Next
अलविदा आयट्युन्स!
अमृता दुर्वे
Friday, June 14 | 01:45 PM
15 0 0
Share this story

आयट्युन्स… एवढं नाव घेतल्याबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर या सॉफ्टवेअरचा लेआऊट उभा राहिला असेल. आयपॉड्स ज्या कोणी वापरले असतील त्या सगळ्यांनी कधी ना कधी या आयट्युन्सच्या मदतीनं आपली म्युझिक लायब्ररी तयार केलेली आहे. खरंतर अॅपलच्या कम्प्युटर्सचं - मॅकबुकचं प्रस्थ भारतात आता वाढलं. १०-१५ वर्षांपूर्वी अॅपल कंपनी सर्वांपर्यंत पोहोचली ती त्यांच्या आयपॉड्समुळे. अगदी शर्ट किंवा टॉपला क्लिप करता येणाऱ्या शफलपासून क्लासिक दिसणाऱ्या आयपॉड टचपर्यंतचे पर्याय यात उपलब्ध होते. परंतु एक गोष्ट होती. तुमच्याकडे आयपॉड कोणताही असो, आयट्युन्स नावाचं दिव्य पार करूनच यामध्ये गाणी लोड करता येत होती.
तसं पहायला गेलं तर सुरुवातीला किचकट वाटणारं हे सॉफ्टवेअर जगभरातल्या म्युझिक इंडस्ट्रीसाठी एकप्रकारे वरदान ठरलं.
१८ वर्षांपूर्वी आयट्युन्सची सुरुवात झाली ती डिजिटल ज्युकबॉक्स म्हणून. इथे तुम्हाला तुमच्या आवडत्या सीडीजमधून गाणी इम्पोर्ट करता यायची. त्यांची व्यवस्थित लायब्ररी करून ठेवता यायची. आणि मग तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं ती गाणी शोधता यायची.
नॅपस्टार किंवा इतर फाईल शेअरिंग वेबसाइट्सच्या माध्यमातून गाण्यांच्या फाईल्स शेअर करता येत असल्यानं पायरसी झपाट्यानं वाढत असतानाच्या काळात आयट्युन्सनं याला आळा घातला. सोप्या पद्धतीनं, कमी किमतीमध्ये जर लोकांना गाणी विकत घेता आली तर पायरसीला कमी प्राधान्य दिलं जाईल वा पायरसी कमी होईल असा विश्वास स्टीव्ह जॉब्स यांना होता.
या विचारातूनच ज्युकबॉक्सचं रूपांतर म्युझिक स्टोअरमध्ये झालं. त्यातूनच आयट्युन्सवर म्युझिक स्टोअर सुरू झालं, जिथून लोकांना गाणी, अल्बम्स विकत घेता यायचे. हे पहिलंवहिलं म्युझिक स्टोअर तर होतंच. पण हळुहळू पॉडकास्ट्स, फिल्म रेंटल ते अगदी आताच्या हाय रिझोल्युशन ४के व्हिडिओपर्यंतच्या सगळ्यासाठीचं केंद्र आयट्युन्स होतं.
थोडी रक्कम मोजून आपल्याला कायदेशीररीत्या गाणी विकत घेता येणं शक्य आहे हा विचार आयट्युन्समुळे रुजला आणि पसरलादेखील. अनेकांनी पद्धतशीररीत्या म्युझिक विकत घेण्याला प्राधान्य दिलं. कॅसेट्स आणि सीडीज मागे पडून आलेल्या ‘एमपी-३’ फॉरमॅटमुळे पायरसीचा फटका बसलेल्या म्युझिक इंडस्ट्रीला आयट्युन्सनं आधार दिला. आयपॉड्स लोकप्रिय झाल्यानं या विचाराला अधिक चालनाही मिळाली. परंतु त्याच वेळी ९९ सेंटमध्ये गाणी विकल्यानं अॅपल कंपनीनं म्युझिक इंडस्ट्रीचं अवमूल्यन केल्याचेही आरोप झाले.
शिवाय एका आयट्युन्सच्या माध्यमातून अॅपलच्या विविध डिव्हाइसवर गाणी सिंक करता येत असल्यानं याची उपयु्क्तता लोकप्रिय झाली.
ज्या सॉफ्टवेअरची सुरुवात गाण्यांसाठी झाली होती, तिथेच पॉडकास्ट्स, मूव्हीज, टीव्ही शोज या इतर गोष्टीही आल्या. मे २००५मध्ये आयट्युन्समध्ये व्हिडिओ आले. जून २००५मध्ये पॉडकास्ट दाखल झाले आणि जानेवारी २०१०मध्ये पुस्तकंही आली.

आणि आयट्युन्स अधिक क्लिष्ट झालं...

शेवटी कालानुरूप आयट्युन्सच्या या लोकप्रियतेला ओहोटी लागली. पैसे देऊन गाणी विकत घेण्यापेक्षा, पैसे देऊन स्ट्रीमिंग सर्व्हिसवर कितीही गाणी ऐकता येण्यासाठीच्या मेंबरशिपला जास्त लोकप्रियता मिळू लागली. शिवाय इतर सेवा झपाट्यानं येत असताना, लोकांना सोप्या-सुटसुटीत वापराचा पर्याय मिळत असताना, आयट्युन्स मात्र काहीसं क्लिष्टच राहिलं. यातूनच आता आयट्युन्सची जागा इतर अॅप्स घेणार आहेत.

आता आयट्यून्सचं नेमकं काय होणार?
तर आतापर्यंत ज्या सगळ्या सेवा एकाच ठिकाणी मिळत होत्या, त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध होणार. म्हणजे म्युझिक, मूव्हीज, टीव्ही या सगळ्यासाठी स्वतंत्र पर्याय असतील. म्युझिकसाठी अॅपल म्युझिक असेल. अॅपल टीव्ही हा टीव्ही शोज आणि मूव्हीजसाठीचा पर्याय असेल आणि अॅपल पॉडकास्टमध्ये सगळे पॉडकास्ट ऐकता येतील.

विकत घेतलेल्या गाण्यांचं काय?
तुम्ही विकत घेतलेली कोणतीही गाणी वा म्युझिक अल्बम वाया जाणार नाही वा गायब होणार नाही. आयट्युन्सची जागा अॅपल म्युझिक अॅपनं घेतल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे हलवता येतील. त्याच पद्धतीनं तुम्ही विकत घेतलेल्या मूव्हीज, टीव्ही शोज किंवा एपिसोड्सही तुम्हाला ट्रान्सफर करता येतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link