Next
स्वातंत्र्याची संकल्पना
सर्वेश फडणवीस
Friday, August 09 | 03:00 PM
15 0 0
Share this story


‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ फक्त ‘पारतंत्र्यातून मुक्ती’ या मर्यादेत यायला नकोच! स्वातंत्र्याची परिभाषा जरी व्यक्तिगत अनुभव व विचार यानुसार बदलत असली तरी स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील अंतर प्रत्येकानं जाणलं पाहिजे. या दोन्हींमधील रेषा ओळखून, स्वातंत्र्य उपभोगताना ते स्वतंत्र कृतींची सीमारेषा ओलांडून स्वैराचारामध्ये जात नाही ना, याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.
स्वातंत्र्याची व्याख्या आणखी करता येईल ती म्हणजे ‘आनंद आणि मन:शांतीची स्थिती.’ मग पुन्हा यावर विचार करायला लागल्यावर लक्षात आलं, की ही स्थिती अनुभवण्यासाठी आपण स्वत: आपल्याबरोबर एकरूप होणं, स्वत:ला ओळखणं, स्वत:ला आहोत तसं मान्य करणं हे खूप गरजेचं आहे. ‘स्वत:ला स्वीकारणं आणि स्वत:ला आवडेल ते करण्याचं स्वातंत्र्य देणं’ हे खूप आवश्यक आहे. आयुष्यात आपल्याला अनेक स्वतंत्र क्षण अनुभवायला मिळतात- भान हरपून नाचणं, गाणं, झोपणं, सूर्यास्त पाहणं, फिरायला जाणं अशा अनेक गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला नकळतपणे उपभोगता येतं. आपण आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षातून बाहेर येत अशा अनेक कृतींमधून दैनंदिन आयुष्यातील स्वातंत्र्य उपभोगू शकतो, त्यासाठी फार कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. अशा गोष्टींमध्ये आपल्याला कोणतंही बंधन नसताना त्या छोट्या क्षणांचा पूरेपूर आनंद उपभोगणं जास्त महत्त्वाचं आहे.
मनुष्य ज्या अनुभवातून जातो, जे विचार करतो, ज्या कृती करतो, ज्या परिस्थितीला तोंड देतो, या सर्वच बाबींवर त्याच्या एखाद्या विषयाच्या संकल्पना तयार होतात किंवा एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पारतंत्र्यामध्ये असताना स्वातंत्र्याची व्याख्या परकीय आक्रमकांच्या बंधनातून मुक्त होणं ही जरी असली, तरी त्यानंतर समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळणं असा स्वातंत्र्याचा अर्थ लावला जात होता व पुढची पायरी म्हणजे विचार-आचार-उच्चार तसंच व्यक्तिस्वातंत्र्य! अशा टप्प्याटप्प्यानं बदलत जाणाऱ्या ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेला आज आत्मपरीक्षण, सामाजिक स्थितीचं निरीक्षण करण्याची गरज आहे. तरुणांच्या मानसिकतेतून विचार केला तर ते स्वातंत्र्य जगण्याची उमेद ही खूपच वेगळी आहे. व्यक्तिपरत्वे ती सहजपणे समजत जाते. आज स्वयंसिद्ध होण्यासाठी स्वातंत्र्य याचा विचार प्रत्येक मानवी मनाला प्रवृत्त करतो. स्वातंत्र्य हा इतका रोजच्या वापरातला आणि सवयीचा शब्द झालाय, की त्याचा वेगळा विचार करणं हेही आव्हान आहे.
आजकालची तरुणाई कदाचित स्वातंत्र्याचा व सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा नकारात्मक दृष्टिकोनातून जास्त विचार करताना दिसत आहे. स्वतंत्र भारतामध्ये आपल्याला समतेचं स्वातंत्र्य, आचार-विचार आणि भाषणस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे; परंतु २१व्या शतकातही उत्तर कोरिया, सौदी अरेबिया, सीरिया, कतार अशा लोकशाही नसलेल्या अनेक देशांत नागरिकांना हे मूलभूत अधिकारसुद्धा पूर्णपणे उपभोगता येत नाहीत. सरकारविरुद्ध निषेध आणि आंदोलन करता येत नाही. भारतामध्ये या सर्व बाबतीत भारतीय नागरिकाला स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. फक्त आपण त्याचा योग्य उपयोग करत नाही. आज काळानुसार ती करण्याची अधिक गरज आहे.
आपण देशात व देशाबाहेर कुठेही प्रवास करू शकतो. स्त्रिया व्यवसाय-नोकरी करू शकतात, वाहन चालवू शकतात, आपण सोशल मीडियावर स्वतंत्रपणे मते मांडू शकतो, भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनं व निदर्शनं करू शकतो, असं अनेक प्रकारांचं स्वातंत्र्य अनेक देशांत नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याशी तुलना करताना आपली परिस्थिती नक्कीच चांगली आहे, असं म्हणायलाच हवं. नेहमी इतर देशांशी तुलना करून भारतात वाईटच परिस्थिती आहे, असं ठाम निदान करणं चुकीचं आहे.
आजच्या तरुणाईला मिळालेल्या स्वातंत्र्याचा त्यांनी गैरवापर करू नये, कारण इतरांच्या तुलनेत आपण बरेच पुढारलेले आहोत आणि हेच टिकवत आपल्या पुढच्या पिढीला ही संकल्पना देताना अभिमान आणि आत्मिक समाधान वाटलं पाहिजे. या संकल्पनेला मूर्त रूप देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपणच ती जतनही करायची आहे. चला तर, या स्वातंत्र्याच्या संकल्पनेला यशोशिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करत राहूया!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link