Next
ध्यान आत्मिक उन्नयनासाठी
मानसी वैशंपायन
Friday, August 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

ध्यानाचा अभ्यास करताना काही विक्षेप, अडचणी येऊ शकतात. महर्षी पतंजलींनी या अडचणी व त्यावर मात करण्याचे काही उपाय सुचवले आहेत. कोणताही अभ्यास, साधना करत असताना व्यक्ती शारीरिक रोगाने किंवा मानसिक आजाराने ग्रस्त असेल तर तिच्या हातून ते कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. स्वस्थ मन व सक्षम शरीर म्हणजेच मनोकायिक सुदृढता. हा कोणत्याही चांगल्या कार्याचा मूलाधार आहे. पचनक्रिया, उत्सर्जनक्रिया चांगली असेल, आहार-विहार-विश्रांतीचे संतुलन साधले असेल, मन प्रसन्न असेल, सर्व ज्ञानेंद्रिये पूर्ण क्षमतेने कार्यरत असतील, भावनांवर योग्य प्रकारे नियंत्रण असेल, कला व छंद जोपासल्यामुळे मन आनंदी असेल तर ध्यानसाधनेत व्यत्यय येत नाही. म्हणजेच आधीव्याधी हा मोठा अडथळा प्रथम दूर ठेवला पाहिजे.

कंटाळा, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे, असे आपण म्हणतो. शारीरिक सुस्तीमुळे सर्व कार्यांत मंदपणा निर्माण होतो. त्यामुळे मनाला कंटाळा येतो. शारीरिक जडत्व निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळणे श्रेयस्कर असते. देवी शारदेच्या स्तवनातही बुद्धीचे ‘जाड्य’ काढून टाकण्यासाठी प्रार्थना केली आहे. बऱ्याचदा केलेल्या अभ्यासाबाबत आपल्या मनात शंकाकुशंका निर्माण होतात. एखाद्या गोष्टीविषयी संदेह असेल, संभ्रम असेल तर ती गोष्ट व्यवस्थित केली जात नाही. ध्यानधारणेच्या यशाविषयी किंवा लाभांविषयी शंका असली, तर तो ध्यानसाधनेतील मोठा अडथळा ठरतो.

अज्ञान, मोह, आळस अशा विविध कारणांमुळे ध्यानसाधनेत एखादी त्रुटी राहण्याची शक्यता असते. ध्यानाला बसल्यावर लक्ष विचलित झाले, तर अनेक चुका होतात. हे प्रमाद टाळणे महत्त्वाचे आहे. विषयासक्त किंवा इंद्रियसुखाला अधिक प्राधान्य देणारी, भौतिक सुखात रमणारी व्यक्ती ध्यानसाधनेकडे वळत नाही. चैन, मनोरंजन, करमणूक यांचा अतिरेक झाला, तर मनाला ध्यानधारणेकडे वळावेसे वाटत नाही. यास ‘अविरती’ म्हणतात.

ध्यानसाधना करत असताना आपली भरपूर प्रगती झाली आहे, असे विनाकारण वाटू लागते किंवा आपला अभ्यास फलद्रूप होणार नाही, असे वाटू लागते. या दोन्हींमुळे ध्यानसाधनेचा निश्चय डळमळीत होऊ लागतो. म्हणून अशा भ्रांतिदर्शनापासून दूर राहण्याची सूचना महर्षी पतंजली करतात.

कधी कधी साधकाच्या मनात ध्यानाचा लाभ होणारच नाही, अशी नकारात्मक भावना निर्माण होते. आपण बराच काळ दीर्घसाधना करत असूनही ध्यानात अपेक्षित प्रगती झाली नाही असे वाटणे म्हणजे ‘अलब्ध भूमिकत्व.’ खरे तर ध्यानसाधनेत गुणात्मक प्रगती अतिशय संथ वेगाने होत असते. त्यामुळे येथे उतावीळपणा चालत नाही. मानसिक अस्थिरतेतून बरेचदा साधकाची प्रगती एका विशिष्ट टप्यापर्यंत होते व नंतर थांबते. चित्ताची स्थिरता जाऊन चित्त विचलित होते व साधकाची अधोगती होऊ लागते. अशावेळी आशावाद न सोडता, चिकाटीने, निष्ठेने व श्रद्धापूर्वक अंत:कारणाने ध्यानसाधना चालू ठेवावी.

या विक्षेपांबरोबर काही बाधाही निर्माण होतात. त्यातील पहिली बाधा म्हणजे दु:ख. जीवनात अनेक कारणांनी प्रतिकूल संवेदना निर्माण होतात. प्रिय व्यक्तीचा वियोग, अपेक्षाभंग, खेद, भय, निराशा, दारिद्र्य, अवहेलना अशा अनेक गोष्टींमुळे मन दु:खी होते व ध्यानसाधनेत एकाग्र होत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही ध्यानसाधना जिद्दीने चालू ठेवली तर वाईट काळाला सामोरे जाण्याचे बळ ध्यानसाधनेतूनच मिळू लागते. भीती, उद्विग्नता, खिन्नता, औदासीन्य यांमुळे माणसाची कार्याची उभारी नष्ट होते, मन दुर्बल होते. माणूस देवाला, नशिबाला दोष देत राहतो. असे पांगळे झालेले मन कोणतीही साधना करण्यास असमर्थ असते. म्हणून या साऱ्यांपासून स्वत:ला दूर ठेवावे. ‘अंगमेजयत्व’ या बाधेमुळे शरीराला कंप सुटतो, शरीरावरचा, स्वत:च्या अवयवांवरचा ताबा सुटतो. शरीरावरील मनाचे नियंत्रण कमी होते. या स्थितीमुळेदेखील ध्यानसाधनेत बाधा येते. 

रशियन संत गुर्जीएफ यांची एक आठवण ओशो यांनी सांगितली आहे. गुर्जीएफ हे ध्यानसाधनेचा प्रचार व प्रसार करायचे. ध्यान करायला शिकवीत. एकदा एक ब्रिटिश प्राध्यापक त्यांच्याकडे ध्यानाविषयी चर्चा करण्यासाठी गेले होते. ध्यान हे थोतांड आहे, असे त्यांचे मत होते. चर्चा सुरू करण्यापूर्वी गुर्जीएफ यांनी त्या प्राध्यापकाला डोळे बंद ठेवून जाणीव दोन भुवयांच्या मध्यभागी नेण्याची विनंती केली. डोळे बंद असताना दोन भुवयांच्या मध्यभागी तुम्हाला काय दिसते आहे, हा प्रश्न गुर्जीएफ यांनी एकेक मिनिटाच्या अंतराने त्यांना तीनदा विचारला. तीनही वेळा त्यांनी मला फक्त अंधारच दिसत आहे, असे उत्तर दिले. त्यांना पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला असता चिडून ते प्राध्यापक म्हणाले, ‘अंधार! अंधार! अंधार!’ मला अंधाराशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. गुर्जीएफनी मंद स्मित केले आणि ते म्हणाले, ‘प्राध्यापक महाशय, तुमच्या अंतर्यामी असलेल्या, ज्या कुणाला ठामपणे अंधार दिसत होता, त्याचा शोध म्हणजेच ध्यान.’

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link