Next
प्रतिसाद
प्रतिनिधी
Friday, July 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

मार्गदर्शक लेख
‘पाणी पाणी रे...’ हा १३ जुलैच्या अंकातील हेमंत लागवणकर यांचा लेख पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शक आहे. पर्जन्यमान कमी झाले आणि प्रचंड लोकसंख्या शहरीकरण-औद्योगिकीकरण यांमुळे पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी साठवणे हा पाणीप्रश्नावरील उपाय आहे. अनेक ठिकाणी यामुळे फायदे झाले आहेत. पावसाचे पाणी योग्य प्रकारे साठवून पाण्याचा प्रश्न सोडवता येऊ शकतो. आधुनिक काळात समस्या वाढत आहेत त्यावर योग्य उपाय शोधले नाही तर परिस्थिती कठीण होऊ शकते. त्याचप्रमाणे, २० जुलैच्या अंकातील झिरो बजेट शेतीवरील सु.मा.कुलकर्णी यांचा लेखही छान होता. सुभाष पाळेकर यांची ही संकल्पना मानवाला निसर्गाकडे नेणारी आणि विषमुक्त शेतीउत्पादन देणारी असल्याने यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. या लेखात वर्णन केलेली पद्धत ग्रामीण भागातील अनेक प्रश्न दूर करून कृषिक्षेत्राला प्रगतीची नवी वाट दाखवेल असे वाटते.
 - प्र.मु.काळे, नाशिक
--------------------------

मुला-मुलींना समान न्याय हवा!
गुजरातमधील बनासकाठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने अविवाहित मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी केली आहे. अशी बंदी घालणे म्हणजे मुलींना पुन्हा अठराव्या शतकात घेऊन जाणे होय. मोबाइलबंदीसाठी जी कारणे देण्यात आली आहेत, ती हास्यास्पद आहेत. मोबाइलमुळे मुली बिघडत असतील तर मग हाच न्याय मुलांनाही लावावा. मोबाइलमुळे फक्त मुली बिघडतात आणि मुले बिघडत नाहीत, असे कसे होऊ शकते? मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही बदललेला नाही हेच यातून दिसून येते. मुळात तरुणाई मोबाइलमुळे बिघडते हा दावाच चुकीचा आहे. आपल्या सनातनी विचारांवर पांघरूण घालण्यासाठी अशी तकलादू कारणे दिली जातात. ज्या देशात घटनेने स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क दिले आहेत, त्या देशात असा फतवा काढणे हा घटनाद्रोहच आहे. हा तर स्त्री-पुरुष असा उघड उघड भेदभाव आहे. ज्या जात पंचायतीने हा फतवा काढला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. स्त्रियांना ‘चूल आणि मूल’ या परिघाबाहेर जाऊ द्यायचे नाही असा विचार असणारे लोक एकविसाव्या शतकातही आहेत याचे आश्चर्य वाटते.
- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे
--------------------------

बोगस भाडेकरूंना कसे आवरायचे?
‘बिल्डरांच्या हव्यासापायी जिवाशी खेळ’ हा २० जुलैच्या अंकातील चंद्रशेखर प्रभू यांचा लेख बिल्डरांच्या आणि भ्रष्ट सरकारी नोकरांच्या काळ्या कृत्यांवर झगझगीत प्रकाश टाकणारा आहे. म्हाडाचे अधिकारी बिल्डरांना खोटे भाडेकरू वाढवण्यास मदत करतात, हे त्यांचे वाक्य १०० टक्के खरे आहे. याचा अनुभव आम्हा गिरगाव वैद्यवाडीतील लोकांना आला आहे. ‘बिल्डरने ९ भाडेकरू खोटे घुसवले आहेत’ या मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘या लोकांनी पुरावे म्हणून काय कागदपत्रे दिली?’ अशी विचारणा माहिती अधिकाराखाली केली असता, ‘या ९ भाडेकरूंनी कोणतीच कागदपत्रे दिली नाहीत’ असे उत्तर मिळाले. सदर माहिती ‘म्हाडा’तर्फे देण्यात आलेली असून संबंधित कागदपत्रे माझ्याकडे आहेत. आम्हाला याविरुद्ध कोर्टात जायची इच्छा आहे, तरी चंद्रशेखर प्रभू आम्हास मार्गदर्शन करतील का?
- प्रवीण धोत्रे,  ठाकुरद्वार, मुंबई
--------------------------

एकच प्रश्न, पुन्हा पुन्हा!
भाजपचे विरोधक व तथाकथित विचारवंतांना काही वर्षांपासून एक सवय लागली आहे, ती म्हणजे ‘स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कोठे होतात?’ हा प्रश्न विचारणे! १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केलेले डॉ. हेडगेवार आधी काँग्रेसमध्ये एका पदावर होते, तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, हे त्यांना कोणी सांगितले  नाही का, अशी शंका मनात येते.                
- प्रमोद बापट, पुणे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link