Next
मनोरंजनाची आतषबाजी!
विशेष प्रतिनिधी
Friday, October 26 | 02:30 PM
15 0 0
Share this story

‘गोमू संगतीनं माझ्या तू येशी का SSS?’ या गीतावर ताल धरत नाचणारे गुरुनाथचे आई-बाबा…., ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी SSS?’वर थिरकणारे श्री. आणि सौ. निमकर…, ‘झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी गं येणारं साजण माझा’ या शब्दांवर आपल्या नृत्याचे कसब दाखवणाऱ्या गोदाक्का आणि जीजी…,’बनवाबनवी अशी ही बनवाबनवी’ म्हणत प्रेक्षकांनाही आपल्या तालावर नाचायला लावणारे जयडी, भय्यासाहेब आणि टॅलेंट…,’हृदयी वसंत फुलताना  प्रेमात रंग यावे…’ म्हणत एकमेकांवरील प्रेमाची ग्वाही देणारे पुष्पामामी आणि समाधानमामा, ‘अग्ग अग्ग पोरी फसलीस गं’ असं सांगून प्रेमाच्या वाटेवर जाणाऱ्या आनंद आणि जेनीचे नृत्यामधील कसब पाहून वन्स मोअरचा झालेला कल्ला… हे सारं वातावरण होतं, ‘झी मराठी अवॉर्ड्स’च्या रंगतदार सोहळ्यातील...
सहज अभिनयाने घराघरातील प्रत्येकाच्या मनात छोट्या पडद्यावरील सर्वच कलाकारांनी स्वत:ची जागा निर्माण केली आहे. या कलाकारांनी सळसळत्या उत्साहाने सादर केलेले दमदार परफॉर्मन्स, ‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल, अभिजित खांडकेकर आणि संजय मोने यांनी निवेदनातून केलेली तुफान फटकेबाजी यामुळे ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स २०१८’ कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला.  
महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी असलेल्या ‘झी मराठी’ला १९ वर्षे पूर्ण झाली आहेत. एकोणीस वर्षे म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. त्यामुळे या वर्षीचा ‘उत्सव नात्यांचा’ घेऊन ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड्स’चा सोहळा अधिकच रंगतदार आणि दिमाखदार झाला. कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. या वर्षी ‘लागिरं झालं जी’, ‘बाजी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. यामध्ये बाजी मारली ती नऊ पुरस्कार मिळवणाऱ्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने. त्यापाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेनेही पाच पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदान झाले. हा सोहळा येत्या रविवारी, २८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ‘झी मराठी’ आणि ‘झी मराठी एचडी’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

बालकलाकारांची धम्माल!
मालिकेतील मोठ्या कलाकारांबरोबरच बालकलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या बालकलाकारांची निरागसता आणि त्यांचे अभिनयकौशल्य प्रेक्षकांना भावते. ‘झी मराठी’ परिवारातील छोटे उस्ताद म्हणजेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील अथर्व, ‘जागो मोहन प्यारे’मधील माऊ म्हणजेच छोटी परी, ‘तुझ्यात जीव रंगला’मधील सर्वांचा लाडका लाडू आणि ‘बाजी’मधील चिचोका.  यावेळी या बालकलाकारांनी दमदार परफॉर्मन्स सादर केला. लाडूने त्याच्या परफॉर्मन्सने तर प्रेक्षकांना अक्षरशः त्याच्या प्रेमात पाडले.


एका लग्नाची पुढची गोष्ट

‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!’ असे आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देणारे प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या जोडीचे नवीन नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ १७ नोव्हेंबरपासून रंगभूमीवर येत आहे.  झी मराठी प्रस्तुत आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित सदाबहार नाटकाचा आस्वाद नाट्यरसिकांना घेता येणार आहे. आजच्या पिढीशी या नाटकाची कथा संबंधित असल्याने तरुणवर्गालाही ती आवडेल असा विश्वास प्रशांत आणि कविता या दोघांनी व्यक्त केला आहे.


अशोक पत्की यांना जीवनगौरव
‘झी मराठी’वरील मालिका जशा लोकप्रिय झाल्या आहेत तशीच त्यांची शीर्षकगीतेही श्रवणीय आहेत. ‘आभाळमाया’ ते ‘तुला पाहते रे ‘पर्यंतच्या  सर्वच मालिकांची शीर्षकगीते प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली आहेत. यामागे सर्वात मोठा वाटा आहे तो संगीतकार अशोक पत्की यांचा.  या शीर्षकगीतांमुळे अशोक पत्की आणि ‘झी मराठी’ यांच्यात एक अतूट नाते निर्माण झाले आहे. त्यांच्या या सांगीतिक प्रवासाचा सन्मान म्हणून त्यांना यावेळी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘झी मराठी’च्या सर्व कलाकारांनी अशोक पत्की यांना हा पुरस्कार प्रदान केला.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link