Next
मोल
संदेश कुलकर्णी
Friday, November 30 | 05:45 PM
15 0 0
Share this storyप्राजक्ता डोळे पुसून माझ्या डोळ्यांत पाहत म्हणाली, “थँक्स.”

मला खूप छान वाटलं. आणि मला जास्त आनंद झाला की तिनं मिठी मारल्यावर माझ्या ‘तसल्या’ काही भावना जाग्या झाल्या नाहीत. मी अगदी निर्मळपणे तिला मिठीत घेतलं होतं, पण ती माझ्या मिठीतून दूर झाली आणि मला अचानक ‘लो’ वाटायला लागलं. वाटलं आता ही कधीच परत माझ्या मिठीत येणार नाही. मी कसनुसा हसून म्हणालो, “अगं एवढं काय? तू माझा जीव वाचवला आहेस. मी तुझ्यासाठी उभा राहणार नाही का? आय अॅम ऑलवेज देअर फॉर यू.” असं म्हणून मी तिला पुन्हा मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. तिला बहुधा ते विचित्र वाटलं असावं. कारण ती म्हणाली, “इट इज ओके रजनी. रिलॅक्स.” मात्र मला काय झालं होतं कुणास ठाऊक, मी पुन्हा पुन्हा “मी आहे... मी आहे, विश्वास ठेव,” असं म्हणत होतं. शेवटी तिनं मला जरा जोर लावून बाजूला केलं आणि म्हणाली, “मला कळलं आहे रजनी!” मी अवघडून उभा राहिलो. तेवढ्यात एका नातेवाईकांनी येऊन आम्हाला सांगितलं की धनश्री शुद्धीवर आली आहे आणि आपण तिला भेटू शकतो. प्राजक्ता धावत पुढे गेली. मी मात्र नेमकं मी काय केलं ह्याचा विचार करत जागच्या जागी खिळलो होतो. त्या नातेवाईकांनी माझ्याकडे किंचित आश्चर्यानं पाहत विचारलं,

“येताय ना?” मी “हो हो” करत त्यांच्या मागे गेलो.

मी आत गेलो तेव्हा प्राजक्ता धनश्रीचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी बसली होती आणि तिचे डोळे गळत होते. मी पोहोचल्यावर धनश्रीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. तिला बोलताही येत नव्हतं पण तरी दमलेल्या आवाजात ती म्हणाली, “हा येडा इथे कसा काय गं प्राजक्ता?” माझ्या डोक्यात संतापाची लाट गेली. तिचा गळा आवळून ती जिथून वाचून परत आली होती तिथे परत तिची रवानगी करण्याची तीव्र इच्छा झाली. मात्र ती इच्छा दाबून मी खोटं हसून म्हणालो, “काय वर वेटिंग होतं का फार? की चित्रगुप्ताला काही उर्मटपणे बोललीस म्हणून परत पाठवलं?” ती हसून म्हणाली, “नाही, तिथपर्यंत गेलेच नाही. यमाचा रेडा दमला होता. शेपटी पिरगाळली तरी जागचा हलत नव्हता. मीच म्हणाले रेडा रेडी झाला की या परत.” प्राजक्ताला ह्या बोलण्याचा त्रास झाला असावा. ती म्हणाली, “परत असा वेडेपणा तू करणार नाहीयेस. मला प्रॉमिस दे धनु. आणि पुन्हा असं काही केलंस तर मीही येईन तुझ्या मागोमाग.” धनश्रीनं तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिचा बांध फुटला. प्राजक्ताने पुढे होऊन तिला हलक्यानं मिठी मारली. धनश्री म्हणाली, “मला माहीत नाही मी असं का केलं. सॉरी.” तेवढ्यात एक नर्स आली आणि म्हणाली, “चला तुम्ही. पेशंटशी फार बोलायचं नाही. चला.” आम्ही बाहेर निघालो तेव्हा धनश्री पुन्हा झोपून गेली होती. गोळ्यांचा परिणाम असणार!

आम्ही आयसीयूच्या बाहेर आलो. प्राजक्ता धनश्रीच्या घरच्यांशी बोलली आणि पुढे हॉस्पिटलमध्ये कोणी थांबायचं वगैरे गोष्टी त्यांनी ठरवल्या. मी उपऱ्यासारखा तिथे उभा होतो. ‘हा येडा इथे कसं काय?’ ह्या धनश्रीनं विचारलेल्या प्रश्नाचा बाण माझ्या काळजात रुतल्यानं माझं रक्त वाहतच होतं. मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मी पुढे होऊन प्राजक्ताला म्हणालो, “आता काही लागणार नसलं तर मी जाऊ?” ती म्हणाली, “पाच मिनिटं थांब, मीही निघतेच आहे.” मी धुसफुसत पाच युगांसारखी वाटणारी ती पाच मिनिटं सहन केली. शेवटी एकदाची प्राजक्ता आली. आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. बाहेर फटफटलं होतं. मी काहीच बोलत नव्हतो. तीच म्हणाली, “माझ्याकडे गाडी नाहीये. मला सोडशील घरी?” मी मान डोलावली आणि पार्किंगमधून माझी बाईक काढली. ती माझ्या मागे बसली आणि आम्ही निघालो. मधूनमधून खड्डा आल्यावर तिचा हात हलक्यानं माझ्या खांद्यावर यायचा आणि पुन्हा अलगद ती तो काढून घ्यायची. मला ते आमच्या नात्याचं प्रतीक वाटलं. हा हात कायम माझ्या खांद्यावर नसणार, या जाणिवेनं मन हळवं झालं.

तिचं घर आलं. ती म्हणाली, “चल वर. आईला मस्त चहा करायला सांगते.” मी गप्प होतो. काय बोलायचं ह्याची मनात जुळणी करत होतो. ती म्हणाली, “रजनी, तू धनूचं बोलणं मनाला लावून घेतलंस की काय? तिला आपलं नातं माहीत नाही म्हणून ती असं म्हणाली.” मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि विचारलं, “काय आहे आपलं नातं?” तिला हा प्रश्न अनपेक्षित असावा. तिने उलट मलाच विचारलं, “तुला माहीत नाही ते?” मी म्हणालो, “नाही. म्हणजे माझ्या बाजूने काय आहे मला माहीत आहे, पण तुझ्या बाजूनं, तुला नेमकं काय वाटतं हे मला माहीत नाही.” तिनं उसासा सोडला. “मला कळतंय, रजनी तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण माझ्या मनाची अजून तयारी नाहीये. मी तुला सांगितलं माझं ब्रेकअप झाल्याचं. पाच वर्षाचं रिलेशन होतं आमचं... किंवा खरं तर माझं. त्याच्या बाजूने काय होतं कुणास ठाऊक.” तिचा श्वास जड झाला. मी हसून म्हणालो, “म्हणजे आपल्या नात्यात जशी माझी आहे तशी तुमच्या नात्यात तुझी अवस्था होती.” ती म्हणाली, “मी खूप स्वार्थी आहे का? म्हणजे तुझ्या फिलिंग्स कळत असूनही मी तुझा...” ती बोलताना थांबली. तिला नेमके शब्द सापडेनात.

खूप वेळ काहीच न बोलता आम्ही उभे होतो. ती म्हणाली, “वर जाऊन बोलूया का?” मी विचार केला आणि म्हणालो, “नको प्राजक्ता. मी आता ज्या दिशेला जायचं नाही त्या दिशेला एक पाऊलसुद्धा टाकणार नाही.” तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ती म्हणाली, “सॉरी. तू प्रपोज केल्यावर मी मुद्दाम तुला टाळलं होतं. कारण मला तुझ्या फिलिंग्सशी खेळायचं नव्हतं.” मी म्हणालो, “पण मीसुद्धा तुला एकही मेसेज केला नव्हता. एकही फोन केला नव्हता. आय रिस्पेक्टेड युवर डिसिजन. तूच पुन्हा दोन महिने बारा दिवसांनी मला मेसेज केलास आणि आपण पुन्हा भेटलो.” तिनं विचारलं, “तुला तारखा इतक्या लक्षात आहेत?” मी खिन्नपणे हसून म्हणालो, “येस. कारण मी सिरिअस आहे.” तिचे डोळे वाहायला लागले. “सॉरी, मी पुन्हा कनेक्ट केल्यानं तुला काहीतरी वाटलं पण माझा तसा हेतू नव्हता. मला वाटलं तू आता ते मागे टाकलं असशील.” मी म्हणालो, “पण मग मी पारुलच्या घरी राहिलो म्हणून जेलस का झालीस? आता धनश्रीच्या वेळी मलाच फोन का केलास?” तिला बहुधा ह्याचं भान नव्हतं. ती एकदम थिजली आणि बऱ्याच वेळाने म्हणाली, “सॉरी. मी खूप सेल्फिश वागले.”

मग खूप वेळ आम्ही काहीच बोललो नाही. मला लक्षात यायला लागलं की तिला माझ्याविषयी नक्की एक कनेक्ट वाटतो... मला गरज होती तेव्हा ती धावत मला भेटायला आली होती. मला थेरपिस्टकडे पाठवलं होतं... मग तिची गरज आहे तेव्हा तिनं मला बोलावलं ह्यात तिचं काय चुकलं? तेवढा हक्क होता तिचा माझ्यावर! आमच्यात निश्चित एक खोलवरचं नातं आहे, पण त्याला प्रेमाचं स्वरूप द्यायला तिचं मन धजावत नाहीये. कदाचित तिच्या आधीच्या नात्याचा लोड असणार किंवा तिला आणखी वेळ हवा असणार. काहीही कारण असलं तरी तिला ते पाऊल उचलायचं नाहीये. आणि जर ती विचारपूर्वक ते ठरवत असेल तर आतून तिला भावनेच्या पातळीवर तसं वाटत नाहीये आणि मग ते तिच्यावर लादूनही उपयोग नाही.

रजनी म्हणे ह्या नात्याचे मोल कसे राखू?
सुवास प्राजक्ताचा, कसा, कुठवर रोखू?

क्रमश:

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link