Next
हुआवे फोनधारकांनी काय करायचे?
अमृता दुर्वे
Friday, June 21 | 04:00 PM
15 0 0
Share this story


मोबाइल फोन कंपनी हुआवे (Huawei) सध्या चर्चेत आहे. याचं कारण आहे अमेरिकेनं या चिनी मोबाइल फोन कंपनीवर घातलेले निर्बंध. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ मे रोजी ‘नॅशनल सिक्युरिटी ऑर्डर’द्वारे या कंपनीवर बंदी घातली. या बंदीमुळे हुआवेला अमेरिकन कंपन्यांकडून टेक्नॉलॉजी आणि सुटे भाग घेता येणार नाहीत. अमेरिकेच्या या ट्रेड बॅनमुळे गुगलनं आपले या कंपनीसोबत असलेले संबंध तोडले. गुगल नाही म्हणजे अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम नाही. प्ले स्टोअरचा अॅक्सेस नाही, मॅप्स नाहीत, युट्यूब, जीमेल नाही आणि याशिवाय इतर अमेरिकन कंपन्या असलेले फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम नाहीत.
हुआवे ही कंपनी सध्या स्मार्टफोन बाजारपेठेतली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी कंपनी आहे. युरोप आणि आशियामध्ये या कंपनीनं जोरदार मुसंडी मारत पहिल्या क्रमांकाच्या सॅमसंगपाठोपाठचं स्थान पटकावलं. आता मात्र या बॅननंतर कंपनीनं आपलं २०१९ च्या दुसऱ्या सहामाहीचं उद्दिष्टं २० ते ३० टक्क्यांनी कमी केल्याचं समजतंय.
आता हुआवे आणि हॉनर स्मार्टफोन्सवर अॅण्ड्रॉईडच्या जागी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न ही कंपनी करणार आहे. असं असलं तरी हाँगमेंग नावाची ही ऑपरेटिंग सिस्टीम यायला बराच काळ लागेल. ‘गुगल’पाठोपाठ आता इतर काही कंपन्यांनीही हुआवेसोबतचे व्यवहार थांबवले आहेत. यूके स्थित चिप डिझायनर कंपनी ARM नं या ब्रॅण्डसोबतचे संबंध तोडले. तर अमेरिकन सरकार आपल्याविरोधातही काही कारवाई करेल, या भीतीनं इतरही अनेक कंपन्यांनी हुआवेसोबत काम करणं थांबवलंय.
या बंदीचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नसून उलट आपल्याला तंत्रज्ञान आणि काही भाग पुरवणाऱ्या अमेरिकन कंपन्यांनाच याचा फटका बसणार असल्याचं हुआवेनं म्हटलंय. क्वालकॉमसारख्या अमेरिकन चिप मेकिंग कंपन्यांना याचा खूप मोठा फटका बसेल. म्हणूनच हुआवेवरची ही बंदी उठवण्यात यावी, म्हणून क्वालकॉम आणि इतर कंपन्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे.

ज्यांच्याकडे हुआवे किंवा ऑनरचा फोन आहे त्यांचं काय?
तर अशा लोकांच्या फोनवरच्या ‘गुगल प्ले’सारख्या सेवा किंवा ‘गुगल प्ले प्रोटेक्शन’सारखी अॅप्स संरक्षण देणारी सेवा सुरू राहील. या सगळ्या फोन्सना सिक्युरिटी अपडेट आणि प्ले स्टोअरचा अॅक्सेस मिळत राहील. अॅण्ड्रॉईड ओपन सोर्सच्या माध्यमातून या फोन्सना अॅण्ड्रॉईडचे अपडेट्सही मिळत राहतील. कारण हा ओपन सोर्स आहे. म्हणूनच अपडेट्सच्या ओपन सोर्स व्हर्जन आल्यानंतर कंपनी त्यांच्या ग्राहकांना हे अपडेट्स देऊ शकेल.
गुगलच्या या निर्णयाचे आणखी काय परिणाम होऊ शकतात, याचा अभ्यास आपण करत असल्याचं हुआवेनं म्हटलंय. तूर्तास ट्रम्प सरकारनं त्या कंपनीला तीन महिन्यांचा दिलासा दिला आहे आणि गुगलनंही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत या कालावधीत आपण सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलंय. म्हणूनच या कालवधीचे ९० दिवस हुआवेसाठी महत्त्वाचे असतील.

कंपनीच्या भविष्यातल्या फोन्सचं काय?
हा तिढा ९० दिवसांत सुटला नाही, तर कंपनीच्या भविष्यातल्या फोन्समध्ये अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम नसेल. शिवाय गुगल देत असलेल्या कोणत्याही सेवा, कोणतीही अॅप्स या फोन्समध्ये नसतील. म्हणजेच जीमेल, मॅप्स, प्ले स्टोअर, म्युझिक, यूट्यूब अशा कोणत्याच गोष्टी फोनमध्ये नसतील. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपदेखील या फोन्सवर मिळणार नाही.

मग सवाल असा उठतो, की ज्या फोन्सवर यातलं काहीच नाही, ते फोन घेणार कोण?

चीनमध्ये या सगळ्या अॅप्सवर निर्बंध असून त्यासाठी पर्यायी चिनी अॅप्स उपलब्ध आहेत. परंतु ही अॅप्स फक्त चीनमध्येच लोकप्रिय आहेत. त्यामुळे नवीन ऑपरेटिंग सिस्टीम उभी करताना ही सगळी लोकप्रिय अॅप्स आपल्या ग्राहकांना अॅक्सेस कशी करता येतील, याचा विचार हुआवे कंपनीला करावा लागेल. परिणामी, काही काळासाठी तरी ग्राहक हुआवे आणि ऑनरकडे पाठ फिरवणार, हे नक्की.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link