Next
लाडवाणींचा सामाजिक ध्यास
डॉ. जगदीश चिंचोरे
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this storyश्री लक्ष्मी आणि श्रीसरस्वतीचे वरदान लाभलेला लाड वाणी हा अल्पसंख्याक समाज आहे. सुसंस्कृतपणा, प्रामाणिकपणा, चिकाटी, उद्यमशीलता, सद्वर्तन, सद्विचार आणि आध्यात्मिक बैठक या बलस्थानांच्या जोरावर समाजाचा पाया जुन्याजाणत्या समाजकार्यकत्यांनी पक्का करून ठेवला आहे. पुढच्या पिढीने या सद्गुणांचा विसर पडू देता कामा नये हे महाअधिवेशनाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते.

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजबांधवानी स्वातंत्र्यलढ्यासाठी तुरुंगवास, प्रसंगी आर्थिक दंडाची शिक्षादेखील भोगली आहे. ७० ते ७५ समाजबांधवांचे स्वातंत्र्यसमरातील कार्याचे कधीही विस्मरण होऊ देता कामा नये. या सेनानींपैकी विशेष उल्लेख करायचा झाल्यास नरहर गोपाळ शेठ, अलई ऊर्फ बागलाणचे बाबा, नारायणराव उर्फ आण्णासाहेब खुटाडे, आबासाहेब उर्फ गंगाधर खुटाडे, जनार्दन बळवंत वाणी, नारायण दयाराम कोठावदे, हुतात्मा त्र्यंबक राजाराम वाणी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यातील बागलाणच्या बाबांचे सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, मणीबेन पाटील, सानेगुरूजी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री या राष्ट्रीय पातळीवरच्या क्रांतिकारकांशी स्नेहाचे संबंध होते आणि हे सगळेजण बाबांच्या त्या काळातील देखण्या आणि प्रेक्षणीय वाड्यात मुक्कामालाही असायचे. पुण्याच्या लोकमान्य टिळकांच्या केसरी ट्रस्टला भरघोस देणगी दिल्याचे पुरावेही आढळतात. त्याबद्दल टिळकांनी नामपूर येथे जाऊन बाबांचा जाहीर सत्कार केला असल्याच्या लेखी नोंदी आहेत.

लाडशाखीय वाणी समाजाच्या बहुसंख्य समाजबांधवांची बैठक आध्यात्मिक आहे. प.पू. पांडुरंगशास्त्री आठवलेदादा, मुल्हेरचे भक्तराज महाराज, अंमळनेरचे सखाराम महाराज किंवा त्यांची गादी चालवणारे प.पू. प्रसाद महाराज अंमळनेरकर, सोनगीरचे प.पू.श्री. मुकुंददराज महाराज, उद्धव महाराज कुकुरमुंडेकर या आध्यात्मिक गुरूंचा शिष्य/भक्तपरिवार महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. या समाजाला अध्यात्माचा वारसा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प.पू. महंत विचारदास महाराजांच्या रूपाने लाभलेला आहे. महंत विचारदास महाराज हे लाडशाखीय वाणी समाजात श्रीक्षेत्र गाळणे या गावात जन्माला आले. विचारदास महाराज नया उदासीन आखाड्यात अनेक वर्षे होते. त्यामुळे त्यांना दोनदा उज्जैन (१९५२) आणि हरिद्वार (१९५८) येथे शाहीस्नानाचा मान मिळाला.

लाडशाखीय वाणी समाज ब्रिटिशकाळात ‘लाड सखा वाणी’ या नावाने ओळखला जात होता. काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात येथून स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये व्यापार, शिक्षण, उद्योग, शासकीय नोकरी, खासगी व्यवसायात चांगल्या पद्धतीने स्थिरावला आहे. अजूनही बहुसंख्य समाज खेड्यांत वास्तव्य करत असल्यामुळे काही समाजबांधवांची आर्थिक स्थिती तेवढी संपन्न नाही, ही बाब नाकारता येणार नाही.

२४ आणि २५ नोव्हेंबर या दोन दिवशी समाजातल्या युवक-युवती, उद्योजक, माहिती-तंत्रज्ञान विभागातील तंत्रज्ञ, नवीन उद्योजक या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित होणार आहेत. या व्याख्यानांतून वेगळी ऊर्जा समाजबांधवांना मिळेल, अशी खात्री आहे. त्यामुळे बहुसंख्य समाज या दोन दिवसांत आवर्जून उपस्थिती लावणार आहे. २५ नोव्हेंबरला समाजासाठी खुले अधिवेशन असणार आहे. सामाजिक बदल मग ते रूढी, परंपरा, चालीरीती, विवाहसमस्या, घटस्फोट या विषयांशी संबंधित असणार आहेत. या विषयांवर प्रगल्भ, रचनात्मक आणि आचरणात आणता येतील, अशा क्रांतिकारक बदलांचा प्रारंभ या अधिवेशनातून होणार आहे. या चर्चेसाठी विशेष वेळेचे नियोजन केलेले आहे. या अधिवेशनासाठी खान्देश, बागलाण, मुंबई, पुणे, औरंगाबाद, सातारा, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने ‘एकच ध्यास समाजाचा विकास’ हा मंत्र कायम आपल्या स्मरणात राहील असा विश्वास या प्रसंगी
देऊ या!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link