Next
... तो आयुष्यातला पहिला धडा होता
अलका कुबल-आठल्ये
Friday, April 12 | 05:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार, बालकलाकार म्हणून मी केलेला नाट्यप्रवास मागच्या भागात तुम्हाला सांगितला आहे.  त्यानंतर रुपेरी पडद्यावर माझी एन्ट्री झाली ती एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातून. तिथपासून मी कशी घडत गेले याविषयी आजच्या भागात बोलणार आहे.  

जयवंत दळवी यांच्या कथेवर त्यावेळी हिंदीत ‘चक्र’ नावाचा सिनेमा बनत होता. त्यात षोडशवर्षीय मुलीची एक छोटी भूमिका होती. त्या भूमिकेसाठी सुरेन फातर्फेकर यांनी माझं नाव सुचवलं. फातर्फेकर यांची व माझी ओळख ‘नटसम्राट’ नाटकापासूनची. त्यावेळी मी नेमकी दहावीत होते आणि मार्च महिन्यात मुख्य परीक्षा होती. सुदैवानं त्या चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी महिन्यात होणार होतं आणि मला दहाच दिवस चित्रीकरणासाठी जावं लागणार होतं म्हणून आईने काम करायला होकार दिला, अर्थात अभ्यासावर परिणाम होता कामा नये ही तिची अट होतीच. मग माझी ‘लूक टेस्ट’ झाली. त्या चित्रपटात दस्तुरखुद्द स्मिता पाटील काम करणार आहेत हे कळताच मला प्रचंड आनंद झाला. कारण स्मिता पाटील माझी सर्वात आवडती अभिनेत्री होती. त्यांच्याबरोबरच नसिरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा असे अनेक मोठे कलाकार त्यात होते. या मोठ्या कलाकारांबरोबर माझ्याही तारखा घेतल्या गेल्या. दहा दिवस मला सेटवर जायचं होतं. माझी भूमिका छोटीशीच होती पण स्मिता पाटील यांच्याबरोबर दहा दिवस सेटवर राहता येणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंददायी गोष्ट होती. दहावीची परीक्षा तोंडावर आली होती म्हणून मी सेटवर पुस्तकं घेऊन जायचे आणि माझं काम नसेल तेव्हा शिस्तीत अभ्यास करायचे. स्मिता पाटील यांना त्याचं खूप कौतुक वाटायचं. आमचं चित्रीकरण बहुधा रात्री असायचं. त्यावेळी त्या दिवस-रात्र काम करत होत्या. कॅमेरा ऑन झाला की त्यांचा चेहरा व डोळ्यातील भाव असे काही बदलायचे की वा! वा! काय बोलावं? निळू फुले त्यांच्या डोळ्यांना हरिणीची उपमा द्यायचे ना ती अगदी खरी होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. मी एवढी नशीबवान की मला त्यांच्याबरोबर काम तर करायला मिळालच, तसंच त्यांना जवळून अनुभवातही आलं. आमचं चित्रीकरण चेंबूरला व्हायचं म्हणून आई माझ्यासोबत यायची. मागच्या भागातसुद्धा मी म्हटलं होतं की आई-बाबांचे खूप कष्ट असतात आपल्या जडणघडणीमध्ये. आपल्याला फक्त ते तेव्हा जाणवत नाहीत. तर पहाटे आमचं चित्रीकरण संपायचं. मग मी आणि आई चेंबुरच्या बसस्टॉपवर जायचो, तिथून बसने दादरला आणि मग पुढे ट्रेनने गोरेगावला. मला आठवतंय, एकदा आम्ही दोघी अशाच बस स्टॉपवर उभ्या होतो आणि स्मिता पाटील यांनी आम्हाला बघितलं. त्यावेळी त्यांची अॅम्बेसेडर गाडी होती. आम्हाला बघून त्या गाडी रिव्हर्स घेऊन आल्या. त्या तेव्हा नाना चौकात राहायच्या. त्यांनी आमची चौकशी केली व आम्हाला दादर स्टेशनला सोडलं. माझ्या आईला म्हणाल्या, ‘मुलीला घेऊन पुन्हा कधी अशा एकट्या उभ्या राहू नका. मी तुम्हाला दादरला सोडेन.’ त्या रोज आम्हाला दादरला सोडायच्या आणि तिथून घरी जायच्या. एवढी मोठी अभिनेत्री पण बघा किती माणुसकी. आपण नेहमी माणुसकीबद्दल बोलतो, पण खरी माणुसकी मी स्मिता पाटील यांच्यामध्ये पाहिली. तो माझ्या आयुष्यातील पहिला धडा होता, की यश मिळालं तरी पाय जमिनीवर अगदी घट्ट रोवलेले असले पाहिजेत. स्मिता पाटील यांना केवढं यश मिळालेलं होतं पण कुठेच घमेंडीचा लवलेश नसायचा. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. अशा अभिनेत्रीबरोबर मला काम करायला मिळालं, अजून काय हवं?

मुळात माझी सुरुवातच खूप चांगल्या लोकांबरोबर झाली, चांगल्या ग्रुपबरोबर झाली. काही जण म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये वाईट माणसं असतात, परंतु मला खरंच अशी माणसं कधी भेटली नाहीत. सहकलाकाराची काळजी घेणारे कलाकार मी पाहिले आहेत. शांता जोग, विजया धनेश्वर, मंदा वर्तक, कुमुद चासकर या सगळ्या मला एवढ्या सांभाळायच्या की आई बरोबर आली नाही तरी मला कधी परकं वाटायचं नाही. या मोठ्या लोकांच्या वागणुकीचे संस्कार माझ्यावर होत गेले. त्यामुळे मलाही ती सवय लागली की नवीन कलाकारांना, सहकलाकारांना प्रेमानं सांभाळून घ्यायचं आणि आपल्याकडून होईल तेवढी मदत करायची. हे संस्कारातून येत गेलं. कुणी वेगळं शिकवलं नाही. या क्षेत्रात कसं वागायचं याचा धडा मला स्मिता पाटील यांनी घालून दिला हे मी नेहमी कृतज्ञतापूर्वक सांगते. मी त्यांचा एकही सिनेमा चुकवायचे नाही. कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं हे मी त्यांना बघून बघून, त्यांच्या भूमिकांचा बारकाईनं अभ्यास करून शिकले. त्यांचे सिनेमे पाहायला मी आणि माझी मैत्रीण कविता, आम्ही गोरेगावहून कुठेही व कितीही लांबपर्यंत जायचो कारण तेव्हा आतासारखी भरपूर सिनेमागृहं नव्हती. मग आईची परवानगी घ्यायचो आणि जायचो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं प्रचंड होतं. मी त्यातले काही कण टिपले. हे खरं आहे की इंडस्ट्रीत आल्यावर मी विशिष्ट पद्धतीच्या सिनेमांमध्ये अडकत गेले. मला मात्र चुकूनही वाटलं नव्हतं की मी मराठी सिनेमांच्या वेगळ्या लाटेत येईन, कारण माझी जातकुळी, माझी आवड ही निराळी होती. परंतु मराठी सिनेमात त्यावेळी दुसरे पर्यायही नव्हते. मराठीत यायच्या आधी मी एक राजस्थानी आणि एक गुजराती चित्रपटही केला होता. त्यानंतर मी पहिला मराठी चित्रपट केला तो ‘पोरींची कमाल बापाची धमाल.’ माझा पहिला हिरो होता अविनाश खर्शीकर. त्यात निळू फुले आणि सीमा देव आई-वडिलांच्या भूमिकेत होते. विनोदी चित्रपट होता. निळूभाऊ आणि सीमाताई आमच्यासारख्या नवख्या कलाकारांशी एवढं प्रेमानं वागायचे की त्यांच्याविषयी खूप आदर वाटायचा. चांगलं युनिट जमायला योग जुळून यावे लागतात असं मला वाटतं आणि तो योग तेव्हा चांगला जुळून आला होता. तिथून मराठी चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास सुरू झाला, पण खऱ्या अर्थानं नायिका म्हणून माझी सुरुवात झाली ती ‘लेक चालली सासरला’ या चित्रपटापासून. त्या चित्रपटाने त्यावर्षी ‘रजत महोत्सव’ साजरा केला व मराठी चित्रपटसृष्टीला एक सोज्ज्वळ, सोशिक आणि प्रेमळ नायिका मिळाली जिचं नाव होतं अलका कुबल. सोशिक, सहनशील नायिकेचा उदय झाला आणि शिक्काही बसला, जो पुढे कायम राहिला. प्रेक्षकांनी मात्र माझ्यावर खूप माया केली. पुढचा प्रवास पुढच्या भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link