Next
कटू आठवण
विशेष प्रतिनिधी
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

मुंबईवर झालेल्या कुप्रसिद्ध दहशतवादी हल्ल्याला सोमवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना इतकी भीषण होती, की तिची पुन्हा आठवण काढावी असे वाटत नाही. परंतु या घटनेने देशाच्या जनमानसावर जी खोल जखम केली आहे तिचा व्रण सहजासहजी मिटला जाणार नाही. हा व्रण सतत आपल्याला देशाच्या सुरक्षिततेचे महत्त्व जाणवून देणारा आहे. मुंबईवरील या हल्ल्यामागे आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानचा हात होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जागितक स्तरावर निषेध आणि निंदा झाल्यानंतरही त्या देशाच्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया अजिबात कमी झालेल्या नाहीत. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला, काश्मीरमध्ये जवळजवळ रोज होणारे हल्ले पाहता पाकिस्तान आपला दहशतवादी मार्ग सोडणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताला सदैव सावध राहून पाकच्या या कारवाया हाणून पाडण्यास सज्ज राहावे लागणार आहे. पाकिस्तानला जगात राजकीयदृष्ट्या एकटे पाडण्यात भारताला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. सध्या चीनखेरीज पाकला कोणीही मित्र नाही. अमेरिका व इस्लामी देश हे आजवर पाकचे पाठीराखे होते, पण आता या देशांना पाकपासून दूर करण्यात भारताने यश मिळवले आहे. त्यामुळे पाकला दहशतवादासाठी जी लष्करी व आर्थिक मदत मिळत होती ती बऱ्याच अंशी बंद झाली आहे. असे असले तरी पाकच्या दहशतवादी कारवाया मात्र थांबलेल्या नाहीत. या दहशतवादी कारवायांचा ताण पाकच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे, पण त्याची पाकला पर्वा नाही, कारण पाकिस्तानी जनतेला आवाज नाही. पाकिस्तानी सरकार व प्रशासन सर्वसामान्य जनतेच्या हिताला दु्य्यम लेखून दहशतवादासाठी आपली सर्व साधने वापरत आहे. त्यामुळे भारताला आपली अंतर्गत सुरक्षा कडेकोट करीत पाकवरील राजकीय, लष्करी व आर्थिक दबाव वाढवावा लागणार आहे. हे करताना देशांतर्गत सलोख्याला तडा जाणार नाही याची काळजीही भारताला घ्यावी लागणार आहे. भारतातील विविध, धार्मिक, भाषिक समूहांत तंटेबखेडे निर्माण व्हावेत यासाठी पाक प्रयत्नशील आहे, त्याला देशातील राजकीय मतभेदांमुळे हातभार लागणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे दहशतवादाचा अवलंब करूनही भारताच्या ऐक्याला धक्का लावता आला नसल्यामुळे पाक आता काश्मीरबरोबर पंजाबात पुन्हा दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे देशातील नक्षलवादी व अन्य फुटीर शक्तींशी हातमिळवणी करण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे. हे प्रयत्न हाणून पाडायचे असतील तर जनतेने सजग असणे आवश्यक आहे. पाकिस्तानी दहशतवादाबरोबरच नक्षली दहशतवादाचा मोठा धोका देशाला आहे. अत्यंत रक्तरंजित असा हिंसाचार करूनही देशात नक्षलवाद मूळ धरत नसल्यामुळे आता निराश होऊन नक्षलवाद्यांनी शहरांत शिरकाव करून तरुणांच्या मनात विष कालवण्याचा ‘पांढरपेशी’ उद्योग आरंभला आहे. तो अधिक घातक आहे. दहशतवादाचे हे नवे स्वरूप आहे व त्याचा मुकाबला करणे अधिक अवघड आहे. कारण हे शहरी नक्षलवादी सर्व वैधानिक मार्गांचा वापर करून व कायद्याच्या कक्षेत राहून आपल्या कारवाया करीत असतात. अर्थात ज्या सामाजिक उणिवांचा आधार घेऊन नक्षलवाद उभा राहिला आहे, त्या उणिवांकडे दुर्लक्ष करून नक्षलवादाचा पराभव करता येणार नाही. ‘झी मराठी दिशा’च्या या अंकात २६/११ च्या घटनेला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने दहशतवादाच्या सर्व अंगांची चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा उद्बोधक ठरावी अशी अपेक्षा आहे. वाचकांनी याबाबत आपली मते जरूर कळवावीत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link