Next
सी सॅट- उताऱ्यांचे आकलन
फारुक नाईकवाडे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story


राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर दोन म्हणजेच सी सॅटमध्ये उताऱ्यावरील प्रश्न हा सर्वाधिक लांबीचा प्रश्नघटक आहे. उमेदवारांची आकलनक्षमता तपासणे हा या भागाचा मुख्य हेतू असतो. तसेच, उमेदवारांचे मराठी आणि इंग्रजीचे भाषिक आकलन तपासणारे प्रश्नही यामध्ये समाविष्ट असतात. साधारणपणे १० ते ११ उताऱ्यांवर एकूण ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात येतात. सर्वाधिक गुणांसाठी असणारा हा भाग सर्वाधिक वेळखाऊसुद्धा असतो. त्यामुळे याची तयारी आणि परीक्षा हॉलमधील वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
सन २०१३ पासून उमेदवारांच्या आकलनाची परीक्षा घेण्यासाठी हा घटक पूर्वपरीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. दिलेला उतारा उमेदवारांनी समजून घेऊन त्यावरील प्रश्नांची कमीत कमी वेळेत उत्तरे देणे यामध्ये अपेक्षित आहे. पारंपरिक आकलनाच्या पद्धतीमध्ये प्रश्नांची स्वतःच्या भाषेत उत्तरे लिहून आपले कौशल्य दाखवण्यास वाव असतो. पण, वस्तुनिष्ठ प्रकारामध्ये दिलेले पर्याय हे सारखेच भासतात व गोंधळ वाढवू शकतात. त्यामधून उत्तरे शोधताना नेमकेपणा आणि प्रश्नकर्त्याला उत्तराचा अंदाज बांधणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. उमेदवारांच्या मागील वर्षांच्या अनुभवाचे विश्लेषण केले तर या विषयाच्या तयारीमध्ये पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
उताऱ्याच्या पहिल्या काही ओळी वाचून तो अवघड वाटल्याने आत्मविश्वास कमी होतो. आणि त्यामुळे त्यावरील प्रश्न फारसे आव्हानात्मक नसले तरी अवघड वाटू लागतात. परीक्षा हॉलमध्ये आपल्याला उताऱ्याचा अभ्यास करायचा नाही तर प्रश्नांची उत्तरे देऊन गुण मिळवायचे आहेत हे मनावर व्यवस्थित बिंबवून घ्यायला हवे. आपल्याला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित सापडत असेल तर उतारा संपूर्णपणे कळला नसेल तरी हरकत नसते. अर्थात कोणताही उतारा प्रश्न वाचून त्यांची उत्तरे शोधली आणि काम झाले असा सहज सोपा नसतो. तो ढोबळमानाने तरी समजलाच पाहिजे. एखादा उतारा नाही समजला आणि त्यावर तथ्यात्मक माहिती विचारली असेल तर तो बोनस घ्यायलाच हवा.
दिलेला उतारा उमेदवार पहिल्यांदाच वाचत आहे हे प्रश्नकर्त्याला माहीत असते त्यामुळे विनाकारण गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जात नाहीत.
बऱ्याच वेळा उताऱ्यातील त्या त्या विषयाशी संबंधित अवघड पारिभाषिक शब्दांमुळे किंवा उताऱ्याचा टोन उपरोधिक किंवा तिरकस असल्यामुळे उमेदवारांना उताऱ्याचे आकलन होण्यात अडचणी येतात.
आवश्यक सराव नसेल तर कमी वेळेत उतारा समजून घ्यायच्या तणावामध्ये एकाग्रतेने आणि वेगाने उतारा वाचणे आव्हानात्मक वाटते आणि वेळेचे नियोजन आणि मार्कांचे गणित दोन्ही कोलमडते.
बहुतांश वेळा मराठीतूनच उतारा वाचण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण, यामुळे पर्यावरणविषयक किंवा काही विज्ञानविषयक माहितीवरील उतारे वाचून समजण्यास जास्त वेळ लागतो. अशा उताऱ्यांमध्ये जर पारिभाषिक संज्ञा जास्त असतील आणि तथ्यात्मक प्रश्न जास्त विचारले असतील तर असे उतारे इंग्रजीतून वाचल्यास वेळेची बचत होऊ शकते.
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून दिसते, की संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक प्रश्न हे प्रबोधन, लेखकांचे व्यक्तिगत अनुभव, अॅबस्ट्रॅक्ट विषयांवर आधारित उताऱ्यांवर बहुशः विचारण्यात येतात. त्यामुळे अशा विषयांचे उतारे वेगवेगळ्या स्रोतांतून वाचणे आणि तयारीच्या वेळी ते व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उतारे समजून घ्यायचा सराव झाला की परीक्षा हॉलमध्ये कमीत कमी वेळेमध्ये त्यांचे आवश्यक आकलन होण्यास मदत होते.
तथ्यात्मक माहिती, पारिभाषिक संज्ञांचा समावेश असलेल्या उताऱ्यांवर सरळ प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे हे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येते. असे उतारे आधी प्रश्न पाहून वाचत गेल्यास शक्य तेथे प्रश्नानुसार आवश्यक माहिती अधोरेखित करत उतारावाचन करणे शक्य होते आणि उत्तरे देण्याचा वेळ कमी होतो.
मराठी आकलनासाठी तिरकस, उपरोधिक आणि तत्त्वचिंतनपर अशा विषयांवरील साहित्य वाचण्याचा सराव आवश्यक आहे.
इंग्रजी आकलनासाठी दर्जेदार वृत्तपत्रांतील  संपादकीय, विज्ञान व अर्थव्यवस्थेबाबतचे लेख वाचून ते समजून घेण्याचा सराव आवश्यक आहे. त्याचबरोबर शब्दसंग्रह वाढवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला हवा. याचा फायदा नेहमीसाठी होणार आहे.
वाचनाचा वेग आणि आकलन वाढवण्याचा प्रयत्न करणे या घटकाच्या तयारीसाठीच नाही तर एकूण अभ्यासामध्येही अत्यंत महत्त्वाचे आहे. नुसते वाचन आणि आकलनासहीत वाचन यांमध्ये गुणवत्ता आणि आवश्यक वेळ दोन्हीतही फरक असतो. त्यासाठी सुरुवातीपासूनच क्वालिटी रीडिंग- गुणवत्तापूर्ण वाचनाची सवय लावून घ्यायला हवी.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link