Next
राष्ट्रध्वजाचा मान राखवा
श्याम ठाणेदार, सुनील कुवरे, प्र.मु.काळे
Friday, January 25 | 03:00 PM
15 0 0
Share this story

राष्ट्रध्वजाचा मान राखवा

स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन हे राष्ट्रीय सण आहेत. या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात कागदी व प्लास्टिकचे ध्वज खरेदी केले जातात, परंतु दुसऱ्या दिवशी हे ध्वज रस्त्यावर कचराकुंडीत फेकले जातात. राष्ट्रध्वज आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. तो रस्त्यावर किंवा कचराकुंडीत फेकला गेला तर त्याचा अपमान होतो. राष्ट्रध्वजाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान म्हणून राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याचा अपमान होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यायला हवी. कागदी किंवा प्लास्टिकचे ध्वज विकत घेऊच नयेत. सरकारने अशा ध्वजांवर बंदी आणावी. विक्रेत्यांनीदेखील असे ध्वज विकू नये.
श्याम ठाणेदार, पुणे

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

कोण जिंकले? कोण हरले?
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील डान्सबार पुन्हा एकदा सुरू करण्यास परवानगी दिली. राज्य सरकारने डान्सबारबंदीचा कायदा करण्यामागे मुख्य कारण होते ते सामाजिक दुष्परिणामांचे! डान्सबारमुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. वास्तविक डान्सबारबाबत केलेला कायदा भावनिक होता. तो न्यायावर आधारलेला असावा लागतो. एखादा सवंग निर्णय घ्यायचा आणि त्याचे राजकीय फायदे उठवायचे एवढेच काम आजवर सरकारने केले आहे. त्यामुळे लोकहिताच्या निर्णयाला कायद्याचे हवे तसे पाठबळ मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाले नाहीत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकारकडून डान्सबारवर बंदी घालण्यासाठी लागू करण्यात आलेला कायदा सर्वसमावेशक होता की नाही, असा प्रश्न पडतो. खरे तर मुळात डान्सबारबंदीच्या मागे सरकारची इच्छा नव्हती. एकीकडे डान्सबारवर बंदी घालण्यासाठी काही सामाजिक संघटना लढत होत्या, तर दुसरीकडे बारबालांच्या रोजगार आणि पुनर्वसनासाठी लढाही सुरू होता. दारू, तंबाखूचे सेवन शरीराला हानिकारक असूनही त्यांचे सेवान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. असेच डान्सबारचे आहे. याच्या कोणी किती आहारी जायचे हे ज्याचे त्याने विचार करून ठरवायचे असते. आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डान्सबारसंबंधी एक अध्यादेश काढणार आहे, परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की जनतेच्या दबावापोटी घेतलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर सरकारला टिकवता आला नाही. त्यामुळे डान्सबार मालक जिंकले आणि सरकार हरले, असे म्हटले तर वावगे ठरू नये.     
सुनील कुवरे, शिवडी, मुंबई

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

डोळे उघडणारा अग्रलेख
‘झी मराठी दिशा’च्या दि. १९ जानेवारीच्या अंकातील ‘अडचणीचा काळ’ हा अग्रलेख मनाला भावला. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट कसे घोंगावत आहे हे अत्यंत योग्य शब्दांत सांगितलेल्या या अग्रलेखाने प्रत्येकाचे डोळे उघडले पाहिजे. दरवर्षीसारखाच याही वर्षी दुष्काळ जाणवत आहे. याबद्दल तातडीने उपाय आवश्यक आहेत, शिवाय अशा दुष्काळांवर कशी मात करायची याचे कायमस्वरूपी उत्तर काय असेल याचा विचार व्हायला हवा. ग्रामीण आणि शहरी अशा सर्वच भागांत अनेक प्रश्न आहेत. ‘झी मराठी दिशा’ने यासंदर्भात विशेष लेखमाला प्रकाशित करून संबंधित यंत्रणाना उपयुक्त कार्य केले आहे, त्याबद्दल ‘झी मराठी दिशा’चे विशेष अभिनंदन!
 प्र.मु.काळे, नाशिक 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link