Next
शौर्याचे प्रतीक
सु.मा. कुळकर्णी
Friday, October 04 | 01:00 PM
15 0 0
Share this story


नांदेडचा दसरा दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावर रेणुकामातेचा नवरात्रीमहोत्सवात नऊ दिवस प्रचंड गर्दी खेचतो. नांदेडच्या श्री सचखंड हजूरसाहिब गुरुद्वारात माथा टेकण्यासाठी विदेशातून येणारे लाखो शीख भाविक यांच्यामुळे नांदेडच्या दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. शिवाय येथील वेगवेगळ्या बालाजीमंदिरांच्या रथयात्रा आणि मिरवणुका, रावणदहन यामुळेही येथील दसरा अविस्मरणीय बनतो.
शीख धर्मियांसाठी नांदेड शहर अमृतसरच्या खालोखाल पवित्र व महत्त्वाचे मानले जाते. मोगलांनी शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांची येथे हत्या केली. येथे त्यांची समाधी आहे. गुरू गोविंदसिंगांची हत्यारे येथे ठेवली आहेत. येथील ऐतिहासिक श्री सचखंड हजूरसाहिब या गुरुद्वाराची इमारत संगमरवरी असून त्यावरील कळस व भिंती सोन्याने मढवलेल्या आहेत. ‘गुरू-त्ता-गद्दी’मुळे प्रचंड निधी आल्याने सारा गृरुद्वारापरिसर नवनवीन इमारतींनी सजला आहे. या गुरुद्वारात शस्त्रागार व रत्नागार असून त्यातील जडजवाहिर व ऐतिहासिक प्राचीन शस्त्रास्त्र दसरा, दिवाळी, होळी व वैशाखीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी लोकांना पाहण्यासाठी खुले असतात. शिवाय अप्रतिम रोशणाई आणि फटाक्यांची आतषबाजी यांचे आकर्षण असतेच. शिखांचे दहावे गुरू श्रीगुरुगोविंदसिंग यांचे येथे वास्तव्य होते. त्यांच्या आयुष्याचा बहुमुल्य काळ येथे गेला. येथेच त्यांनी आपण शिखांचे शेवटचे गुरू असे जाहीर करून गुरुपरंपरा थांबवली. शिवाय ‘गुरू ग्रंथ साहिब’ या ग्रंथाला शिखांचा पवित्र धर्मग्रंथ म्हणून जाहीर केले.

आगिआ भई अकाल की तवी चलाओ पंथ।।
सब सिखन को हुकम है गुरू मानियो ग्रंथ।।

हा त्यांचा ऐतिहासिक हुकूमनामा प्रसिद्ध आहे
या जागेला अबचलनगर असे नाव दिले. येथेच १७६५ मध्ये कार्तिक शुद्ध पंचमीला गुरू गोविंदसिंगांचे निर्वाण झाले.
यंदा देश-विदेशातील दोन लाख भाविक दसऱ्याला नांदेडमध्ये अपेक्षित आहेत. मुख्य जत्थेदार बाबा कुलवंतसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपेंद्रसिंग मिनहास, अधीक्षक स. गुरुचरणसिंग वाधवा आणि संपूर्ण गुरुद्वारा बोर्डाचे कर्मचारी तयारी करत आहेत. वेगवेगळ्या भागांतील यात्रीनिवासाच्या तीन हजार रूम बुक झाल्या आहेत.
येथे रोजच धार्मिक ग्रंथांचे पठण व अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. दिवसभर भजन, कीर्तन सुरू असते. परंतु दसरा, दिवाळी व होळीनिमित्त या गुरुद्वारात हल्लाबोल हे हल्ल्याचे प्रात्यक्षिक पाहायला शीख यात्रेकरू आणि सर्वधर्मीय लोक जमतात. गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूरसाहिब या धार्मिक स्थळावर दसरा सण परंपरेने साजरा होतो. नऊ दिवसांच्या चंडीपाठच्या समाप्तीनंतर दसऱ्याच्या दिवशी ऐतिहासिक शस्त्रांची प्रथेप्रमाणे पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी प्राचीन शस्त्रे गाभाऱ्यातून बाहेर काढून, स्वच्छ करून रेशमी कापडावर ठेवली जातात. त्यात महाराजा रणजितसिंग, श्री गुरू गोविंदसिंग आणि अनेक योद्ध्यांच्या तलवारीचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. यातील एक सुलेमानी तलवार झाशीच्या राणीची असून तिच्यावर सर्व शस्त्रे ठेवली तरी रात्रीतून ती आपोपाप वर येऊन बसते, अशी आख्यायिका आहे.
या काळात सर्व गुरुद्वारात रागी जत्थे, कीर्तनकार, प्रवचनकारांचे कार्यक्रम, पूजापाठांचे आयोजन होते. दहाव्या दिवशी दसऱ्याच्या मिरवणुकीपूर्वी एका झटक्यात तलवारीने डोके धडावेगळे करून बोकडाचा बळी दिला जातो. या बळीच्या रक्ताचा तिलक सर्व शस्त्रांना लावण्यात येतो आणि हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते.
या मिरवणुकीला दुपारी चार वाजता गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूरसाहिब येथून प्रारंभ होतो. पुढे गुरुद्वारा गेट नंबर एक, हनुमानमंदिर चौरस्ता, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक मार्गाहून मिरवणूक प्रवास करते. महावीर चौकात सायंकाळी सहा वाजता पारंपरिक हल्लाबोलची अरदास होते. गुरू गोविंदसिंग यांची आर्मी म्हणजे निहंगदले. निळे वस्त्रधारी आणि त्यांचा विशिष्ट दुमाला म्हणजे डोक्यावरील भली मोठी पगडी घातलेले लढवय्ये शीख सैनिक या मिरवणुकीत तलवारबाजीची अंगावर रोमांच आणणारी प्रात्यक्षिके करून दाखवतात. दरवर्षी दसरा मिरवणुकीसाठी पंजाब येथून निहंगसिंगांच्या पाच दलांचे आगमन होते. त्यांनाच शहिदी जत्थे म्हणतात. तळहातावर शीर घेऊन श्री गुरु गोविंदसिंग यांच्यासाठी लढणारी ही पथके आजही कार्यरत आहेत. यात तरणादल म्हणजे प्रत्यक्ष लढणारे सैनिक आणि बुड्ढादल अनुभवी लढाईचे डावपेच आखणारे सैनिक हे मुख्य प्रकार असतात. यावर्षी सुमारे २०० घोडे, काही हत्ती घेऊन पंजाबातून निहंगदले दाखल झाल्याची माहिती सचखंडचे मीडिया सल्लागार स. रवींद्रसिंग मोदी यांनी दिली. या मिरवणुकीत देशभरातून आलेले शीख भाविक सहभागी होतात तसेच पंचप्यारे, निशाणसाहिब, कीर्तनजत्थे, भजनीमंडळे ,बँडपथके आणि गुरुजींच्या सवारीचा सजवलेला घोडा सामील असतात. या घोड्यावर आजही गुरू गोविंदसिंग बसले आहेत, असा भाविकांचा विश्वास आहे. या घोड्याचे वैशिष्ट म्हणजे तो उभा राहिला तरी तीन पायांवरच भार देऊन उभा राहतो. सारे भाविक त्याचे भक्तिभावाने दर्शन घेत असतात.
दसऱ्याच्या शोभायात्रेत निहंग जथ्यांच्या शस्त्रास्त्रांच्या कवायती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या असतात. मिरवणुकीमध्ये निहंगदलांचे हत्ती-घोडे आकर्षण ठरतात. ते गर्दी खेचून घेतात. दसऱ्यापर्यंत गुरुद्वाराच्या लंगरमध्ये प्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने रोपड जिल्ह्यातील जगजितनगर येथील संत, संतबाबा गुरचरणसिंगजी भैरोंमाजरावाले आणि त्यांचे अनेक सहकारी येत आहेत. यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांसाठी १४ प्रकारच्या मिष्ठान्नांचे लंगर लावण्यात येत आहेत. पंजाब येथून आलेल्या कारागिरांतर्फे लंगरमध्ये गोडपदार्थ तयार करण्यात येतात. गुरुद्वारात तीनशे वर्षांपासून दसरा सण साजरा करण्यात येतो.
त्याकाळात यवनांच्या जुलमी अत्याचाराविरोधात शिखांचा खालसा पंथ स्थापन झाल्यावर त्याला वीरता आणि शौर्याचे धडे देऊन धर्मरक्षणासाठी बलिदान करण्याचे धडे देण्याची गरज होती. त्यासाठी श्री गुरू गोविंदसिंग यांनी दशम ग्रंथ रचला होता.  याच ग्रंथातील चंडी-दी-वार म्हणजेच चंडीचरित्राचे पारायण याकाळात मुख्य गृरुद्वारात आणि शिखांच्या घराघरात केले जाते. त्यानिमित्ताने करंज्या, पात्या, लाडू, चक्री आणि फराळाचे अनेक पदार्थ बनवतात. या चंडीचरित्रात चंडमुंड आदी अनेक दुष्ट असुरांचा वध चंडीने कसा केला याचे वीररसात्मक वर्णन आहे. ती सत्याचा असत्यावर आणि धर्माचा अधर्मावर विजय मिळवण्याची शौर्यगाथा आजही चंडीचरित्राच्या पारायणातून जपली जाते. श्री चंडीसाहेब पाठचे नऊ दिवस पठण करण्यात येते. दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्याची समाप्ती आणि लंगरकार्यक्रमाचे ठिकठिकाणी आयोजन केले जातात. थोडक्यात वीररस आणि शौर्याचे प्रतीक म्हणून आजही नांदेडच्या दसऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link