Next
विश्वचषक भारतात आणणार?
शरद कद्रेकर
Friday, April 19 | 03:00 PM
15 0 0
Share this story

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या क्रिकेट विश्वचषकस्पर्धेचा भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर निवड न झालेल्या खेळाडूंची नाराजी आणि त्यांच्या चाहत्यांची टीका यामुळे राष्ट्रीय निवड समिती आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहिली आहे. इंग्लंडमध्ये ३० मेपासून विश्वचषकस्पर्धेला सुरुवात होत असून पहिली लढत होणार आहे ती इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात. भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफिक्रेविरुद्ध होईल. यंदाच्या विश्वचषकस्पर्धेची खासियत म्हणजे पारंपरिक गटवार लढतीवर काट मारण्यात आली असून स्पर्धेत सहभागी असलेले १० संघ एकमेकांशी झुंजतील. ४५ लढतींनंतर अव्वल चार संघांत दोन उपांत्य झुंजी रंगतील. क्रिकेटच्या पंढरीत लॉर्ड्सवर रविवारी, १४ जुलैला अंतिम सामना खेळला जाईल.
विश्वचषकजेतेपदाच्या शर्यतीत भारतीय संघाचा प्राधान्याने उल्लेख केला जातो आहे. भारताप्रमाणे इंग्लंड तसेच गतवेळचा विजेता ऑस्ट्रेलिया यांनाही पसंती लाभली आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघात कोहलीसह चार फलंदाज (रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल), चार अष्टपैलू (विजय शंकर, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा), दोन यष्टीरक्षक (धोनी, कार्तिक), तीन जलदगती गोलंदाज (जसप्रीत बुमराह, महंमद शमी, भुवनेश्वर कुमार), दोन फिरकीपटू (कुलदीप यादव, युजवेंद्र चहल) यांचा समावेश आहे.
चौथ्या फलंदाजासाठी मनवा प्रसाद यांची निवडसमिती पारख करत होती. बराच खल झाल्यावर विजय शंकरची संघात वर्णी लागली. हैदराबादी अंबाती रायुडूला वगळण्यात आल्यामुळे आंध्रच्याच मनवा प्रसाद यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. संघातून डच्चू मिळालेल्या रायुडूने ट्विटरवर उपरोधात्मक प्रतिकिया व्यक्त केली असली तरी बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई करणे टाळले आहे. ‘विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी थ्रीडी चष्मा मागवला आहे’ असे उपरोधात्मक मत रायुडूने मांडले होते.
रायुडूसह अनेक जणांची नावे चौथ्या क्रमांकावरील फलंदाजासाठी चर्चिली जात होती. परंतु अखेर कौल लागला तो विजय शंकरच्या बाजूने. तामिळनाडूच्या २८ वर्षीय शंकरच्या पारड्यात मत झुकले ते त्याच्या तिहेरी कामगिरीमुळे. अलिकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत विजयने त्याची छाप पाडली. नागपूरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने कर्णधार कोहलीच्या साथीने चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची अनमोल भागी करताना कांगारूंच्या गोलंदाजीवर केलेला प्रतिहल्ला विलक्षणच होता. शिवाय निर्णायकक्षणी त्याने कांगारूंच्या दोन विकेट काढून भारताला स्वप्नवत विजय मिळवून दिला. तिथेच त्याचे विश्वचषकचे तिकीट निश्चित झाले होते. या तिकिटावर शिक्कामोर्तब झाले मुंबईत!
जून, जुलैमध्ये विश्वचषकस्पर्धा इंग्लंडमधील विविध ११ स्टेडियमवर खेळली जाईल. मोसमाच्या पूर्वार्धात (मे, जून) ढगाळ वातावरणात पांढरा ड्युक चेंडू स्विंग होईल. यंदाच्या स्पर्धेत ड्युकची जोडी (दोन एंडकडून दोन वेगळे चेंडू) वापरण्यात येईल. ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग करण्याची क्षमता विजयच्या गोलंदाजीत आहे. शिवाय तो उत्त्तम क्षेत्ररक्षक असल्याचे मत निवडसमितीचे अध्यक्ष मनवा प्रसाद यांनी मांडले. त्याच्या या ‘थ्री इन वन’ कामगिरीमुळे विश्वचषकाची वारी करण्याचा योग जुळून आला.
धोनीसारखा खमका, खंदा खेळाडू संघात असताना राखीव यष्टीरक्षकाला संधी कितीशी मिळणार अन् नेमकी हीच बाब दिनेश कार्तिकने बोलून दाखवली आहे. ‘धोनीला दुखापत झाल्यास बँड-एडप्रमाणे माझा वापर करण्यात येईल,’ अशी कोपरखळी कार्तिकने मारली. ३४ वर्षीय दिनेश कार्तिकच्या निवडीमुळे युवा, होतकरू, यष्टीरक्षक रिषभ पंतची संधी हुकली याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अनुभवी खेळाडूला पसंती देण्यात येते, असे मनवा प्रसाद यांनी स्पष्ट केले. निर्णायकक्षणी युवा यष्टीरक्षकाकडून गफलत झाल्यास संघाला ही बाब अडचणीची ठरू शकेल. त्यामुळेच अनुभवी दिनेश कार्तिकला आम्ही पसंती दिली असे प्रसाद यांनी सांगितले.
रिषभ पंत (यष्टीरक्षक) अंबाती रायुडू (फलंदाज), इशांत शर्मा, अक्षर पटेल (गोलंदाज) यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियमानुसार २३ मेपर्यंत दुखापतग्रस्त खेळाडूंऐवजी बदली राखीव खेळाडूंचा संघात समावेश होऊ शकतो. नवदीप सैनी, दीपक चहर,  खलील अहमद, अवेश खान या चौघांना नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी इंग्लडला पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला ही स्वागतार्ह बाब!
रोहित शर्मा, शिखर धवन ही भारताची बिनीची जोडी. कर्नाटकी राहुलचे विश्वचषकाचे तिकीट निश्चित  झाले. राहुलची राखीव सलामीचा फलंदाज म्हणून निवड करण्यात आल्याचे प्रसाद यांनी सांगितले. विजय शंकरचा चौथ्या क्रमांकासाठी विचार करण्यात आला, त्याची संघात  वर्णीदेखील लागली. विश्वचषकादरम्यान दौऱ्यावरील निवडसमिती (कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री) प्रसंगानुरूप चौथ्या क्रमांकासाठी राहुल, दिनेश कार्तिक यांचादेखील विचार होऊ शकतो.

इंग्लंडचे पारडे जड
इंग्लंडने १५ जणांच्या चमूत मोईन, रशीद या फिरकी दुकलीची निवड केली आहे. बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या २४ वर्षीय जोफ्रा आर्चरची निवड करण्यात आली नसली तरी अखेरच्या क्षणी (२३ मे) त्याचा समावेश करण्यात येईल, असा जाणकारांचा होरा आहे.
इंग्लंडचा चमू : इऑन मॉर्गन (कर्णधार) जेसन रॉय, मोईन अली, आदिल रशीद, अॅलेक्स हेल्स, लिआम प्लंकेट, जोस बटलर, जॉन बेअरस्टो, टॉम करन, जो रूट, मार्क वूड, क्रिस वोक्स, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, जो डेन्ली.

वॉर्नर, स्मिथचे पुनरागमन
गतवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ यांनी अपेक्षेनुसार पुनरामगन केले. वर्षभराच्या बंदीनंतर वॉर्नर, स्मिथ आयपीएलमध्ये खेळले. त्यात वॉर्नरला सूर गवसला, परंतु स्मिथला धावांसाठी संघर्ष करावा लागला. कर्णधार फिंचच्या संघात नॅथन लायन, अॅडम झम्पा या फिरकी दुकलीचा समावेश करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link