Next
क्रिकेटपटूचा खरा कस ‘कसोटी’तच
नितीन मुजुमदार
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this storyखरं तर मला तिन्ही फॉर्म खेळायला आवडलं असतं, परंतु कुठल्याही क्रिकेटपटूचा खरा कस लागतो तो कसोटी खेळतानाच, हे ठाम मत आहे भारताचे माजी कसोटीपटू करसन घावरी यांचं. मुंबईतील आपल्या निवासस्थानी खास ‘झी मराठी दिशा’साठी संवाद साधताना त्यांनी यावेळी त्यांच्या कसोटीतील अनेक आठवणींनाही उजाळा दिला. आज पन्नाशीच्या पुढे अथवा आसपास वय असलेल्या साऱ्या क्रिकेटप्रेमींच्या तरुणपणीच्या काळातील पोस्टरबॉय म्हणजे आज ६८ वर्षांचे असलेले करसन घावरी. परिचितांना ते कदुभाई म्हणूनही ज्ञात आहेत.

अतिशय आकर्षक असं व्यक्तिमत्त्व, नैसर्गिक वेगळेपण लाभलेली डावरी फलंदाजी आणि त्याहीपेक्षा प्रभावी अशी डावखुरी वेगवान गोलंदाजी यासाठी तत्कालीन क्रिकेटजगतात घावरी ओळखले जात. शिवाय दोन वेळा कसोटीत आपल्या डावऱ्या फिरकीची कमालही कदुभाईंनी दाखवली होती. आजच्या आयपीएलच्या काळात सहभागी संघांनी करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा केली असती असं वलय घावरी यांच्या नावाला आयपीएल नसलेल्या काळात होतं. टी-२०च काय पण वन डे क्रिकेटच्याही बाल्यावस्थेचा तो काळ होता.

करसन घावरींचं सारं बालपण गेलं ते राजकोटमध्ये. तिथं त्यांची भारतीय शालेय क्रिकेटसंघात निवड झाली ती ऑस्ट्रेलियादौऱ्यासाठी. त्यांचे संघातील इतर सहकारी होते मोहिंदर अमरनाथ, ब्रिजेश पटेल आदी. याच दौऱ्यात प्रतिस्पर्धी शालेय संघातील जेफ थॉमसननं त्याच्या अतिशय वेगवान गोलंदाजीनं आम्हाला अगदी सळो की पळो केल्याची आठवणही घावरींनी सांगितली. काही वर्षांनी याच थॉमसननं ऑस्ट्रेलियातर्फे भारताविरुद्ध कसोटी मालिकेतही भाग घेतला. १९७९-८० च्या त्या मालिकेचा विषय निघताच कदुभाई मेलबोर्न कसोटीतील स्पेशल स्पेलबद्दल बोलणं साहजिकच होतं. “मला कॅप्टननं आदल्या दिवशीच सांगितलं होतं, की चॅपल विकेटवर आल्या आल्या तू एक बाउन्सर मार, तसा मी प्रयत्नही केला. तुम्ही तो व्हिडिओ पाहा, चॅपलनंदेखील बॅकफूटवर जाऊन बॉल खेळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, मात्र त्या विकेटवर बॉल खूप खाली राहिला आणि चॅपल क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला!”तरीही प्रश्न उभा राहतो, की राजकोटचा हा डावरा फास्ट बॉलर मुंबई फास्ट लोकलमध्ये शिरला कसा? त्याचीही एक मस्त कथा आहे. मुंबईविरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्यात घावरींनी दिलीप सरदेसाई, अजित वाडेकर यांच्यासह मुंबईच्या चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर मुंबई संघाचे तत्कालीन व्यवस्थापक पॉली उमरीगर यांनी सौराष्ट्राचे कर्णधार व विकेटकीपर इंद्रजितसिंह यांच्याकडे घावरींना मुंबईत आणण्याविषयी विचारणा केली. इंद्रजितसिंह भारतीय संघातर्फे १९६७च्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी सेकंड विकेटकीपर म्हणून निवडले गेले होते. इंद्रजितसिंह त्यावेळी मुंबईत एसीसीकडून खेळायचे. या दोघांमुळे कदुभाईंचं मुंबईत येण्याचं निश्चित झालं. ऑफर होती मुंबईत एसीसी कंपनीत रुजू होण्याची! पगार दरमहा ८०० रुपये! त्याकाळी टाइम्स शिल्ड स्पर्धेतील एक बलाढ्य क्रिकेट संघ अशी एसीसीची ओळख होती. ऑफर स्वीकारून कदुभाई घावरी मुंबईत आले आणि त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनं निर्णायक वळण घेतलं. मात्र घावरींना पाठवण्यास त्यांचे कुटुंबीय तयार नव्हते. विशेषत: आजोबांनी नकार दिला होता. त्यावेळी राजकोट न सोडल्यामुळे उच्च दर्जाचे क्रिकेट खेळू न शकलेले कदुभाईंचे काका जीवाभाई मदतीला आले. त्यांच्या ठाम पाठिंब्यामुळे कदुभाईंचं मुंबईत येणं झालं ते कायमचंच!

तुमच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण कोणता, या प्रश्नावर “लॉइडच्या बलाढ्य संघाविरुद्ध कोलकाता इथे कसोटीत पदार्पणाचा”, असं उत्तर घावरींनी क्षणाचाही विलंब न लावता दिलं. “असिफ इकबालच्या पाकिस्तान संघाविरुद्धचा भारतातील मालिकाविजयही खासच” असंही ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात डॉन ब्रॅडमन यांना दोन वेळा भेटण्याचा योग घावरींना आला. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अजि म्या ब्रह्म पाहिल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. शालेय संघातर्फे अॅडलेड इथे ब्रॅडमन यांना आमची टीम भेटली होती, तर आपल्या वरिष्ठ संघाला ऑसीजसमवेत ब्रॅडमन यांनी त्यांच्या घरी भोजनाचंच आमंत्रण दिलं होतं, हे सांगताना घावरींचा चेहरा आनंदानं फुलला होता.

आपल्या डावखुऱ्या गोलंदाजीनं कसोटी क्रिकेट गाजवणारे घावरी सध्या बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फ्रीलान्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गरजेनुसार त्यांची बेंगळुरू येथे जा-ये असते. कदुभाईंच्या म्हणण्यानुसार ही अकादमी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम क्रिकेट आस्थापनांपैकी एक आहे. अकादमीतील एका घटनेचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “एकदा बेंगळुरूमध्ये एका सामन्याच्या निमित्तानं आलेल्या धोनीला आम्ही १६ वर्षांखालील मुलांच्या संघासमोर संबोधित करण्यासाठी बोलावलं. धोनीकडे वेळ कमी होता त्यामुळे पाच मिनिटं बोलू असं त्यानं सांगितलं. प्रत्यक्षात तो या मुलांसमवेत इतका रमला, की तब्बल एक तास तो त्यांच्याशी गप्पा मारत बसला, त्यांच्या अनेक प्रश्नांना त्यानं कोणतेही आढेवेढे न घेता उत्तरे दिली.” त्या दिवशी ती मुलं प्रचंड प्रोत्साहित झाल्यासारखी वाटली. ‘तू एवढा शांत व संयमी कसा राहतोस’ हा प्रश्न जवळपास सर्व मुलांच्या मनात होता व तो त्यांनी मोकळेपणानं त्याला विचारला, असं घावरी सांगत होते.

सध्याच्या भारतीय संघाबद्दल घावरी म्हणाले, “या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात आपल्या संघाला खूप चांगली संधी आहे. ऑसीजचा एवढा दुबळा संघ गेल्या १०-१५ वर्षांत प्रथमच पाहण्यात येतोय. आपल्या जलदगती गोलंदाजीमध्ये वैविध्य आहे. त्यामुळे आपल्याला पर्यायही बरेच आहेत. एकंदरीत हा संघ छान आहे आणि समतोलपण आहे.”

करसन घावरी क्रिकेटमधून निवृत्त होऊन तीन दशकं उलटली, तरी अजूनही क्रिकेटला वेगवेगळ्या स्वरूपात काही देत आहे, हा बाब त्यांना खूप समाधान देऊन जाते. याआधी निवड समितीचे अध्यक्ष तसंच प्रशिक्षक म्हणूनही ते मुंबई क्रिकेटशी जोडले होते. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचं शतक नोंदवणाऱ्या या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाकडून क्रिकेटची अशीच सेवा घडो, हीच शुभेच्छा!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link