Next
तुझी माझी जोडी जमली रे!
डॉ. नीलिमा गुंडी
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this storyआपण चांगली कविता वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा आपलं लक्ष वेधलं जातं. त्यात काय अशी जादू असते? ती जादू असते त्यातल्या रचनेमधे! आपण एरवी बोलतो, तेव्हाही शब्द उच्चारतोच की! पण कवितेत शब्दांच्या नादाची नेमकी जाणीव आपल्याला होते. एक शब्द आपल्या कानी पडतो, तेव्हाच तो त्याच्या पुढच्या शब्दाविषयीची उत्सुकता निर्माण करून जातो. घट्ट गुंफलेला फुलांचा हार असावा नि त्यातून दोरा जराही दिसू नये, तसंच जणू कवितेत होतं! त्यासाठी कवितेत अनुप्रास नि यमकं वापरलेली असतात. एखादं बडबडगीत आठवा - माकडा, माकडा , हुप, हुप
तुझ्या शेपटीला शेरभर तूप!

यात ‘ हुप ‘ आणि ‘ तूप ‘ यांचा ठेका जुळतो. कवितेत कधी काही शब्द पुन्हा पुन्हा वापरून, तर कधी उलटसुलट वापरून कसा अनुप्रास साधतात , पाहा-

चिऊकाऊमाऊ , माऊकाऊचिऊ  खेळायला येऊ?
येऊ का जाऊ?
चिऊकाऊ माऊकाऊ माऊकाऊचिऊ
खेळायला येऊयेऊयेऊ !

या जुन्या गाण्यात ‘ऊ‘ हे अक्षर किती खेळकर बनून येतंय ! तुमच्या आवडीचं आणखी एक गाणं आठवा -

टपटप टपटप थेंब वाजती,
गाणे गातो वारा,
विसरा आता पाटीपुस्तक,
मजेत झेला धारा !

 यात एकामागून एक पडणाऱ्या पावसाच्या धारांसारखी काही अक्षरंही एकामागून एक येतात, हो ना? वृंदा लिमये यांची एक कविता आहे -

कडमड्या कल्लूचा पाहा तर झपाटा
कागद कातरायचा लावलान् सपाटा!


हे ऐकताना का बरं मजा वाटते, ते शोधा पाहू! मग तुमच्या लक्षात येईल की तुम्ही मुलं जशी खेळताना मित्रमैत्रिणींच्या जोड्या जमवता, तसंच कवितेतही घडतं ! कवितेत शब्द एकमेकांना टाळी देत जणू म्हणतात, “ तुझी-माझी जोडी जमली रे” !
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link