Next
चाळीतला नवरा नको ग बाई!
मंगला मराठे
Friday, April 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story


एका वधूवरसूचक मंडळातली गोष्ट आहे. दोन बायका त्यांच्या मुलांसाठी मुलींची स्थळे बघत होत्या. एक दुसरीला म्हणाली, “काय हो, खूप दिवसांनी आलात. मला वाटलं तुमच्या मुलाचे लग्न झाले. आमच्या मुलाचं शिक्षण कमी म्हणून जमत नाही. परंतु तुमचा तर चांगला शिकलेला, चांगल्या पगारावर नोकरीला आहे. खूप मुली सांगून येत असतील ना?”
“छे हो कसलं काय? चाळीत राहतो न आम्ही! आम्ही काही श्रीमंत नाही. दोघांनी नोकरी करून काटकसरीनं संसार करून मुलांना शिकवलं. मुलीचं लग्न झालं. तिचं व्यवस्थित आहे. वाटलं होतं, मुलालाही चांगली मुलगी मिळाली की झालं. मग दोघं मिळून घर घेतील,  काय हव्या त्या वस्तू घेतील. मात्र तसं होत नाही. हल्ली नुसता मुलगा चांगला असून चालत नाही, त्याचं घरही छान असावं लागतं.”     
बाई उद्वेेगाने बोलत होत्या, पण त्यांच्या बोलण्यात तथ्य होते. आज मुंबईत अनेक मुलगे असे आहेत की ज्यांची लग्ने जागेवाचून अडली आहेत. हे मुलगे बेताच्या आर्थिक परिस्थितीतले आहेत, पण उच्च शिक्षित आहेत. त्यांच्या पालकांनी काटकसर करून स्वत:ची हौसमौज बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपवला. मुलेही मेहनतीने शिकली. त्यांना चांगल्या नोकऱ्या लागल्या. पालकांचे एक स्वप्न पूर्ण झाले. पुढच्या स्वप्नाचे मात्र जरा कठीणच दिसते. गुणी असूनही या मुलांची स्थळे ‘चांगले स्थळ’ या गटात बसत नाहीत. मुलाची माहिती वाचून आलेले प्रस्ताव घर बघून, काहीवेळा तर त्या आधीच केवळ पत्ता वाचूनच पुढे जात नाहीत. रूढीपद्धतीप्रमाणे या मुलांना अनुरूप असणाऱ्या मुली म्हणजे उच्च शिक्षित नोकरदार मुली. परंतु या मुली चाळीत राहायला तयार नसतात. त्यांच्या स्वप्नात सुसज्ज फ्लॅट असतो. बहुतेक मुलींना राजाराणीचा संसार हवा असतो. सिनेमा आणि मालिकांनी असा फ्लॅट ही बेसिक गरज बनवलेली आहे. मुलीला सधन, सुखवस्तू सासर मिळावे असा मुलीच्या पालकांचा प्रयत्न असतो. शहरी राहणीत आज प्रत्येकाच्या ‘प्रायव्हसीला’ प्रचंड महत्त्व आलेलं आहे. प्रत्येकाला स्वतंत्र बेडरूम असणं, घरात कमीत कमी माणसं असणं ह्या बाबी आवश्यक झाल्या आहेत. मुलंही स्वत:चा फ्लॅट झाल्याशिवाय लग्नाला तयार होत नाहीत.    
सेल्फ कंटेण्ड फ्लॅटमधे वाढलेल्या मुलीला चाळीत कॉमन गॅलरी, लोकांची वर्दळ, आणि कॉमन संडास या गोष्टींशी जुळवून घेणं खूप कठीण जातं. चाळीत राहण्याच्या या काही त्रुटी आहेत. या रोज रोज टोचणाऱ्या आहेत, त्यामुळे नजरेआड करता येणार नाहीत. त्यांना नखरेही म्हणता येणार नाहीत. चाळीततल्या मुलींच्याही मनातही फ्लॅटमधल्या संसाराचं स्वप्न असतं.
चाळीतला मुलगा नाकरण्यात कॉमन गॅलरी, कॉमन संडास हे महत्त्वाचं कारण आहे, पण एकमेव कारण नाही.  मुलींचे आणि पालकांचं आणखीही काही म्हणणं असतं.
‘ब्लॉक घेता घेता आमचं अर्धंअधिक आयुष्य संपलं. मुलीचं तसं होऊ नये’, ‘आता आपल्या घरात ज्या सोयीसुविधा आहेत, किमान तितक्या तरी मुलीला मिळायला हव्यात. नाहीतर तिचं दैनंदिन आयुष्य त्रासदायक होईल. घरातल्या माणसांशी जुळवून घ्यायचं आहेच तेवढं पुरे.’
तर मुलींचं म्हणणं असतं, ‘मुलाकडे फ्लॅट नाही म्हणजे तो घेण्यासाठी कर्ज काढायचं, म्हणजे काटकसर करायची, मग लाईफ एन्जॉय कधी करायचं?’
पूर्वी सुंदर मुलीच्या बाबतीत असे म्हणत की, ‘कुणीही श्रीमंत थोरामोठ्या घरचा मुलगा मागणी घालून करून घेईल.’ तसं हल्ली मुलाच्या बाबतीत म्हणतात, ‘एवढा पगार आहे; चकाचक फ्लॅट आह,े मग कोणीही अगदी हसत हसत याला मुलगी देईल.’ आता मुलीचं सासर कुठल्या एरियात आहे, तिच्या घरात काय-काय आहे ह्या गोष्टी प्रतिष्ठेच्या आणि चर्चेच्या बनल्या आहेत. घराचं रंगरूप, त्यातल्या सुखसोयी बघताना मुली आणि त्यांचे पालक कित्येकदा चांगली मुलं पारख न करताच नाकारतात. व्यवहाराच्या दृष्टीनं विचार केला तर पंचवीस-तीस वर्षांच्या मुलानं फ्लॅट घ्यावा, संसाराच्या सगळ्या वस्तू घ्याव्यात, ही अपेक्षा अवास्तव आहे. मोठ्या शहरात तर हे अशक्य आहे. मात्र यातून काहीच मार्ग नाही असं नाही.
आज घर अद्ययावत नसलं तरी आपण दोघं मिळून स्वत:च्या बळावर उभे करू ही जिद्द आज हरवली आहे. ती जिद्द दोघांनीही धरायला हवी.
याबाबतीत थोडा आधुनिक विचारसुद्धा करून बघुया. पचवायला जरा कठीण आहे पण आजच्या परिस्थितीला धरून आहे. आपण एकमेकांना अनुरूप आहोत अशी खात्री झाली, होकार दिला आणि लग्न पक्कं झालं तर दोघांनी मिळून नवीन घर घ्यायला काय हरकत आहे?  शिक्षित कमावत्या मुलींसाठी हे एक आव्हानही आहे. मात्र इथे दोघांनीही आणि दोघांच्या पालकांनीही विचारांची प्रगल्भता दाखवणं आणि काही पथ्यं पाळणं गरजेचं आहे.
  • घर घेणं ही एकट्या मुलासाठी कठीण गोष्ट आहे म्हणून हा एकमेकांना दिलेला मदतीचा हात आहे.  याच्याकडे  हुंडयासारखे  बघायचे नाही.
  • दोघांनीही विशेषत: मुलींनी व्यावहारिक सुरक्षिततेची पुरेपूर काळजी घ्यायची.
  • आंधळा विश्वास किंवा भीड बाळगायची नाही. प्रेमाच्या धबधब्यात वाहून जाऊन करायची ही गोष्ट नाही.
  • ही मुलीच्या विश्वासाची, प्रेमाची परीक्षा नाही. ‘नवऱ्यावर विश्वास नको का ठेवायला?’ किंवा ‘हा मुजोरपणा झाला’ असा पुरुषी प्रतिष्ठेचा विचार करायचा नाही. घर दोघांचं (अर्थात कुटुंबासह) ते दोघांनी मिळून उभं करायचं आहे.   
हा व्यावहारिक बाजूचा विचार झाला. भावनिक बाजू बघायची तर सुखसाधने प्रत्येकालाच हवी असतात. त्यामुळे कामं सोपी होतात, आयुष्य आरामदायी होतं, हे कोणीही नाकारणार नाही. ‘लुळयापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी’ असे लहानपणी कितीही बिंबलेलं असलं तरी मोठेपणी गरिबीच्या मागे कोणी धावत नाही. परंतु श्रीमंती मिळवताना फक्त वस्तूंचीच नाही तर भावनांची आणि नातेसंबंधांचीही श्रीमंती मिळवायची आहे हे विसरायचे नाही. नातेसंबंधांची श्रीमंती असेल तरच वस्तूंची श्रीमंती सुख देते. संसार करायचा म्हणजे घर फुलवायचे असते, फक्त सजवायचे नसते. त्यासाठी जोडीदाराशी सूर जुळायला हवेत. सूर माणसाशी जुळतात, मनाशी जुळतात; घराच्या रंगरूपाशी नाही. घर कसं आहे यावर नातेसंबंध अवलंबून नसतात. ‘स्थळा’पेक्षा स्थळाच्या आतली माणसं कशी आहेत, हे पाहायला हवं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link