Next
सोनिया हार्मंड आणि आदिमानवाचे पूर्वज
निरंजन घाटे
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

विज्ञानात ‘सेरेंडिपिटी’ नावाची एक घटना फार महत्त्वाची ठरते. सेरेंडिपिटीला मराठीत ‘सुदैवी अपघात’ किंवा ‘सुदैवी योगायोग’ असं म्हणता येईल. आधी सर्वपरिचित असलेली एक-दोन उदाहरणं बघुया. उदाहरणार्थ, टीएनटी या अत्यंत अस्थिर अशा स्फोटकावर प्रयोग करत असताना अल्फ्रेड नोबेलच्या हातून ते स्फोटक सांडलं. एरवी खरं तर अशा अपघातात नोबेल जखमी व्हायला हवा होता, मात्र तसं झालं नाही. त्याचं कारण तो स्फोटकद्रव खाली असलेल्या कैसलगुऱ्ह नावाच्या वाळूत सांडला होता. सागरतळाशी भरून पडलेल्या एकपेशीय प्राण्यांच्या कवचामुळे ही वाळू बनलेली असते. ती घट्ट होऊन तिचा सच्छिद्र असा वालुकाश्म बनतो, त्यात हा द्रव मुरला होता. टीएनटी जर कैसलगुऱ्हमध्ये मिसळलं तर ते स्थिर होतं आणि त्यापासून ज्या कांड्या बनतात ते जिलेटीन सहजतेनं कुठेही बिनधोक नेता येतं, या शोधानं जगाचा इतिहास बदलला. नोबेलला त्या शोधानं अमाप पैसा मिळाला. त्यातूनच पुढे नोबेल पारितोषिकं दिली जाऊ लागली.
दुसरं उदाहरण आपण शाळेत शिकतो. ते म्हणजे पेनिसिलीनचा शोध. अलेक्झांडर फ्लेमिंग यांची प्रयोगबशी रात्रभर अच्छादनाशिवाय उघडी राहिली वगैरे गोष्टी सर्वांनाच माहीत असल्यानं इथे पुनरावृत्ती करत नाही. असे योगायोग सर्वत्र घडत असतात, परंतु जेव्हा त्यामुळे एखादा महत्त्वाचा शोध लागतो तेव्हा मात्र त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते. असाच एक महत्त्वाचा शोध मानवशास्त्रात लागला. त्याला मानवशास्त्राच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली तरी मानवशास्त्र हा विषय आपल्याशी अगदी जवळून संबंधित असूनही दुर्लक्षित असल्यामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली नाही. या अत्यंत योगायोगानं लागलेल्या शोधामुळे ज्यांना आपण मानवी बुद्धिमत्तेची चमक दाखवणारी खूण असं इतके दिवस समजत होतो, ती पाषाणांची हत्यारं आपल्या गणातील मानवी पूर्वजांनी प्रथम बनवली हा समज खरा नसून ती दुसऱ्याच जातीच्या आदिमानवांनी प्रथम बनवायला सुरुवात केली, असं दिसून आलं.
सोनिया हार्मंड आणि तिचा सहाध्यायी हे स्टोनी ब्रुक विद्यापीठातील मानवशास्त्राचे संशोधक. या सहाध्यायाचे नाव जेसन लुईस. त्यांनी पुढे लग्न केलं, त्याचा या संशोधनाशी काही संबंध नाही; पण माहीत असावं म्हणून सांगितलं. हे दोघं तुर्काना पुरातत्त्वीय प्रकल्पामध्ये विद्यापीठातर्फे सामील झाले होते. सोनिया जीप चालवत होती आणि जेसन जीपीएस यंत्रणा वापरून सोनियाला सूचना देत होता. तुर्कानाच्या रखरखीत वाळवंटात चुकून भलतीकडे भटकणं, हा खरं तर स्थायीभाव आहे. केनियातील तुर्काना सरोवराच्या उत्तर भागातील या रखरखीत प्रदेशात रस्ते नाहीत. ते असायचं कारणच नाही; कारण तिथे मानवी वस्तीच नाही. मात्र या भागात आदिमानव वावरल्याचे भरपूर पुरावे उपलब्ध आहेत.
जुलै २०११ मधील घटना. तुर्काना सरोवराच्या परिसराचे खरं तर नकाशेच उपलब्ध नाहीत. तसेच तिथे रस्तेही नसल्यामुळे त्यातल्या त्यात सपाट भाग बघून त्याला रस्ता म्हणायचं. एका ठिकाणी जीपीएस यंत्रणेनुसार उजवीकडे वळायला हवं होतं. सोनियाला बहुधा ते ऐकू गेलं नसावं. ती डावीकडे वळली. थोड्या वेळानं तिनं जीप थांबवली, कारण समोर झुडपांचं गचपण होतं. सोनिया आणि जेसन पुढे काय करायचं याचा अंदाज घेण्यासाठी जवळच्या एका टेकडीवर चढले. त्यांना एक अद्वितीय भूमी दिसली. तिथे उत्खनन व्हायला हवं, असं सोनियाला मनोमन वाटू लागलं. या अंत:स्फूर्त विचारानं ती इतकी भारावली की जीपमधील सर्व साहाय्यकांना खाली उतरून त्या भूभागात काही सापडंय का ते पाहायला सांगितलं.
त्यांच्याकडे वॉकीटॉकी होता. त्यावरून तिनं स्थानिक साहाय्यकांनाही बोलावून घेतलं. मग ते दहाही जण कामाला लागले. वाळवंटातील काम सूर्य उगवायच्या थोडं आधीच सुरू करावं लागतं. त्यामुळे उन्हाचं भाजणं सुरू झालं की विश्रांती घेता येते. थोड्याच वेळात सकाळी नऊच्या सुमारास स्थानिकांपैकी एक साहाय्यक वॉकीटॉकीवर उत्तेजित स्वरूपात बोलू लागला. ‘लवकरात लवकर इथे या, मला काहीतरी सापडलंय.’ एका नाल्याच्या वाळलेल्या पात्राच्या काठावरच्या अवसादात त्याला मानवी हत्यारं दिसली होती. त्या पाषाणांच्या हत्यारांवर एक काळपट पूट चढलं होतं. झीज झाल्यामुळे तसं दिसत होतं. मात्र हे हत्यार ज्या अवसादात सापडलं होतं, ते नुकतंच उघडं पडलं असावं, असं दिसत होतं. हा फार महत्त्वाचा शोध आहे, हे सोनियाच्या लक्षात आलं. याचं कारण अवसादाच्या ज्या थरात ती हत्यारं सापडली होती, ते अवसाद २७ लक्ष वर्षांपूर्वी जमा झालेल्या गाळाचं होतं.
यानंतर पुराचंबुकीय पद्धतीनं या हत्यारांचं वय निश्चित केलं गेलं तेव्हा ही हत्यारं ३३ लक्ष वर्षांपूर्वी बनली गेली होती, असं लक्षात आलं. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र बदलत असतं. खडक तयार होतात त्यावेळी त्यातील खनिजं ज्या काळात तयार झाली, त्या काळाचं चुंबकीय क्षेत्र दर्शवतात. त्यावरून खडकांचं वय निश्चित करता येतं. या हत्यारांचं आकारामान तसं साधं, सुटसुटीत होतं. आकारमानानं त्यांच्यात सुबकता नव्हतीच, शिवाय ती खूप मोठी होती. जसं आदिमानवी कौशल्य वाढत गेलं तशी अश्मयुगीन हत्यारं खूपच सुबक, नीटनेटकी आणि आकारानं छोटी होत गेली. या नव्यानं सापडलेल्या हत्यारसमूहाचं नामकरण लोमेक्वी-३ असं केलं. त्यांची सरासरी रुंदी ५ ते १० सेंटिमीटर इतकी होती. लोमेक्वी-३ प्रकारची हत्यारं जरा वेगळ्या पद्धतीनं बनवली गेली होती. हे आदिमानव ज्या दगडाचं हत्यार बनवाचयं त्याचा गाभा मोठ्या व सपाट खडकांवर ठेवत. मग वरून त्यावर दुसरा कठीण खडकाचा तुकडा आपटत. लोमेक्वन हत्यारं माणसानं बनवलेली असावीत, हे त्यांच्या घडणीवरून सांगता येत असलं तरी ती हत्यारं कुशल कारागीरानं बनवलेली नाहीत हेही त्यांच्याकडे पाहून कळतं. या हत्यारांचा अभ्यास केल्यानंतर ती कोणत्या काळात बनवली गेली, ती कशी बनवली गेली हे सांगणं शक्य झालं; तरी ती कुणी बनवली हे कोडं उलगडणं महत्त्वाचं होतं. माणूस ज्या गणाचा सदस्य आहे, तो ‘होमो’गण साधारणत: २५ दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला असावा, असं म्हटलं जातं. या काळातील मानवी आदिपूर्वजांचे पुरावे अगदी तुरळक प्रमाणात सापडतात. या आपल्या आदिपूर्वजांना ‘होमो हॅबिलस’ असं म्हणतात. या मानवाचा मेंदू आपल्यापेक्षा लहान असला तरी त्यांच्या पूर्वजांपेक्षा, म्हणजे ज्या मानवी पूर्वजांना ‘ऑस्ट्रॅलोपिथेकस’ म्हणतात, त्यांच्यापेक्षा मोठा होता. ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राणी हे त्या आधीच्या वृक्षवासियांना मानव बनण्याच्या दिशेनं गाठलेला पहिला महत्त्वाचा टप्पा होता.
हे ऑस्ट्रॅलोपिथेकस आदिपूर्वज आफ्रिकेच्या खचदरी (रिफ्टव्हॅली) भूभागात ४० लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आले आणि २६ लक्ष वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात पसरले. त्यांच्यात अनेक जाती, उपजाती होत्या. ते कपींपेक्षा वेगळे होते, पण अजून त्यांना माणूस ही उपाधी लावता येत नव्हती. साधारणपणे त्यांच्यापासून पुढे जननिक बदलांतून होमोगणाची उत्पत्ती झाली, असं मानलं जातं. इथिओपियामधील अफार या वाळवंटी भागात हे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते. हा भाग तुर्काना सरोवराच्या उत्तरेस ११०० किलोमीटर दूर आहे. याच भागात होमोगणाचे म्हणजे आपल्या आदिपूर्वजांचे अवशेष सापडले. यामुळे मानवाच्या इतिहासलेखनाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असतानाच सोनियाला सापडलेल्या पुराव्यांनी आणखीच खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक संशोधन होणं गरजेचं आहे, असं सोनिया व तिच्या सहकाऱ्यांना वाटतं. सोनियानं शोधलेल्या आदिमानवाला केन्यान्थ्रॉम्पस कुळाचा सदस्य म्हणतात. त्यातच आता नव्या तंत्रज्ञानाची भर पडत असल्यानं या हाडांचा त्रिमित अभ्यास करून त्यांची घनता जाणून घेता येते. त्यामुळे मानवी पूर्वज हातांचा वापर कसा करत होते, हे स्पष्ट होतं. सोनियाच्या मते यातूनच मानवी पूर्वजांचं कोडं सुटायला मदत होणं शक्य आहे.
(समाप्त) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link