Next
खरं जग स्पर्धेच्या बाहेरच!
बेला शेंडे
Friday, February 08 | 03:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, माझ्या गाण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल मी मागच्या भागात सांगितलं होतं. आज बोलणार आहे ते हिंदी ‘सारेगम’ची स्पर्धक ते ‘सारेगम’ची परीक्षक, या माझ्या प्रवासाविषयी. स्पर्धक म्हणून मी जे शिकले ते आणि इतर स्पर्धकांना परीक्षक या नात्यानं जे सांगावंसं वाटतंय ते आज तुमच्याशी शेअर करतेय.

ते वर्ष होतं १९९८चं. झी टीव्हीवरील हिंदी ‘सारेगम’ म्हणजे माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. गाण्याचे कार्यक्रम मी वयाच्या अकराव्या वर्षापासून करत होते, पण हा एक पूर्णतः भिन्न आणि खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. ‘झी सारेगम’ जेव्हा आलं तेव्हा मी दहावीत होते. आमच्या घरी एक नियम होता तो म्हणजे गाणं करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यामुळे अभ्यास आणि गाण्याचं शिक्षण दोन्ही चालू होतं. शाळेला सुट्टी असली, की मी, गुरू रवी दाते यांच्या घरी मुंबईला गाणं शिकायला जायचे. स्पर्धेची घोषणा झाली तेव्हा ते माझ्या आईवडिलांना म्हणाले, ‘बेलानं या स्पर्धेत भाग घ्यावा असं मला वाटतं.’ घरच्यांनाही तसंच वाटत होतं, कारण ती स्पर्धा थेट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार होती. त्यावेळी टीव्ही चॅनल्स खूप कमी होते, परंतु ही स्पर्धा म्हणजे एक व्यासपीठ ठरणार होती. त्यावेळी गाण्याच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत नव्हत्या. संगीतक्षेत्रातील दिग्गजांसमोर गाणं सादर करण्याची संधी मिळणार होती. तोपर्यंत एकूणच माझी जी तयारी झाली होती, ती पाहता मी भाग घेऊ शकते, असा विश्वास सगळ्यांना वाटला आणि मी त्या स्पर्धेत उतरले. शाळा, अभ्यास, रियाज आणि स्पर्धेची तयारी अशी कसरत सुरू झाली. मला टेन्शन आलं होतं. परंतु घरच्यांनी, गुरूंनी खूप बळ दिलं, भक्कम साथ आणि पाठिंबा दिला, म्हणून मी ते करू शकले.

मला आठवतंय, माझी दहावीची परीक्षा ज्या दिवशी संपली त्यानंतर लगेचच मेगा फायनलच्या राउंड सुरू होणार होत्या. मी स्वतःला स्पर्धेत पूर्णपणे झोकून दिलं होतं. जवळपास तेरा-चौदा फेऱ्यांमधून गेल्यानंतर मी मेगा फायनलला पोचले. अतिशय कठीण अशी ती स्पर्धा होती. त्यावेळी एसएमएस वगैरे काही प्रकार नव्हते. परीक्षकांमध्ये गायिका राजकुमारी, हरिप्रसाद चौरसिया, परवीन सुलताना, ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, पं. जसराज असे तेरा दिग्गज परीक्षक होते. त्यांच्यासमोर कला सादर करणं हे अत्यंत जोखमीचं काम होतं. उपशास्त्रीय, शास्त्रीय, सुगम संगीत, चित्रपट संगीत, गझल, लोकसंगीत अशा अनेक पातळ्यांवर पारखलं जात होतं. सेमी फायनलमधून फायनलमध्ये जाताना एक राउंड असा होता, की आदल्या रात्री तुम्हाला एक संपूर्ण नवीन गाणं दिलं जायचं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तुम्ही ते गायचं, म्हणजे तुमच्याकडे एखादं नवं गाणं आलं तर तुम्ही त्याचा कसा विचार करता हे त्यातून पाहिलं जायचं. अशा अनेक कठीण फेऱ्या होत्या. त्यामुळे त्या स्पर्धेत आम्ही तावून-सुलाखून निघालो आणि खूप शिकायला मिळालं. विजेती म्हणून माझं नाव पं. जसराजजींनी जाहीर केलं तो क्षण आजही जसाच्या तसा डोळ्यांपुढे आहे. त्या स्पर्धेनं मला खूप काही दिलं. आयुष्याला एक दिशा दिली आणि हेच माझं क्षेत्र आहे व मला यातच करिअर करायचं आहे यावर शिक्कामोर्तब झालं.

‘झी सारेगम’नंतर माझं हिंदी, मराठीत करिअर सुरू झालं. खूप मेहनत केली. या क्षेत्रात शॉर्टकट नाहीत, इथे पराकोटीचा संयम लागतो. एका रात्रीत मिळालेलं यश तुम्हाला आनंद देऊन जातं, त्याचबरोबर खूप मोठी जबाबदारीही देऊन जातं. पाय जमिनीवर ठेवणं म्हणजे काय असतं हे घरच्यांनी कायम मनावर बिंबवलं. त्यांनी मला सांगितलं होतं, की स्टेजवर असतेस तेव्हा तू कलाकार आहेस, परंतु स्टेजची पायरी उतरलीस की तू एक सामान्य मुलगी आहेस. याचा समतोल तुला आयुष्यभर साधता आला पाहिजे. माणूस चोवीस तास कलाकार म्हणून वावरू शकत नाही, ही गोष्ट त्यांनी माझ्या मनात रुजवली. कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही. त्यांचे संस्कारच तसे होते. त्यामुळे मला मिळालेल्या यशापेक्षा जबाबदारीची जाणीवच अधिक असायची. खरं जग स्पर्धेनंतर सुरू होतं असं मी म्हणेन. स्पर्धेतून अनुभव मिळतात, पण खरी स्पर्धा नंतर सुरू होते.

आज परीक्षक म्हणून अशा स्पर्धांना मी जाते तेव्हा स्पर्धकाच्या मनात काय चालू असतं हे मला चांगलं समजू शकतं, कारण मी त्यातून गेलेली आहे. सुदैवानं आज संधींची कमतरता नाही, परंतु एक डोळस दृष्टिकोन असणं फार आवश्यक आहे, असं मला वाटतं. काय करायचं आहे, कोणत्या मार्गावर चालायचं आहे, गाण्यातील कुठली शाखा निवडायची आहे, तुमची आवड कशात आहे, तुमच्या आवाजाची जातकुळी काय आहे, इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार करावा लागतो. उत्तम गुरूच्या समोर बसून शिकणं खूप महत्त्वाचं आहे. लोक नेहमी म्हणतात, की सहा-आठ महिने स्पर्धक मुलं टीव्हीवर दिसतात, त्यानंतर ती कुठे असतात? म्हणूनच तुम्हाला नक्की काय करायचं आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा ठसा तुम्हाला उमटवायचा असेल तर मेहनतीला पर्याय नाही आणि शॉर्टकट तर नाहीच नाही. शास्त्रीय संगीतात एक तासाचा राग आपण ऐकतो. तो सादर करण्यात जे कसब आणि जी तयारी लागते तीच तयारी तीन मिनिटांचं गाणं लोकांच्या हृदयापर्यंत पोचवण्यासाठी लागते. लोकांना वाटतं की सोपं आहे, त्यात काय अवघड? पण मला असं वाटतं, की तो परिणाम साधणं यासाठी कसब लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे गायकांसाठी आत्मपरीक्षण महत्त्वाचं असतं. तुम्हाला नक्की काय करायचं आहे, हे ओळखा. तुम्ही स्पर्धेत भाग घेता तो खूप काही अनुभव घेण्यासाठी, कुठेतरी पोचण्यासाठी. यातील जिंकणं-हरणं हा वेगळा मुद्दा आहे, पण तुम्ही त्यातून काय शिकता, तुम्हाला तुमचा मार्ग मिळतो का, नाही मिळाला तर प्रामाणिकपणे तुम्ही तो कसा मिळवायचा, या सगळ्या गोष्टी पालकांच्या मनात आणि स्पर्धकांच्या मनात स्पष्टपणे तयार असल्या पाहिजेत.

स्पर्धेत उतरलेल्या मुलांना या वयात अतिमहत्त्वाकांक्षी बनवू नका, त्यांना त्यांच्या वयाचं राहूद्या. बऱ्याचदा या स्पर्धेत मुलांचा निरागसपणा हरवतो की काय अशी भीती वाटते. तो निरागसपणा टिकवणं पालकांच्याच हातात आहे. स्पर्धेतून संधी मिळते, पण खरं जग हे स्पर्धेच्या बाहेर सुरू होतं. त्यापलिकडे जाऊन तुम्हाला तुमचं स्थान मिळवण्यासाठी रोजच्या रोज मेहनत करावीच लागते. स्पर्धक मुलांनी त्यांच्या वयासारखं वागावं. खेळावं-बागडावं असं मला वाटतं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link