Next
सागरी संशोधनाची पंढरी
अर्पिता बगळे
Friday, June 07 | 12:15 PM
15 0 0
Share this story


गोवा हे नाव उच्चारले की जगप्रसिद्ध किनारे, भव्य चर्चेस किंवा सुंदर मंदिरे डोळ्यांसमोर येत असली तरी आणखी एका खास कारणासाठी गोवा जगप्रसिद्ध आहे. पणजी या राजधानीच्या शहराचा अरबी समुद्राकड़ील टोकाकडचा भाग म्हणजे दोनापावल. याच दोनापावलमध्ये राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आहे. जगभरातील समुद्रसंशोधकांचे हे माहेरघर. संस्थेच्या   संशोधन नौकेवरही अनेक संशोधकीय मुशाफिरी करणारे पाहावयास मिळतात. ही संस्था पाहण्यास जगभरातून शेकडो जिज्ञासू येतात. गोव्याच्या पर्यटननकाशावर या संस्थेला स्थान नसले तरी या संस्थेच्या संशोधकांनी आपल्या ज्ञानाचा डंका जगभर पोचवला आहे.

एनआयओ या नावाने ही संस्था ओळखली जाते. १९५० च्या दशकात जगभरातील समुद्रसंशोधकांना अटलांटिक, प्रशांत व हिंदी महासागरात संशोधनास मोठा वाव असल्याचे जाणवत होते. यातून १९५९ ते १९६५ या दरम्यान अनेक देशांतील संशोधकांनी एकत्र येऊन भारत सरकारच्या मदतीने हिंदी महासागरात संशोधनमोहीम राबवली होती. या संशोधनातून बरीचशी उपयुक्त माहिती सरकारला मिळाल्याने या क्षेत्रातील संशोधनास  चालना देण्याचे ठरवण्यात आले व गोव्यातील दोनापावल किनाऱ्यावर मे १९७३ मध्ये ही संस्था आकाराला आली. पद्मश्री डॉ. एन. के पाण्णीकर हे या संस्थेचे पहिले संचालक होते.

आपण जमिनीतील खनिजे काढतो, वनस्पतींपासून औषधी गुणधर्म मिळवतो अशीच सृष्टी सागराच्या आड दडलेली आहे. त्यातून खनिजे, औषधे मिळवणे आदींवर एनआयओत संशोधन चालते. त्याशिवाय सागराच्या तळाशी गडप झालेल्या नवनवीन प्रदेशांचा शोधही हे संशोधक घेत असतात. बेटद्वारकेचा या संशोधकांनी लावलेला शोध तर जगजाहीर आहे. सध्या या संस्थेत १७० संशोधक काम करतात. २१० साहाय्यक, १२० प्रशासकीय कर्मचारी असा संस्थेचा डोलारा आहे. मुंबई, कोची व विशाखापट्टणम येथेही संस्थेची संशोधनकेंद्रे आहेत. देशाची इंधनाची गरज भागवण्यासाठी नद्यांच्या खोऱ्यांत आणि समुद्रात तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्याचे श्रेय या संस्थेलाच जाते.

समुद्रातील संशोधनापुरते मर्यादित न राहता एनआयओने १९८१ मध्ये पहिली अंटार्क्टिका संशोधनमोहीम यशस्वीपणे राबवली होती. आता त्यावरील संशोधनासाठी वेगळी संस्था आकाराला आली असली तरी त्यावरील संशोधन सुरू करण्याचा मान एनआयओकडेच जातो.सध्या शेजारील बांगलादेशाला त्यांच्या समुद्रात काय दडले आहे याची माहिती संकलित करण्यासाठी एनआयओचे संशोधक मदत करत आहेत.

सागरी जीवांवरही एनआयओत संशोधन चालते. त्यासाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा एनआयओमध्ये आहेत. मान्सूनचा पाऊस हा मान्सूनच्या वाऱ्यामुळे पडतो या जगमान्य सिद्धांतास एनआयओतील डॉ. एमय आर. रमेशकुमार यांनी छेद दिला. त्यांनी पावसाचा व समुद्राच्या तापमानाचा असलेला संबंध ३० वर्षे संशोधन करून उलगडला. मान्सूनचे वारे असले तरी पाऊस न पडण्यामागची कारणे त्यानी शास्त्रीय कसोटीवर उतरवली. अखेर त्यांचा सिद्धांत जगन्मान्य झाला. पाऊस पडण्यासाठी समुद्राचे पाणी तापलेले हवे हा त्यांचा सिद्धांत आहे, यामुळेही एनआयओची चर्चा अलीकडच्या काळात जगभर झाली. सागरी जैवतंत्रज्ञानावरील संशोधनाने देशातील उद्यमशीलतेला मदत केली आहे. आज ५० पेटंट एनआयओच्या संशोधकांच्या नावे आहेत, त्यातील ६० टक्के पेटंट जैवतंत्रज्ञानातील आहेत.

उद्योगक्षेत्राने विनंती केलेल्या प्रकल्पांवरही एनआयओ काम करते. मुंबई हायमधून इंधन आणण्यासाठी पाइपलाइन घालण्याच्या कामासाठी सर्वेक्षण एनआयओनेच केले होते. सागरी पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल तयार करून देण्यासाठी एनआयओ ही भऱवशाची संस्था सध्या मानली जाते.


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link