Next
आता एकच ध्येय… ऑलिंपिक!
नितीन मुजुमदार
Friday, September 27 | 01:45 PM
15 0 0
Share this story

तेवीस वर्षीय बॉक्सर अमित पंघालचे सारे लक्ष आता लागले आहे चीनकडे! चीनमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या आशियाई बॉक्सिंगस्पर्धेत अमितला अपेक्षित कामगिरी करायची आहे, कारण या कामगिरीवर तो टोकियो ऑलिंपिकस्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. अलीकडेच रशियात झालेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदस्पर्धेत, ५२ किलो वजनी गटात, अंतिम फेरी गाठून रौप्यपदकाची कमाई करणारा अमित, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर ठरला आहे.
रशियातील स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर लगेचच ‘झी मराठी दिशा’ने अमितशीे बातचीत केली. या स्पर्धेतील संस्मरणीय क्षण कोणता, यावर अमित म्हणाला, “स्पर्धेत मला मिळालेले पदक पाहिल्यावर माझ्यासोबत स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या काकांच्या डोळ्यांत लगेचच पाणी आले. हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.” २०१७ मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपदस्पर्धेत (हॅम्बुर्ग) तो तत्कालीन ऑलिंपिक चॅम्पियन हसनबाय दुस्मातोवकडून पराभूत झाला होता. त्या पराभवाचे उट्टे त्याने साधारण वर्षभरानंतर म्हणजे १ सप्टेंबर २०१८ रोजी काढले. रशियात अंतिम फेरीत झालेल्या या अलीकडच्या पराभवातूनही खूप काही शिकून तो आगामी स्पर्धेत उतरणार यात शंका नाही.
हरियाणाच्या (रोहतक) २३ वर्षीय, सव्वापाच फूट उंचीच्या अमित पंघालच्या या अत्यंत अभिमानास्पद कामगिरीमुळे भारताला बॉक्सिंगजगतात एक नवा पोस्टरबॉय मिळाला आहे. याआधी जकार्ता आशियाई स्पर्धेतही त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती. एकत्र कुटुंबात राहणाऱ्या अमितची घरची परिस्थिती साधारणच. वडिलांची जेमतेम एक एकर जमीन. अमित सध्या सैन्यदलात नायब सुभेदार असून त्याला बॉक्सिंग खेळण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारा त्याचा मोठा भाऊही सैन्यदलातच आहे. रोहतकपासून जवळच असलेले मयाना हे अमितच्या कुटुंबाचे मूळ गाव आहे.
आमित सांगतो, “आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. माझे वडील शेतकरी असून मी वयाच्या ११-१२व्या वर्षी खेळण्यास सुरुवात केली. माझे पहिले प्रशिक्षक होते अनिल धनकर. ४५ वर्षीय धनकरांना तो आपल्या आजवरच्या वाटचालीचे सारे श्रेय देतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठीसुद्धा मी सरांचेच मार्गदर्शन घेतो.”
आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय लढतींमध्ये अमित जकार्तामधील अंतिम लढतीचा उल्लेख करतो. “जकार्तास्पर्धेचा अंतिम सामना माझ्यासाठी संस्मरणीय आहे. यातील विजय माझ्यासाठी मोठा विजय होता. गतवर्षी हॅम्बुर्ग जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपदस्पर्धेत दुस्मातोवने उपांत्यपूर्व फेरीत मला हरवले होते.” दुस्मातोवशी तो याआधी दोन वेळा खेळला होता व दोन्ही वेळी तो पराभूत झाला होता. दुस्मातोव रिओ ऑलिंपिकस्पर्धेत सर्वोत्तम बॉक्सर म्हणून निवडला गेला होता. त्याचा उझबेकिस्तान देश, रिओ ऑलिंपिकस्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक सात पदके मिळवणारा देश होता. अशा देशाच्या सर्वोत्तम बॉक्सरबरोबर हा विजय संस्मरणीयच खरा!
स्पर्धा नसतात तेव्हा साधारण सरावाच्या वेळा काय असतात, या प्रश्नावर, सकाळी व संध्याकाळी किमान दोन-दोन तासांचा सराव होतोच, असे त्याने स्पष्ट केले. शिवाय आहारात फळांवर जास्त भर असतो, असेही स्पष्ट केले. आगामी ध्येय काय, यावर “अर्थातच ऑलिंपिक बर्थचे! कोणत्याही खेळाडूचे ऑलिंपिकमधील सुवर्णपदक हेच अंतिम ध्येय असते” हे सांगायलाही अमित विसरला नाही. त्याचवेळी “मला घरचे जेवण सर्वात प्रिय आहे. त्यातही आईच्या हातची खीर आणि कुरमा खूप आवडतो” असे अमित आवर्जून सांगतो.
एक वेळ अशी होती, की अमितकडे नवे बॉक्सिंग ग्लोव्हज घ्यायला पैसे नव्हते. म्हणून त्याने काही काळ फक्त मोकळ्या हातांनी बॉक्सिंगचा सराव केला होता. जिद्दीने आशियाई विजेतेपद मिळवणारा अमित आता ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करतोय. ऑलिंपिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी चीनमधील स्पर्धेत त्याच्या ‘पंच’मधील पॉवर किती तीव्र आहे, हे दाखवायचे आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा वजनी गट ४९ किलोवरून ५२ किलोवर आला. तो बदल स्वीकारून त्याची आशादायी वाटचाल चालू आहे.
सामान्य कुटुंबातून येऊन खेळांमध्ये इतिहास घडवणाऱ्या खेळाडूंच्या मालिकेतील ही अगदी अलीकडची यशोगाथा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link