कॉलेजमध्ये सलग चार वर्षे ‘मिस्टर पर्सनॅलिटी’ या किताबाचा तो मानकरी होता. अशा स्पर्धांमधून त्याचे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व होऊ लागले होते. नाटक, निवेदनाच्या प्रांतात मुशाफिरी करत असताना अभिजितने पदवी प्राप्त केली. बी.कॉम.नंतर पुढे  त्या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम करण्याऐवजी त्याने मास कम्युनिकेशनमधून पोस्ट ग्रॅज्युएशनची निवड करत पुणे गाठले. मास कम्युनिकेशन करताना त्याने २० शॉर्टफिल्मला असिस्ट केले तर चार फिल्म त्याने स्वत: दिग्दर्शित केल्या. अभिनयाचे अंग अभिजितला होतेच, परंतु या अभ्यासक्रमामुळे अभिनयाचे तंत्रही त्याला समजले. कॅमेऱ्याच्या मागे काम कसे होते, काय मेहनत घ्यावी लागते याची जाण त्याला या अभ्यासक्रमातून झाली. याबद्दल तो सांगतो, “या अभ्यासक्रमामुळे कॅमेऱ्यामागचं तंत्र मला समजलं. एखादा शॉट लावताना काय करायला हवं, कसा अँगल घ्यायला हवा हे समजलं. त्याचा फायदा आज मला मालिका करताना होतो. आजही मला कॅमेऱ्यासमोर काम करणं जितकं भावतं तितकेच मागं देखील!” हा अभ्यासक्रम करत असताना एक सुवर्णसंधी आभिजितच्या आयुष्यात आली ती ‘रेडिओ मिर्ची’च्या ‘आर जे हंट २००६ ’ स्पर्धेच्या रूपाने.  त्याबद्दल तो सांगतो, “ वृत्तनिवेदनाचा अनुभव असल्यानं हे धाडस केलं. खरं तर वृत्तनिवेदन आणि आरजे हे निवेदनाचे दोन वेगळे प्रकार. बातम्या सांगण्याची ढब वेगळी असते आणि आरजेची बोलण्याची लकब एकदम वेगळी असते. त्यांच्याप्रमाणे आपल्याला जमेल का, असा विचार मनात आला, पण क्षणभरच... आपण हे करू शकू हा आत्मविश्वास असल्यानं त्या स्पर्धेत सहभागी झालो आणि चक्क त्यात माझी निवडही झाली. १४००-१५०० स्पर्धकांमधून मी पहिला आलो.” ही अभिजितसाठी खऱ्या अर्थाने सुवर्णसंधी होती. कारण रेडिओ मिर्चीमध्ये इंटर्नशिपसाठी त्याला साडेसात हजार स्टायपेंड होता. तर पुण्यातील महिन्याचा खर्च तीन हजार होता! एक वर्ष काम केल्यानंतर नाशिकला ‘रेडिओ मिर्ची’चे स्टेशन सुरू करायचे असल्याने अभिजितला तिथे पाठवण्यात आले. तेथे अभिनेते गिरीश कुलकर्णी हे त्याचे वरिष्ठ अधिकारी होते. नाशिकचे रेडिओ स्टेशन सुरू करण्याचा अनुभव त्याच्याकडे होता. त्यानंतर त्याला ‘रेडिओ सिटी’ची ऑफर आल्याने तो तिथे गेला. तेथे तीन ते चार वर्षे अभिजित मॉर्निंग शो करत होता. त्याचा हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. रुढार्थाने सर्वकाही आलबेल सुरू होते. परंतु अभिजित अस्वस्थच होता. त्याच्यातील सर्जनशील कलाकार या कामाने समाधानी नव्हता. काहीतरी वेगळे करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता. त्याची ही अवस्था त्याच्या वडिलांनी नेमकी ओळखली… त्याबद्दल अभिजित सांगतो, “तुला जर या कामाचा कंटाळा आला असेल तर तू अभिनयाच्या क्षेत्रात का जात नाही. तिथे तू जाऊन वर्षभर तू नशीब आजमाव. तिथं काही झालं तर उत्तमच, नाहीच झालं तर तू पुन्हा आरजे होऊ शकतोस… मी तुझ्या पाठिशी आहे…’ बाबांच्या या शब्दांनी मोठा दिलासा मिळाला. आता पुढे काय असा विचार करत असताना ‘झी मराठी’ची  ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ स्पर्धेची जाहिरात आली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देत मुंबई गाठली…” या स्पर्धेच्या माध्यमातून  अनेक गुणी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळाले. त्यातूनच अनेक कलाकार घडले…या स्पर्धेतील अनुभवांबद्दल अभिजितने सांगितले, “या स्पर्धेच्या निमित्तानं अभिनयातील माझं  कसब दाखवण्याची संधी मिळाली. एकेका फेरीत पुढे पुढे जात होतो. टॉप थ्री निवडले गेले तेव्हा मी चौथा होतो. त्यामुळे आपसूकच स्पर्धेतून बाहेर पडलो. परंतु या स्पर्धेच्या बाहेर गेल्याचं दु:ख अजिबात नव्हतं. कारण यातून खूप गोष्टी मी नव्यानं शिकलो होतो. या स्पर्धेच्या निमित्तानं डॉ. नीलेश साबळे, संकर्षण कऱ्हाडे, तेजपाल वाघ यांसारखे आयुष्यभराचे सुहृद आयुष्यात आले… या स्पर्धेनंतर काम मिळवण्यासाठी ऑडिशन देण्याचा सिलसिला सुरू झाला…”

ऑडिशनच्या दिव्यातून जात असतानाच अभिजितला ‘झी मराठी’वर सकाळी प्रसारित होणाऱ्या ‘राम राम महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची संधी मिळाली. त्याचे हे काम पसंतीस पडले आणि त्यातूनच काही कामे मिळत गेली. त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंटही याच काळात आला तो ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून. अभिजीत त्याच्या  आयुष्यात आलेल्या या टर्निंग पॉईंटबद्दल सांगताना अतिशय नॉस्टेलजिक होतो…“ ऑडिशननंतर ही मालिका मिळाली. या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या विश्वात प्रवेश केला. सर्वकाही नवं होतं. या मालिकेची रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर मोठमोठी होर्डिंग लावून जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे मी आणि मृणाल दुसानीस खूप लोकप्रिय झालो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण ओळखू लागले होते… तोपर्यंत मी ट्रेननं सहज प्रवास करू शकत होतो, परंतु त्यानंतर मला हा प्रवास करणं अशक्य झालं. माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुखद असा क्षण होता…” मराठी मालिकांमध्ये लव्हस्टोरी चालत नाही असा समज २०१० मध्ये आलेल्या या मालिकेने मोडीत काढला. या मालिकेमुळे अभिजितची आदर्श मुलगा, नवरा अशी इमेज तयार झाली होती. त्यामुळे त्याला मोठा चाहतावर्ग लाभला. यामध्ये लहान मुलींपासून  आजींपर्यंतच्या सर्व वयोगटांतील महिलांची संख्या लक्षणीय होती! अर्थात त्याची ही इमेज प्रत्यक्षातही खरी होतीच…  

‘माझिया प्रियाला…’ संपत आल्यानंतर  त्याला अवधूत गुप्ते यांच्या ‘ जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटासाठी ऑडिशन होऊन निवडही झाली. परंतु अनुरूप अभिनेत्री मिळत नसल्याने या चित्रपटाचे काम पुढे ढकलण्यात आले. कालांतराने प्रार्थना बेहेरे या तेव्हाच्या नवोदित अभिनेत्रीला घेऊन हा चित्रपट पूर्ण झाला.  दरम्यानच्या काळात अभिजित निवेदनाच्या कार्यक्रमांकडे वळला. देशा-परदेशात त्याने अनेक दिग्गज कलाकारांच्या कार्यक्रमांत निवेदनाची धुरा समर्थपणे सांभाळली. आजही तो एक यशस्वी निवेदक म्हणून ओळखला जातो. अर्थात त्यासाठी लागणारा अभ्यास, मेहनत करण्याचा त्याचा गुण खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.  निवेदनाबरोबरच त्याने ‘मामाच्या गावाला जाऊ या’,‘ढोलताशे’, ‘ध्यानीमनी’ अलिकडे आलेले ‘मी पण सचिन’, ‘बाबा’ यांसारखे चित्रपट आणि त्याचबरोबर अंकुर काकतकर दिग्दर्शित ‘ये रे ये पैसा’, विजय केंकरे  दिग्दर्शित ‘पती गेले गं काठेवाडी’ ही नाटके केली. ही कामे सुरू असताना अभिजितला  २०१६ मध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेसाठी विचारणा झाली. त्याबद्दल अभिजितने सांगितले, “ बास्टर्ड बट लव्हेबल अशा शब्दांत गुरुनाथ या व्यक्तिरेखेचे वर्णन लेखक-दिग्दर्शकानं केलं होतं. नकारात्मक अशी भूमिका करू नको, त्यामुळे तुझ्या इतर कामांवरही परिणाम होईल, असा सल्ला अनेकांनी दिला होता. परंतु ही भूमिका मी आव्हान म्हणून स्वीकारली आणि पुढे काय घडलं हे सर्वश्रुत आहेच… हा निर्णय घेतल्याचा मला मनस्वी आनंद आहे. ” या भूमिकेने काय मिळाले असे विचारल्यावर तो सांगतो, “लोक प्रेमानं येऊन भेटतात. काहीजण माझ्या कामाचं कौतुक करतात तर काहीजण खूप राग राग करतात आणि असं वागू नका हो तुम्ही असं ठणकावून सांगतात…  एखाद्या खलनायकी वृत्तीच्या पात्राला असं  प्रेम मिळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांचा हा राग माझ्या कामाची पावती आहे असं मी मानतो.”

अभिजित जसा हरहुन्नरी अभिनेता आहे तसाच तो माणूस म्हणूनही सर्वार्थाने गुणी आहे… कलाकार म्हणून आपलीही काही सामाजिक बांधिलकी आहे, आपल्या एखाद्या कृतीमुळे जर कुणाच्या आयुष्यात क्षणभर का होईना आनंद येत असेल तर ते काम आपण करायलाच हवे असे तो मानतो. आज गुरुनाथ या व्यक्तिरेखेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. ही लोकप्रियता प्रेक्षकांमुळेच आहे, याची जाणीव त्याला आहे. त्याचे हे माणूसपण कायम टिकून राहो आणि भविष्यात कोणत्याही चौकटीत बांधून न ठेवता त्याच्यातील कलाकाराला सर्वार्थाने न्याय  मिळेल अशा भूमिका करण्याची संधी मिळो या सदिच्छा!

बाबा प्रेरणास्थान
घरात कुठलीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना अभिजितने आज जे यश मिळवले आहे, त्याचे श्रेय तो त्याच्या बाबांना देतो. उत्तम आर्थिक स्थैर्य देणारी नोकरी असताना ती सोड आणि अभिनयाच्या क्षेत्रात जा आणि नशीब आजमाव असा सल्ला बाबांनी त्याला दिला. आपल्यासारखी अभिनयाची आवड लेकालाही आहे. आपल्याला करता आले नाही ते त्याला करता यावे,  हे लक्षात घेऊन त्यांनी खंबीरपणे अभिजितला पाठिंबा दिला. त्यांच्यामुळेच आज तो अभिनयाच्या क्षेत्रात आहे.

फिटनेसबाबत सजग
मनोरंजनाच्या क्षेत्रात आजही असण्यापेक्षा दिसण्यावर भर असतो, अर्थात यात चुकीचे काहीच नाही. त्यामुळे डॉ. श्रीराम लागू यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आर्टिस्ट शूड बी अॅथलिट फिलॉसॉफर’ हे सूत्र अभिजितनेही स्वीकारले आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस तो वर्क आऊट करतो.  त्याला गोड आणि चटपटीत पदार्थ खायला आवडतात. परंतु त्याचा अतिरेक तो टाळतो.  २० टक्के व्यायाम आणि ८० टक्के खाणे हे त्याच्या फिटनेसचे रहस्य आहे. 

सुखदा भक्कम आधार
अभिजितची सहचारिणी सुखदा ही स्वत: उत्तम कलाकार आहे. पृथ्वी थिएटरमध्ये ती मकरंद देशपांडे यांच्यासोबत अनेक हिंदी नाटकांमध्ये काम करते. मैत्रीण आणि नंतर सहचारिणी झालेली सुखदा अभिजितचा खऱ्या अर्थाने भक्कम आधार आहे. एकमेकांच्या कामात कोणताही हस्तक्षेप न करता जेव्हा साथीदाराला आवश्यकता असेल तेव्हा त्याला सल्ला देत-घेत त्याचा भक्कम आधार देणे हे त्यांच्या सुखी संसाराचे सूत्र आहे…

आजही वर्दीचे आकर्षण
अभिजितला पहिल्यापासून वर्दीचे आकर्षण होते. त्यामुळेच कॉलेजला गेल्यावर तो एनसीसीमध्ये दाखल झाला. तिथे खडतर ट्रेनिंगही घेतले. भविष्यात लष्करात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी लागणारी कठोर मेहनत तो घेतही होता, परंतु  लष्करात जाण्याचे त्याचेे स्वप्न काही कारणाने अपूर्णच राहिले… “ आजही जर कुणी सांगितलं हे सगळं सोडून आर्मीत जा तर माझी त्यासाठी तयारी आहे,” असं अभिजित सांगतो. 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link