Next
प्रस्थापितांना धक्का देणार कोण ?
आशिष पेंडसे
Tuesday, June 26 | 11:21 AM
15 0 0
Share this story


जर्मनी, ब्राझील, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम आणि अर्जेंटिना अशा नेहमीच्याच मातब्बर, प्रस्थापित संघांचा यंदाच्या फिफा वर्ल्डकपपूर्वी बोलबाला आहे. त्यांना धक्का देणार कोण? गतविजेत्या जर्मनीचीच सद्दी कायम राहणार, की ब्राझील लौकिकाला साजेसा खेळ करून विक्रमी सहावे विजेतेपद मिळवणार... या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यास प्रारंभ होईल १४ जूनपासून, रशियामधील वर्ल्डकपच्या 'किक-ऑफ'ने...

रशियात होत असलेला वर्ल्डकप हा गेल्या काही वर्ल्डकपच्या तुलनेत अतिशय रंगतदार व चुरशीचा होणार, यामध्ये काहीच शंका नाही. त्याचे कारण अगदी सोपे आहे, ते म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग आणि स्पेनमधील ला लिगा या जगप्रसिद्ध व्यावसायिक साखळी सामन्यांवर नजर टाकली, तर सर्वच क्लबचे आघाडीचे खेळाडू अतिशय भरात असल्याचे आपल्याला दिसून येईल. पोर्तुगालचा रोनाल्डो, अर्जेंटिनाचा मेस्सी, ब्राझीलचा नेमार हे सुपरस्टार. त्यांच्या जोडीला ब्राझीलचा कुटिन्हिओ, बेल्जियमचे इडन हझार्ड, रोमेलो लुकाकी, इंग्लंडचे हॅरी केन, जेमी वार्डी, पोलंडचा रॉबर्ट लेव्हान्डोस्की, फ्रान्सचे अन्टॉईन ग्रिझमन, एम्बापे-डेम्बेले, स्पेनचा इस्को-असोन्सिओ, कोलंबियाचा हमास रॉड्रिग्युज, इजिप्तचा महंमद सालाह आणि जर्मनीचा थॉमस म्युलर आदी फॉरवर्ड असोत, किंवा बचावपटूंपैकी स्पेनचा रामोस-पिके, ब्राझीलचा मार्सेलो, इंग्लंडचा ख्रिस मॉलिन, जर्मनीचे किमिच, हेक्टर, बोइटांग. त्याचप्रमाणे मध्यफळीतील स्पेनचे इनिएस्टा, अलोन्झो, ब्राझीलचे विलियन, पाऊलिन्हिओ, फ्रान्सचा पॉप पोग्बा, इंग्लंडचा मार्कस रॅशफर्ड आणि गोलकीपर्सपैकी फ्रान्सचा लॉरिस, स्पेनचा डाव्हिड डि हेया, बेल्जियमचा कोर्तुआ, जर्मनीचा मार्क टेरश्टेगेन, कोस्टारिकाचा केलर नव्हास... असे फूटबॉलच्या तारांगणामधील एकाहून एक सरस स्टार खेळाडू भरात आहेत. आणि हे सर्व गेल्या वर्षभरापासून आपापल्या क्लब संघाकडून धडाकेबाज कामगिरी करताना, आता आपल्या राष्ट्रीय संघाकडून देशासाठी खेळताना आपला खेळ एका अद्वितीय उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि म्हणूनच, पर्यायाने यंदाची वर्ल्डकपस्पर्धा अतिशय चुरशीची व रंगतदार होणार, यात शंकाच नाही.

आठ संघांमध्ये विभागणी, दोन संघ पात्र

गेल्या दोन वर्ल्डकपपासून सहभागी देशांची संख्या २४ वरून ३२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या संघांची आठ गटांमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यात, प्रत्येक गटातील अग्रक्रमाचे दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर राऊंड ऑफ १६, उपान्त्यपूर्व फेरी, उपान्त्य फेरी आणि अंतिम सामना अशा माध्यमातून १५ जुलै रोजी वर्ल्डकपचा विजेता झळाळती सोनेरी ट्रॉफी उंचावेल.

ग्रुप ए

रशिया, सौदी अरेबिया, इजिप्त, उरुग्वे

यजमान रशियापुढे इजिप्त आणि उरुग्वेचे आव्हान असेल. चॅम्पियन्स लीग स्पर्धेत लिव्हरपूलक़डून खेळणारा महंमद सालाह याच्या प्रेरणादायी अस्तित्वाने इजिप्त कमाल करण्यास उत्सुक आहे. अर्थात, सालाह दुखापतग्रस्त झाला असला, तरी रशियाविरुद्धच्या सामन्यापासून तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सुआरेझ याच्या जिगरबाज खेळाची बार्सिलोनाच्या सामन्यांमध्ये आपल्याला प्रचिती आली आहे. तसेच, पॅरी सेंट जर्मनचा कव्हानी हादेखील उरुग्वेचा बुजूर्ग खेळाडू. आता आपल्या राष्ट्रीय संघालाही विजेतेपद मिळवून देण्यासाठी ते शर्थ करतील.

ग्रुप बी

पोर्तुगाल, स्पेन, मोरोक्को, इराण

या गटामध्ये सध्यातरी स्पेनविरुद्ध पोर्तुगाल या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामध्ये स्पेनचेच पारडे जड आहे. पण, एकाहून एक स्टार खेळाडूंचा भरणार असलेल्या स्पेन आणि पोर्तुगालला बाद फेरी गाठण्यात काही समस्या येणार नाही, अशी आशा करण्यास हरकत नाही.

ग्रुप सी

फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पेरू, डेन्मार्क

या गटावर फ्रान्स वर्चस्व गाजवेल, यात शंका नाही. दुसरे स्थान पटकावून बाद फेरी गाठण्यासाठी डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस असेल. सॉकररूज या नावाने ओळखल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने गेल्या काही हंगामांत आशिया गटामध्ये खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यांचा गॅरी कॅहिल याच्यासह अनेक खेळाडू इंग्लंडमधील आघाडीच्या क्लबकडून यशस्वीपणे खेळत आहेत. तसेच, २०१० च्या दक्षिण आफ्रिकेतील वर्ल्डकपमध्ये बाद फेरीत प्रवेश करून इटलीसारख्या आघाडीच्या संघाला त्यांनी घाम फोडला होता. अखेर, वादग्रस्त पेनल्टीच्या जोरावर इटलीला जादा वेळात विजय मिळवता आला होता. त्यामुळेच, ऑस्ट्रेलिया यंदा दे धक्का देण्यासाठी पूर्ण सिद्ध आहे.

ग्रुप डी

अर्जेंटिना, आइसलँड, क्रोएशिया, नायजेरिया

प्रत्येक वर्ल्डकपमध्ये एक अतिशय खडतर ग्रुप असतो. त्याला ग्रुप ऑफ डेथ असे संबोधले जाते. म्हणजेच, त्या ग्रुपमधील सर्वंच संघांना बाद फेरी गाठण्याची संधी असते. मेस्सी वगैरे कितीही मोठी नावे असली, तरी अर्जेंटिनाच्या लढती काही सोप्या नाहीत. आइसलँडने युरो १६ स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठताना इंग्लंडवर विजय मिळवला होता. क्रोएशियाकडून लुका मॉड्रिच आणि इव्हान रॅकाटिच हे अनुक्रमे रिअल माद्रिद आणि बार्सिलोना या जगज्जेत्या क्लबकडून खेळणारे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच, त्यांचा संघ अतिशय चिवट खेळ करतो. नायजेरिया हा आफ्रिकेतील विजेता संघ आहे. आफ्रिकन इगल हे नाव सार्थ करून भल्या भल्या संघांना धोबीपछाड करण्यासाठी तो ओळखला जातो. तसेच, आफ्रिकेतील खेळाडू इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, जर्मनी आदी आघाडीच्या लीगमधील नामांकित क्लबकडून खेळतात. त्यामुळेच, या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा फायदा त्यांना होतो. तसेच, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आफ्रिकन संघ खंबीर असल्याने या गटात कमालीची चुरस आहे.

ग्रुप इ

ब्राझील, स्वित्झर्लंड, कोस्टारिका, सर्बिया

फ्रान्सप्रमाणे ब्राझीलदेखील दिमाखात बाद फेरी गाठेल, अशी आशा आहे. अर्थात, अवसानघातकी खेळ करण्यात ब्राझील कुप्रसिद्ध आहे. पण, या गटात त्यांना फारसे आव्हान नाही. स्वित्झर्लंड आणि कोस्टारिका यांच्यात बाद फेरी गाठण्यासाठी चुरस असेल. सर्बियाचे खेळाडू अतिशय गुणी आहेत, पण वर्ल्डकपसारख्या सर्वोच्च ठिकाणी भरारी घेण्यासाठी त्यांना अजून मेहनतीची गरज आहे.

ग्रुप एफ

जर्मनी, मेक्सिको, स्वीडन, दक्षिण कोरिया

अर्जेंटिनप्रमाणे या गटातदेखील काहीशी चुरस पाहण्यास मिळेल. मेक्सिको आणि स्वीडन हे अतिशय भक्कम बचावपटू असलेले संघ आहेत. स्वीडनचा बचाव भेदू न शकल्यानेच इटली वर्ल्डकपच्या पात्रता शर्यतीतून बाद झाला होता. त्यामुळेच, स्वीडनला कोणी लेचेपेचे समजू नये. स्वीडन-मेक्सिको यांच्यात दुसरे स्थान कोण पटकावणार, यासाठी लढत आहे. पण, इंग्लंडमधील टॉटनहॅम हॉटस्पर या संघाकडून खेळत असलेला किम ली याच्यासह अनेक कोरियन खेळाडू आंतरराष्ट्रीय अनुभव पणाला लावतील. त्यामुळेच, त्यांनी एखादा उलटफेर केला, तर या ग्रुपचे चित्र बदलू शकते. वर्ल्डकपपूर्वीच्या मित्रत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रियाने जर्मनीला २-१ असे पराभूत केले होते. त्यामुळेच, जर्मनी अभेद्य नाही, हे सिद्ध झाले असून या गटातील इतर संघांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ग्रुप जी

बेल्जियम, पनामा, ट्युनिशिया, इंग्लंड

बेल्जियमचा संघ अतिशय गुणवान आणि गेल्या चार वर्षांत सर्वाधिक वेळा फिफा मानांकनामध्ये टॉप ३मध्ये स्थान प्राप्त केलेला आहे. १९८६ साली बेल्जियमने वर्ल्डकपच्या उपान्त्य फेरीत धडक मारली होती. पण, मॅराडोनाच्या झंझावातापुढे तो कोसळला. बेल्जियमचे सर्वंच खेळाडू इंग्लंमधील मँचेस्टर सिटी या लीग विजेत्या संघासह इतरही आघाडीच्या क्लबकडून खूप सरस कामगिरी करताना दिसतात. मात्र, संघ म्हणून ते ढेपाळतात, अगदी क्रिकेटमधील चोकर्स दक्षिण आफ्रिकेप्रमाणे. आता हाच बदलौकिक पुसून काढण्यासाठी बेल्जियमची ही गोल्डन जनरेशन प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. इंग्लंडदेखील बाद फेरी गाठून किमान उपान्त्य फेरी गाठण्यासाठी खेळ उंचावेल, अशी आशा आहे.

ग्रुप एच

पोलंड, सेनेगल, कोलंबिया, जपान

मातब्बर संघांचा समावेश असल्याने ग्रुप डीमध्ये सर्वच संघांमध्ये चुरस आहे. तसेच, एच ग्रुपमध्येही सर्वंच संघांना संधी आहे, पण हे सर्व संघ तुलनेने दुबळे असल्याने! सेनेगल हे आफ्रिकेतील प्रमुख आव्हान, तर जपान हे आशियामधील. जेम्स रॉड्रिगेझ याच्यासह कोलंबियाचे सर्वच खेळाडू कौशल्यपूर्ण खेळ करण्यात वाकबगार आहेत. तर पोलंडचा लेव्हॉडोस्की हा गोलमशीन आहे. अशा परिस्थितीत, या गटामधील निकालांबाबत कुणीच भाकीत करू शकत नाही. सध्यातरी, पोलंडला काहीशी संधी आहे, इतकेच!

यंदाच्या वर्लकपमध्ये हॉलंड, इटली, चिली आणि अमेरिका या प्रमुख संघांची अनुपस्थिती जाणवणार आहे. तरी इतर सर्वच संघांचे खेळाडू बहारदार खेळ करण्यास सज्ज असल्याने त्यांच्या धडाक्यात यंदाचा वर्ल्डकप उजळून निघणार, हे नक्की.

यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेची वैशिष्ट्ये
  • सर्वच दिग्गज खेळाडू सर्वोत्तम खेळ करीत असल्याने अतिशय रंगतदार स्पर्धा होणार
  • रोनाल्डो-मेस्सी यांच्यासाठी वर्ल्डकप उंचावण्याची अखेरची संधी
  • ब्राझीलचा स्टार नेमार याला वर्ल्डकप जिंकून सुपरस्टार होण्याची संधी. तसेच, ब्राझीलला विक्रमी सहावा वर्ल्डकप जिंकून विजयाचा षटकार मारण्याची संधी
  • गतविजेत्या जर्मनीला फूटबॉलविश्वावर वर्चस्व गाजवण्याची संधी
  • २०१० साली स्पेनचा वर्ल्डकप विजयाचा गोल मारणारा खेळाडू इनिएस्टा याचा अखेरचा वर्ल्डकप
  • बेल्जियमच्या गोल्डन जनरेशन खेळाडूंसाठी वर्ल्डकप जिंकण्याची अखेरची संधी
  • जगातील सर्वांत लोकप्रिय प्रोफेशनल लीग म्हणून लौकिक असलेल्या इंग्लंडचा राष्ट्रीय संघ ५२ वर्षांनी पुन्हा वर्ल्डकप जिंकणार का, याकडे लक्ष
  • आइसलँड-इजिप्त खळबळजनक निकाल लावणार का, याकडे लक्ष
  • इजिप्तच्या महंमद सालाह याने लक्षवेधी कामगिरी केल्यास त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू होण्याची संधी. अन्यथा, रोनाल्डोकडेच बॅलन डी ऑर हा पुरस्कार जाण्याची शक्यता
  • व्हिडिओ असिस्ट रेफरल या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थर्ड अंपायरची वर्ल्डकपच्या मैदानात एन्ट्री. हे तंत्रज्ञान निर्णायक ठरेल

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link