Next
स्मरण राष्ट्रसंत विद्यानंदमहाराजांचे
सुरेश शहा
Friday, October 04 | 05:00 PM
15 0 0
Share this story


दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरू, आचार्य १०८ विद्यानंदजीमहाराज (वय ९५) यांचे २२ सप्टेंबर रोजी (रविवार) पहाटे २.४० वाजता नवी दिल्ली येथील ‘कुंद-कुंद भारती’ आश्रमामध्ये महानिर्वाण झाले. त्यांनी जैन परंपरेनुसार १९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ६ वाजता यमसल्लेखना व्रत धारण केले होते. रविवारी सायंकाळी झालेल्या त्यांच्या अंत्यविधीसंस्कारासाठी देशभरातून हजारो भाविक उपस्थित होते.

अल्प परिचय
विद्यानंदजीमहाराजांचा जन्म २२ एप्रिल १९२८ रोजी कर्नाटक राज्यातील शेडबाळ (बेळगाव) गावी झाला. त्यांचे मूळ नाव सुरेंद्रकुमार. त्यांच्या मातोश्री सरस्वतीबाई, पिताश्री कालप्पा आणप्पा उपाध्ये अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यामुळे त्यांना बालपणापासूनच अध्यात्माची गोडी लागली होती.

शेडवाळ येथील जैन गुरुकुलमध्ये त्यांचे मराठीतून शिक्षण झाले. त्यांना मातृभाषा कन्नडसह हिंदी, संस्कृत, पाली, अर्धमागधी व इंग्रजी या भाषा अवगत होत्या.
त्यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव होता. खादी, स्वदेशीच्या प्रचारकार्यात काही काळ त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुढे काही काळ त्यांनी पुणे येथील ‘अॅम्युनिशन’मध्ये, तसेच ‘साठे बिस्किट्स’मध्ये काम केले.

त्यानंतर त्यांनी कलकत्यात वास्तव्य करून तेथील नॅशनल लायब्ररीमधील असंख्य दुर्मिळ धर्मग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. तसेच वैदिक, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध आणि शिखांच्या धर्मग्रंथांचाही त्यांनी अभ्यास केला होता. सर्व धर्मांतील १८ रामायणांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता.

प्रारंभी त्यांनी १९४६ मध्ये तमदड्डी या गावी आचार्य महावीर कीर्तीमहाराजांकडून ‘क्षुल्लक मुनी’ दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांना ‘पार्श्वकीर्ती’ हे नाव प्राप्त झाले. पुढे कुंभोज येथील बाहुबली डोंगरावर प.पू. संमतभद्र मुनींच्या सान्निध्यात राहून जैन धर्मग्रंथांचे पायारण केले. पुढे २५ जुलै १९६३ रोजी त्यांनी दिल्लीत मुक्काम असलेल्या प.पू. आचार्यरत्न श्री. देशभूषणमहाराज यांच्याकडून निग्रंथ मुनी दीक्षा धारण केली. त्यावेळी ‘विद्यानंदजी मुनी’ हे नाव त्यांना प्राप्त झाले. भारतभर भ्रमण करून त्यांनी श्रमणसंस्कृतीचा प्रसार केला. ते सिद्धहस्त लेखकही होते. त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

विद्यानंदजीमहाराज उत्तम गायक होते. २५०० व्या भगवान महावीर निर्वाणमहोत्सवाच्या निमित्ताने एच.एम.व्ही. कंपनीने त्यांनी गायलेल्या भजनांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड प्रसारित केल्या होत्या.

१७ नोव्हेंबर १९७८ रोजी त्यांना दिल्ली येथे ‘एकाचार्य’ ही सर्वश्रेष्ठ पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्यामुळे त्यांना सर्वधर्माच्या लोकांमध्ये आदाराचे स्थान होते. त्यांची सुमधूर व रसाळ वाणीतील प्रवचनाने सर्वजण मंत्रमुग्ध होऊन जात. दिल्ली येथे त्यांची प्रवचने ऐकण्यासाठी ५० हजारांपेक्षाही अधिक संख्येने सर्वधर्मीय जनसमुदाय उपस्थित राहत असे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, विविध पक्षांचे नेते, उच्चपदस्थ त्यांच्या दर्शनासाठी व प्रवचनासाठी उपस्थित राहत असत. सर्वांचे प्रेरणास्रोत व श्रद्धास्थान असलेल्या विद्यानंदजी मुनीराजांना भावपूर्ण श्रद्धांजली!n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link