Next
आणि फुलले कमळ
विनोद पाटील
Friday, May 24 | 02:00 PM
15 0 0
Share this story


हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा इतिहास आहे. पूर्वी डाव्यांकडून बूथ बळकावण्याचे प्रकार घडायचे. ममता बॅनर्जी यांनीही सत्तेत आल्यावर हाच कित्ता गिरवला. याही निवडणुकीत प्रत्येक टप्प्यात हिंसाचार झाला. त्यामुळे या निवडणुकीत भाजप प्रचंड आक्रमक झाल्याचे आधीपासूनच दिसत होते. याच कारणामुळे नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्रापेक्षा बंगालमध्ये सर्वाधिक सभा घेतल्या.

लोकसभेत बहुमतासाठी जागा कमी पडणार असतील तर त्याची भरपाई पश्चिम बंगालमधून करता येऊ शकते, असा विचार भाजपने केला होता. त्याच्या पूर्तीसाठी पंतप्रधान स्वत: अमित शाहांसोबत पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले.

कोलकातापासून खाली बराकपूरपर्यंत हिंदी भाषकांचा बराच मोठा पट्टा आहे. त्या सर्व मतदारांना भाजपने, विशेषत: मोदींनी आपल्या प्रचारसभांतून आश्वस्त केले. त्यातच तृणमूल काँग्रेसचा (टीएमसी) हिंदी भाषक चेहरा असलेल्या अर्जुनसिंग यांनाच भाजपने स्वतःकडे वळवण्यात यश मिळवले. त्यामुळे बऱ्यापैकी हिंदीभाषकांनी भाजपला साथ दिली, असा निष्कर्ष या निकालांवरून काढता येऊ शकतो. बराकपूर हा टीएमसीचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचा गडही त्यांना गमवावा लागला. 

सुरुवातीला पश्चिम बंगालमधील काहीसे शांत असणारे वातावरण असनसोल येथे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची गाडी फोडल्यापासून बिघडत गेले आणि टीएमसीचे कार्यकर्ते गुंडगिरी करत असून त्यांच्यात आणि डाव्यांमध्ये काहीच फरक नाही ही गोष्ट बंगाली जनतेच्या मनात ठसवण्यात मोदी-शाहांना यश मिळाले. बहुमताची खात्री नसल्याने सत्तास्थापनेसाठी नंतर ममतादीदींची गरज लागू शकते असा अंदाज बांधत त्यांच्याबद्दल मोदींनी सुरुवातीला मवाळ भूमिका घेतली होती. मात्र असनसोल येथील हिंसाचारानंतर मोदींनी प्रचाराचा गिअर बदलून आक्रमकपणा स्वीकारला आणि ‘ममता गुंडगिरी करतात, दहशत पसरवतात आणि मतदारांना रोखतात’ असा शाब्दिक हल्ला ममतांवर चढवला. या हिंसाचाराची भाजपने निवडणूकआयोगाकडे तक्रार केली आणि ममतांच्या अधिकारात असलेल्या राज्य पोलिसदलाला हटवून पुढील ५, ६ व ७ या टप्प्यांसाठी निमलष्करी दलांतर्फे सर्व मतदानकेंद्रांसाठी सुरक्षा मागवली. त्याचाही फायदा भाजपला झाला.
२००७ मध्ये सिंगूरचे आंदोलन झाले आणि ‘माँ, माटी, माणूश’चा नारा देत ममतांनी बंगालमधील सत्ता काबीज केली होती, तेच अस्त्र मोदींनी वापरले. ‘ममता, माँ म्हणजे दुर्गामाँशी बांधील राहिल्या नाहीत, माणसा-माणसांत त्यांनी दहशत पसरवली आणि माटी म्हणजे भूमिपुत्रांवरही अन्याय केला’ असा आरोप मोदींनी करत ममतांचेच ‘माँ, माटी, माणूश’चे अस्त्र त्यांच्यावरच उलटवले. याद्वारे मोदींनी बंगाली अस्मिता गोंजारली.

कोणतेही नवे नेतृत्व न दिल्याने, राज्यपातळीवर कोणताही चेहरा नसल्याने बंगाली जनतेने कम्युनिस्टांना साफ नाकारले आणि त्यांचे पुरते उच्चाटन केले. त्यांना एकही जागा मिळाली नाही. कम्युनिस्टांची हीच पोकळी भरून काढण्याचे काम भाजपने केले. बंगाली जनता लोकशाही आणि मतदानाबाबत प्रचंड जागरूक असल्याने यावेळी तेथे सुमारे ८० टक्के मतदान झाले. बंगाली जनता सत्ताधाऱ्यांना संधी देते, परंतु अपेक्षाभंग झाल्यास त्यांना सत्तेवरून खालीही खेचते व नवा पर्याय शोधते. त्यामुळे गुंडगिरी करणाऱ्या ममतांपेक्षा मोदीच बरे असा विचार बंगाली मतदारांनी केला आणि सुमारे ४० टक्के मते भाजपच्या पारड्यात टाकली.

भाजपने धार्मिक मुद्यावर प्रचार आणल्यावर ममतांनीही आपल्या प्रत्येक सभेचा शेवट सरस्वतीच्या व छटपूजेच्या आरतीने करू लागल्या. मात्र मतदार त्यास भुलले नाहीत. ममता तिसऱ्या आघाडीत जातील असा कोणताही स्पष्ट संकेत देत नव्हत्या, त्यामुळे त्या केंद्रात जाणारच नसतील तर त्यांच्याऐवजी मोदींना (म्हणजेच भाजपला) का मत देऊ नये, असा विचार मतदारांनी केला असावा असे जाणवते. या सर्वाचा परिपाक म्हणून भाजपने गेल्या वेळच्या २ जागांवरून १८ जागांवर मजल मारली तर टीएमसीच्या जागा ३४ वरून २२ पर्यंत खाली आल्या.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link